गझल

गझल

जीवनाशी जुंपली

जीवनाशी जुम्पली  आता लढाई
संपला तह अन सुरू ही हातघाई


मज दिसेना काय आहे त्या तळाशी
वेदनेची केवढी ही खोल खाई!


जे न उठते पेटुनी वणव्याप्रमाणे,
ते न असते रक्त,ती तर लाल शाई


जे प्रजेला भाकरी देऊ न शकले,
मारती ते ई-गव्हर्नन्स्ची बढाई


मानली नाही अजुन मी हार माझी
मी तुझ्याहुन, वेदने,आहे सवाई


     दिलीप पांढरपट्टे

गझल: 

तुझ्या नि माझ्या भेटीचे युग...

तुझ्या नि माझ्या भेटीचे युग जरी संपले आहे
मनात माझ्या फिरुन जुने ते वादळ उठले आहे


तुझ्यासारखी मी ही केली कुजबुज एकांताशी
मधुर स्मृतींनी एकांताला पुन्हा रडवले आहे


नेहमीच मज तुझी सांत्वना जगण्याचे बळ देते
अन्यथा व्यथांनी मनास पुरते गुरफटले आहे


जरा न मन मोहरले माझे, फक्त शहारा आला
वसंत किंवा शरद नसे हा, मळभ दाटले आहे


गंध नसे वार्‍याला तो कोरडा वाहतो आता
गाव तुझे त्याच्याही पासुन दूर चालले आहे

गझल: 

सांगती खोटे जरी


सांगती खोटे जरी सारीच पाने,
ग्रंथ येथे थोर ठरतो वेष्टनाने


सांग, शब्दांनी कसे मी सर्व सांगू?
काळजाला ओळखावे काळजाने


पाखरू सोसेल ही बंदी,परंतू
गीत मुक्तीचे न गावे पिंजऱ्याने


सर्व ते गेले सुखाच्या मैफलीला
गायिली माझी व्यथा मी एकट्याने


"का तुझी -माझी अशी ही भेट झाली?"
-हे न काट्याला पुसावे पावलाने

             दिलीप पांढरपट्टे

 

 

 

गझल: 

काय फायदा?


आज पौर्णिमा नभात काय फायदा?
चांदणे नसे मनात काय फायदा?


वेचला मरंद तू जरी फुलांतुनी
वाटलास ना कुणात! काय फायदा?


पोटचे विकूनही न पोटभर मिळे
जन्म देउनी जगात काय फायदा?


चंद्र, चांदण्या खुडून आणशीलही
भाकरी न जर पुढयात काय फायदा?


दात आपलेच आणि ओठ आपले
गप्प बैस! बोलण्यात काय फायदा?


धावशील शर्यतीत जिंकण्यास तू
अडथळा ठरेल जात! काय फायदा?


शोधलेस नीट तर तुला मिळेलही
नजर ती न जर तुझ्यात काय फायदा?


ज्यात त्यात पाहतात फायदा सदा
राहुनी अश्या जनात काय फायदा?

गझल: 

Pages