गझल

गझल

बांधुन मी...

बांधुन मी घेतल्या न भवती कधी फुकाच्या भिंती
आकाशाच्या पलीकडे निर्मिल्या यशाच्या भिंती


उन्-वार्‍याचे अन पाण्याचे... मला वावडे नाही
परिस्थितीने मजबुत केल्या आयुष्याच्या भिंती


आरोपांनी अन दुषणांनी... तडे हजारो गेले
तरी संकुचित झाल्या नाहित कधी मनाच्या भिंती


रात्रं-दिन हे दु:खच माझे... सक्त पहारा देते
म्हणुन सुरक्षित मी अन माझ्या मौन सुखाच्या भिंती


स्क्वेअरफुटाच्या हिशोबातल्या घरात वावरताना
आठवती मज साद घालती, पुन्हा कुडाच्या भिंती

गझल: 

श्वाससूत मी जरा धरून पाहतो
मी मलाच चाचपून पाहतो

जो चुकून घेतलाच मोकळा 
श्वास - त्यास थांबवून पाहतो

बूंद-हौद -जाणतोच मी तरी  
का उगाच निस्तरून पाहतो?


साठवून ठेवतो खुणा खुणा
मी पुन्हा पुन्हा वळून पाहतो

ते मलाच शोधते चहूकडे
वादळास मी भिडून पाहतो

वेळ ही अशी - जपून बोलतो
मी दिसेल ते दुरून पाहतो

मी अजून शोधतोच कारणे
तो जमेल ते करून पाहतो

सापडेल, सापडेलही झरा
खोल खोल मी खणून पाहतो

मी शिव्याच देत राहिलो इथे
तो जिवास हासडून पाहतो

गझल: 

तसा कुणाला...

तसा कुणाला नाही मी आवडण्याजोगा
कुणाला म्हणू, "माझ्याशी प्रेमाने वागा?"...

हातावरच्या रेषा सगळ्या मिटल्या माझ्या
पायांना का पडल्या इतक्या जखमा-भेगा...

उसवत गेली का मायेची किनार ही?
कळले नाही तुटून गेला केव्हा धागा...

स्वप्नांना मी भिऊन आता झोपत नाही
रात्र-रात्र मी जाळत असतो राहुन जागा...

वसंता, तुझा भरवसा कुठे आहे उरला?
फुलल्या तशाच उजाड झाल्या इथल्या बागा...

आप-मतलबी दुनिया आहे अशी 'अजब' ही;
नको मना तू करूस आता उगाच त्रागा...

गझल: 

कालचा प्रवास पुन्हा


कालचा प्रवास पुन्हा
तोच विजनवास पुन्हा

मी,गडे, उदास इथे
एकदाच हास पुन्हा

जाहली विराण वने
संपले सुवास पुन्हा

हा असा कसा चकवा?
तूच आसपास पुन्हा

या तुझ्याच आठवणी
हा जुनाच त्रास पुन्हा


                    दिलीप पांढरपट्टे

गझल: 

सूर माझे


सूर माझे उदास आताही
तू रहा आसपास आताही


दूर गेलीत पाखरे सारी
झाड शोधे कुणास आताही?


फूल सांगे विषण्ण वार्‍याला
"गोठला रे सुवास आताही"


शोध माझाच मी किती केला?
चालला तो तपास आताही


भूल पडली तुझी युगामागे
भूल आहे जिवास आताही


              --  दिलीप पांढरपट्टे

गझल: 

नवा चंद्र

मी जिवाची अपुल्या चेतवुनी वात पुन्हा;
दाट काळोख पुसायास बसे गात पुन्हा

पाहिले वाकुन तू लाजत पाण्यावरती
दावला एक नवा चंद्र तलावात पुन्हा

गझल: 

Pages