...नाही आज सुचत काही !

...नाही आज सुचत काही !

झाले आहे काय कळेना...नाही आज सुचत काही !
पाणी डोळ्यांतील खळेना...नाही आज सुचत काही !

वाटेना वाईट कशाचे..  होई दुःख  न कसलेही ...
थोडेही का रक्त जळेना...नाही आज सुचत काही !

आयुष्याने रोज छळावे...याची खूप सवय होती...
तेही बेटे आज छळेना...नाही आज सुचत काही !!

दारोदारी घालवला, जो आला तो दिवस, परंतू -
बेचैनीची रात्र ढळेना...नाही आज सुचत काही !

कोठेही का जीव रमेना....कोठे का मज करमेना ?
ही  एकाकी वेळ टळेना...नाही आज सुचत काही !

हाकांचा कोलाहल आता झाला फारच भवताली...
माघारी कोणीच वळेना...नाही आज सुचत काही !

अंधारी ही वाट किती मी चालू...पायच उचलेना -
का माझा रस्ता उजळेना...नाही आज सुचत काही !

गेलो होतो दूर परंतू आलो आज परत य़ेथे...
मी कोठे का दूर पळेना...नाही आज सुचत काही !

ज्ञानेशाच्या शब्दकळेचे व्हावे वारस ...पण साधी -
- ही शब्दांची भिंत चळेना...नाही आज सुचत काही !!

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

वाटेना वाईट कशाचे..  होई दुःख  न कसलेही ...
थोडेही का रक्त जळेना...नाही आज सुचत काही !
हाकांचा कोलाहल आता झाला फारच भवताली...
माघारी कोणीच वळेना...नाही आज सुचत काही !
ज्ञानेशाच्या शब्दकळेचे व्हावे वारस ...पण साधी -
- ही शब्दांची भिंत चळेना...नाही आज सुचत काही !!
 
अस्वस्थपणाचा वास येतो आपल्या शब्दांस...
ओळी का ह्या आहेत वा बेचैन किती  नि:श्वास ?
नको वाटतो छातीमधल्या लाव्ह्याचा  सहवास
फुटे कधी ही कोंडी मनाची? -आहे एकच ध्यास
गझल अस्वस्थ करणारी आहे.

हाकांचा कोलाहल आता झाला फारच भवताली...
माघारी कोणीच वळेना...नाही आज सुचत काही !
वाव्वा! फारफार आवडला हा शेर. एकंदरच गझल सुंदर सफाईदार आहे.

प्रदीप,
'नाही आज सुचत काही' ही रदीफ खूपच आवडली.
आयुष्याने रोज छळावे...याची खूप सवय होती...
तेही बेटे आज छळेना...नाही आज सुचत काही !! वा!
'हाकांचा कोलाहल'ही अप्रतिम.
ज्ञानेशाच्या शब्दकळेचे व्हावे वारस ...पण साधी -
- ही शब्दांची भिंत चळेना...नाही आज सुचत काही !!  वा! वा!
- कुमार

रक्त, आयुष्य आणि ज्ञानेशाच्या .. हे शेर विशेष आवडले!
-- पुलस्ति.

छानच गझल आहे. तुमचे वेगवेगळे रदीफ फार चांगले असतात. तुमच्या रदीफांची योजना पाहून मी तुमचे नाव प्-रदीफ असे ठेवले तर...? असो...
प्रस्तुत गझलेतील दुसरा, चौथा आणि शेवटचा - हे विशेष आवडले. मात्र, 'बेटे' हा शब्द बदलता येणार नाही का? विशेष काही नाही पण फारच बोलीभाषेतला वाटतो. हझलमध्ये चालेल. पण बदलणे अगदीच आवश्यक नाही. थोडा विचार करा - जमल्यास. अजून एक... 'परंतु' लाही शेवटचे अक्षर दीर्घ असलेला पर्यायी शब्द मिळेल तर...? 'परंतू..' ए़खादेवेळी ठीक.
पण बाकी अर्थातच सुंदर...
-संतोष कुलकर्णी, उदगीर