गझल

गझल

...नाही आज सुचत काही !

...नाही आज सुचत काही !

झाले आहे काय कळेना...नाही आज सुचत काही !
पाणी डोळ्यांतील खळेना...नाही आज सुचत काही !

वाटेना वाईट कशाचे..  होई दुःख  न कसलेही ...
थोडेही का रक्त जळेना...नाही आज सुचत काही !

आयुष्याने रोज छळावे...याची खूप सवय होती...
तेही बेटे आज छळेना...नाही आज सुचत काही !!

दारोदारी घालवला, जो आला तो दिवस, परंतू -
बेचैनीची रात्र ढळेना...नाही आज सुचत काही !

कोठेही का जीव रमेना....कोठे का मज करमेना ?
ही  एकाकी वेळ टळेना...नाही आज सुचत काही !

गझल: 

साळसूद

पूल बांधतो जरी
वाढतेच का दरी?

भूक ही शिळीच अन
ही शिळीच भाकरी!

राग फार साचला,
काढला तुझ्यावरी

देतसे कधी हरी
काय खाटल्यावरी?

आलबेल या इथे
कत्तली तिथे जरी!

साळसूद ठेव तू
भाव चेहर्‍यावरी!

प्रश्न हेच जर तुझे -
व्यर्थ जिंदगी खरी!

गझल: 

...दिवेलागणीच्या वेळी !


...दिवेलागणीच्या वेळी !

नको तेच ते का स्मरते...दिवेलागणीच्या वेळी !
तुझ्या आठवांना भरते...दिवेलागणीच्या वेळी !

जणू होत आहे चकवा...फिरे काळ एका जागी...
पुढे वेळ कोठे सरते...दिवेलागणीच्या वेळी ?

- पडू लागता कायमचा जसा गाव मागे मागे...
कुणी पोर डोळे भरते...दिवेलागणीच्या वेळी !

मला एकट्याला बघुनी म्हणे चांदणी एकाकी...
तुझा हात मीही धरते...दिवेलागणीच्या वेळी ! !

तुला आठवे का पहिली तिची भेट एकाएकी...?
मनी काय हे मोहरते...दिवेलागणीच्या वेळी ?

गझल: 

कंठशोष

जगती चिवट अजूनी, का हाच दोष त्यांचा?
जाळून बाल्य करता का रक्तशोष त्यांचा?

का व्यर्थ फडफडावे? चिमटीत गुदमरावे?
सुरवंट रेंगणारे विणतीच कोष त्यांचा!

कळती तुम्हास सार्‍या खाणाखुणा इशारे
विरतो कड्याकपारी का कंठशोष त्यांचा?

समजून कोण घेते कोणास आज येथे
माझ्यावरी तरीही आहेच रोष त्यांचा!

सवयीनुसार त्यांनी संकल्प सोडले अन
सवयीनुसार चालू हा मंत्रघोष त्यांचा!

गझल: 

Pages