चांदणी, चंचला, कामिनी, सुंदरा, मोहिनी, अप्सरा, कोण आहेस तू
चांदणी, चंचला, कामिनी, सुंदरा, मोहिनी, अप्सरा, कोण आहेस तू
बोलणे शृंखला, पाहणे पिंजरा, हासणे भोवरा, कोण आहेस तू
का तुला पाहिले की मला वाटतो एवढा आसरा, कोण आहेस तू
का तुझ्यावाचुनी जीव होतो असा घाबरा घाबरा , कोण आहेस तू
का तुझे नाव ओठांवरी सजवुनी, येत असते कुणी जात असते कुणी
का दिवसरात फिरतात हल्ली तुझा लावुनी चेहरा, कोण आहेस तू
हिरवळू लागले काठ माझ्या मनाचे, उन्हाची फुले व्हायला लागली
स्पर्श करताच तू वाहता जाहला, आटलेला झरा, कोण आहेस तू
धूळ झालो जरी मी तुझ्या अंगणी, कोण जाणे कशी ही तुझी मोहिनी
जात नाही कुठे रोज खाऊनही एवढ्या ठोकरा, कोण आहेस तू
छान आहेत हे आरसे, जे तुझी कौतुके रोज करतात चौकट भरून
भेट केव्हातरी पण मनाला तुझ्या, पूस इतके जरा, कोण आहेस तू
पान हिरवे कुठे एक नाही दिसत, अन् तुझा जांभळा मेघ नाही फुटत
खंत नाही तुला, दुःख नाही तुला, एवढा पांढरा, कोण आहेस तू
- वैभव देशमुख
प्रतिसाद
चित्तरंजन भट
सोम, 19/10/2015 - 12:55
Permalink
पान हिरवे कुठे एक नाही दिसत,
पान हिरवे कुठे एक नाही दिसत, अन् तुझा जांभळा मेघ नाही फुटत
खंत नाही तुला, दुःख नाही तुला, एवढा पांढरा, कोण आहेस तू
वा! मस्त मजा येते आहे वाचताना. गझल आवडली.
केदार पाटणकर
शनि, 19/12/2015 - 12:31
Permalink
मस्त लयीत आहे गझल. रदीफ
मस्त लयीत आहे गझल. रदीफ कवाफींची छान सांगड घातली गेली आहे. अशा लांबलचक वृत्तांच्या गझला लिहिणे कठीण कार्य पण ते तू व्यवस्थित पार पाडले आहेस.
ज्ञानेश.
सोम, 03/12/2018 - 08:24
Permalink
सुरेख गझल.
सुरेख गझल.
मोठे वृत्त अप्रतिम निभावले आहे.