गझल

गझल

वर्षे झाली

 


        त्या जागेवर ती दिसण्याला वर्षे झाली
        तिने फक्त माझे असण्याला वर्षे झाली


                       गर्दीतुनही तिथे अचानक तिने स्वतःहुन
                        नांवगांव माझे पुसण्याला वर्षे झाली


        कुठे तुझे गं मावळले ते रुसणे फुगणे
        अशा तुझ्याही मग नसण्याला वर्षे झाली


                          ओळख देऊन पुन्हा चौकशी हसता हसता
                          ठरलेल्या माझ्याही फसण्याला वर्षे झाली 

गझल: 

लढाई

जिंकण्याची एवढी केली तयारी
हारणे झाले मला मग खूप भारी


का विठोबा पावला नाही मला तू
सोडली नाही तुझी मी एक वारी


पाखरांची शेवटी रे हार झाली
माणसांनी घेतली जेंव्हा भरारी


आजही आकाश बघ तेथेच आहे
ये जरा तू चार भिंतीतून दारी


साप जेव्हा विष विकाया लागले मग
तेवढे ते राहिले नाही विषारी

गझल: 

गझले तुज अर्पण हे तन-मन्-धन...

गझले तुज अर्पण हे तन-मन्-धन
वाहियले तुजसाठी मी... जीवन


जगण्याचा अर्थ खरा लावलास
प्रतिभेचे फुलविलेस.. नंदनवन


घेवुन सल काळजात मी फिरतो
अन माझ्या दु:खाचे.. तू सांत्वन


तेज असे तुझियातच.. विश्वाचे
तार्‍यासम झळके माझे प्राक्तन


शालिनता आणलीस जीवनात
नम्र किती झाले... माझे वर्तन


हा प्रभाव माझ्यावर गझलेचा
फक्त तिचे बोल ऐकते हे मन


ही सदैव जीवनात हेळसांड
गझल करी मातेसम संगोपन

गझल: 

गुलाम केले आम्हाला...

गुलाम केले आम्हाला... हे मालक झाले
गनीम रयतेच्या राज्याचे शासक झाले


विकास अमुच्या दारी सांगा आला का हो ?
हजारवेळा निवडणुकींचे...  नाटक झाले


गरीब  हटले, हटली नाही  अमर गरीबी
गरीब, जन्मा आलो, कसले पातक झाले


पहा पुन्हा या टोळ्या आल्या, लुटले आम्हा
लुटीत... तारणहार, ठग्यांचे हस्तक झाले


कमावता येते धन, येथे... कर घोटाळे
इमानदारीने जगले,  ते... हल्लक झाले

गझल: 

आज फुलांची भाषा.....


                     आज फुलांची भाषा.....            

                आज फुलांची भाषा मजला कळते आहे
                फूल होऊनी ऊर बघा दरवळते आहे

                उष्म उसासे टाकीत आली, झुळूक कशी ही?
                कोण आज त्या दूर तिथे तळमळते आहे?

               शांत सागरा, आज कश्या ह्या निमूट लाटा?           
               आज काय रे तुझ्या मनी खळबळते आहे?

               आज वाल्मिकी पुन्हा करु सुरवात नव्याने,
               क्रौन्च होऊनी ऊर अता भळभळते आहे

               एक पालखी हाय, जरी ही दूर निघाली,

गझल: 

ना ठावुक तुजला...

ना ठावुक तुजला कितीक कळतो आहे
जो दाह तुझा मज अविरत छळतो आहे


चालली जणू ही... माझी अग्निपरीक्षा
मी काय सिद्ध करण्याला जळतो आहे


तू समजुन घे ना.. माझ्याही शब्दांना
जे तुला वाटती... उगा बरळतो आहे


थांबवू कसा हा.. आठवणींचा ओघळ
जो डोळ्यांमधुनी घळघळ गळतो आहे


हा अथांग सागर माझे इप्सित असुनी
मी उगाच... काठावर डुचमळतो आहे


घे छळुन.. प्राक्तना, हवे तेवढे आता
पाहू दे, मला तू किती उधळतो आहे

गझल: 

जे कधी न जमले मजला

               जे कधी न जमले मजला                    

     जे कधी न जमले मजला, इतरांना जमले होते...
     मज साधे घर नसताना, त्यांचे तर इमले होते !

     मी वाट तुझी बघताना, नुसतेच न शिणले डोळे;
     प्रत्येक वळण वाटेचे, कंटाळुन दमले होते !

     त्या घेराव्यातच मजला, जी झाली धक्काबुक्की..
     माझ्यावर ते कुसुमांचे, हारांतुन हमले होते !

     तांबडे फुटेतो तू-मी, त्या रात्री जागत असता,
     विझण्याचे विसरुन तारे, चमकण्यात रमले होते !

     एकांती ऐकू आली, मज बालपणीची गाणी,

गझल: 

Pages