गझल

गझल

मला ठावुक की...

मला ठावुक की... क्षणभर तिथे तू थांबली होती
जरा वळताच मी मागे, कशी तू... धावली होती


तुझ्या डोळ्यातली तगमग नि सोबत बोलणे हळवे
मनाची चलबिचल सारी तुझी... मी जाणली होती


जरा आठव पुन्हा राणी फिरुन ती भेट अवचितशी
तशी ती वेळ अजब नि तू किती.. भांबावली होती


मला स्मरते अजुन सारे... तुलाही आठवते आहे
तुझ्या ना जाणिवा परक्या... जरी रागावली होती

गझल: 

काटाकाटी श्वासांचीही..

अवतीभवती थकलेल्यांना वाचत जातो
शब्दांना तेव्हाही वाटे, जाचत जातो


प्रत्येकाच्या अग्रावरती मीपण असते
'मी'च तरीही प्रत्येकाला डाचत जातो


जीवन म्हणजे काटाकाटी श्वासांचीही,
छातीलाही मांझा त्याचा काचत जातो


चुकवत गेलेला मृत्यूही अनुशेषासम
आयुष्याच्या काठावरती साचत जातो


मरगळलेल्या निमिषांनाही पडताळाया,
मोर उगाचच उत्साहाचा नाचत जातो


फाटत जाणारी रक्ताची नातीगोती
कोणी रक्ताच्या धाग्यांनी टाचत जातो


- प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर

गझल: 

आई दे..

आई दे..,वा ... आया दे
काहीही कर, माया दे


दे द्यायाची आहे तर,
विषयावाचुन काया दे


दे प्रेमाला जीवन दे
जावू दे ते वाया...दे


कानी दुष्प्रवृत्तीच्या,
सत्वृत्तीचा फाया दे


रेड्यांना दे वेद तरी,..
मजला गाणी गाया दे


सूर्यालाही तेज मिळो,
बाकीच्यांना छाया दे


- प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर

गझल: 

खरेच राणी...

खरेच राणी... कधीपासुनी गझल एकही सुचली नाही
मनातली ही माझी घुसमट तुला अजुनही कळली नाही


किती खुणावू तुला खुणेने... कुठली ही तुज खुण कळेना
किलकिलत्या पापण्यात तुझिया अजुन चांदणी हसली नाही


क्षणभरही मी, तुझ्या आठवांना या... दूर न करतो केव्हा
तुझी आठवण हलके-हलके फुलली पण... मोहरली नाही


अताशा कुठे... स्वप्नामध्ये... वावरण्या तू येते माझ्या
अजुन पुरेशी गडद निशाणी... स्वप्नांनी उमटवली नाही

गझल: 

शोधताना मी सुखाला...

शोधताना मी सुखाला हरवले आहे स्वत:ला
जिंकल्या डावात माझ्या गमवले आहे स्वत:ला


स्वप्नं त्या डोळ्यात मी ही हासण्याचे पाहिलेले
पण तिच्या अश्रूत आता भिजवले आहे स्वत:ला


डाव नियतीचाच होता, की मला हरवायचे... पण
मात केली मी तिच्यावर, घडवले आहे स्वत:ला


गंध श्वासांचा तुझ्या जो वाहतो प्राणात आहे
तू दिले मज श्वास अन मी जगवले आहे स्वत:ला

गझल: 

इथे कुणाला संग हवा?

 

                          इथे कुणाला संग हवा?
                          वरवरचा तर रंग हवा

          विकायला मी सज्ज मला
          असाच सारा ढंग हवा

                           वायद्यासही चुकलेला
                           असा कायदा भंग हवा

          गनीम सख्खा शेजारी?
          हरण्याचा मग चंग हवा

                              तहात भेकड हा येथे
                              रणात कोणी दंग हवा

     

            

गझल: 

Pages