गझल

गझल

चांदणी, चंचला, कामिनी, सुंदरा, मोहिनी, अप्सरा, कोण आहेस तू

चांदणी, चंचला, कामिनी, सुंदरा, मोहिनी, अप्सरा, कोण आहेस तू
बोलणे शृंखला, पाहणे पिंजरा, हासणे भोवरा, कोण आहेस तू

का तुला पाहिले की मला वाटतो एवढा आसरा, कोण आहेस तू
का तुझ्यावाचुनी जीव होतो असा घाबरा घाबरा , कोण आहेस तू

का तुझे नाव ओठांवरी सजवुनी, येत असते कुणी जात असते कुणी
का दिवसरात फिरतात हल्ली तुझा लावुनी चेहरा, कोण आहेस तू

हिरवळू लागले काठ माझ्या मनाचे, उन्हाची फुले व्हायला लागली
स्पर्श करताच तू वाहता जाहला, आटलेला झरा, कोण आहेस तू

गझल: 

वाहते का ? हवाच आहे की !

वाहते का ? हवाच आहे की !
उंच उडतो ? फुगाच आहे की !

मी तुझ्यासारखाच आहे की
मी तुझा आरसाच आहे की

काय सांगू तरी तुला आता ?
सर्व काही पताच आहे की !

बनचुका तू नि बनचुका मीही
काळही बनचुकाच आहे की !

श्वास घेऊन पाहतो आहे;
भास माझा खराच आहे की...

वेगळा वेगवेगळ्या वेळी -
हा तुझा चेहराच आहे की...

नाव माझे तुझ्या सुगंधावर
एकदा नीट वाच, आहे की!

एक ही सोडली मिठी तर मग
सर्व बाकी वृथाच आहे की

ही तुझी रात्र उर्वशी आहे
दिवसही पुरुरवाच आहे की

गझल: 

घर

--------------------------------------

घराला राहिले आता कुठे घर
स्वत:चे गाव सोडुन चालले घर

असे कित्येक जागी वाटते की
इथे नक्कीच नाही आपले घर

कसे माझ्याघरी पोचायचे मी
असे रस्त्यात जर आले तुझे घर

मिळाला फक्त दर्जा 'बायको'चा
तिला सोडून यावे लागले घर

विकत घेऊन आलो एक जागा
विकावे लागले आहे जुने घर

मलाही धीर झाला एकदाचा
तुलाही पाहिजे होते नवे घर

-ज्ञानेश.

-------------------------------------

गझल: 

मी काही स्वप्नांच्या नुसता सोबत बसतो

सुखान्त गोष्टी रोज नव्या मी जुळवत बसतो
एक उदासी रोज रोज ओलांडत बसतो

`असेच होइल' घालताच समजूत मनाची
मी सुध्दा मग `तसेच होइल' समजत बसतो

देणे असते अखेर या डोळ्यांचे काही
मी काही स्वप्नांच्या नुसता सोबत बसतो

कुठेतरी असणार रात्र.. तुटणारा तारा
दिवसासुध्दा मनात काही बोलत बसतो

चित्रामधले घर एखादे अबोल असते
खुळ्यासारखा तेच दार ठोठावत बसतो

कुणीतरी येताच जाग डोकावत असते
रात्र रात्र सगळा कोलाहल खोडत बसतो

गझल: 

आसवे

आज नयनी पुन्हा जागली आसवे
भंगली शांतता वाजली आसवे

लोक जातात नयनांवरी कोरड्या
हाय दिसती कुठे आतली आसवे

तू जरी धाडले शुद्ध हासू मला
पोचता पोचता जाहली आसवे

आठवांच्या तुझ्या या वरातीमधे

Taxonomy upgrade extras: 

कसे मानू

कसे मानू तुला माझा जरासा भासही नाही
तुझ्या डोळ्यात हलकासा तसा आभासही नाही

कशाला जीर्ण स्वप्नांचे मनोरे मी उभारावे
अशासाठी जवळ केले तुझे ते भासही नाही

कधीपासून स्वप्नांच्या महाली मी उभा आहे
हरवली वाट तू कोठे, वळ्ण रस्त्यासही नाही

कशी गीते मला प्रेमळ सुचावी सांग तू आता
पुरेसा लाभला तेव्हा तुझा सहवासही नाही

उद्या माझ्या घराजवळी सुखे येतीलही सारी
तरी हे दु:ख संपावे अशी मज आसही नाही

कशाची पूर्तता नाही, मिळाले अर्धवट सारे
पुरेसे दु:खही नाही, खरा वनवासही नाही

गझल: 

मौन

मी जरी  हे बोलण्याचे टाळले होते
आसवांनी मौन कोठे पाळले होते

बोलताना ती जराशी हासली तेव्हा
मी उगाचच अर्थ सारे चाळले होते

दुःख ही येथे खरे मज भेटले नाही
भास हे नुसतेच मी कवटाळले होते

मोजताना घाव माझे आज ही चुकले
आठवेना नाव कुठले गाळले होते

ओळखीचा वाटतो ना चेहरा माझा
ओळखीचे घाव सारे वाळले होते

रोजची पाहून येथे आसवे माझी
दुःख ही माझे मला कंटाळले होते

वाहवा माझ्या न गीताला मिळाली ही
लोक माझ्या वेदनेवर भाळले होते

गझल: 

Pages