पोरी....

नको फिरू तू उन्हात तपत्या वणवण पोरी....
तुझीच काया बनते आहे जळतण पोरी....!

खोडलेस तू लिहिता लिहिता नाव जरीही ..
कसे खोडशी हृदयावरले गोंदण पोरी....?

"दु:ख लपवले" सांगतात पडलेल्या भेगा..
तरी कितीदा तू सारवते अंगण पोरी....

'स्वप्न जेवढे सुंदर तितके कुरूप वास्तव..'
पहा स्वप्न तू, सोड पहाणे दरपण पोरी....

घासलेटच्या आणि विषाच्या दिल्या बाटल्या..
काय द्यायचे तुला आणखी आंदण पोरी..!!!

अमित वाघ. "गुरूमंदिर", सुधीर कॉलनी, अकोला 444005.
दुरध्वनि क्र. :  9850239882; 9970167572.
www.gazalnavihotanna.blogspot.com

गझल: 

प्रतिसाद

अमित, उत्तम गझल! फार आवडली..
गोंदण, दर्पण - शेर विशेष. आणि शेवटच्या शेराने तर अंगावर सर्कन काटाच आला...

तरी कितीदा तू सारवते अंगण पोरी....पहा स्वप्न तू, सोड पहाणे दरपण पोरी....
वा! वा!! गझल अगदी चांगली झाले आहे. पुलस्तिंशी सहमत आहे.

'स्वप्न जेवढे सुंदर तितके कुरूप वास्तव..'
पहा स्वप्न तू, सोड पहाणे दरपण पोरी....

क्या बात है !!

वा अमितराव,
गझल छान आहे.  पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
घासलेटच्या आणि विषाच्या दिल्या बाटल्या..
काय द्यायचे तुला आणखी आंदण पोरी..!!!

हा शेर फार फार फार वरच्या पातळीचा आहे.
हुंडाबळी  ठरलेल्या अनेक नवविवाहित निष्पाप भगिनींच्या वेदनेवर एवढे परिणामकारक भाष्य आम्ही अजून वाचले नाही.   
तुम्हाला आमचा सलाम !
आपला,
(प्रभावित) धोंडोपंत
"जळतण" म्हणजे काय ते आम्हाला माहित नाही . 
 जळून काळे पडलेल्या तणाप्रमाणे रापलेली काया... असा अर्थ आम्ही घेतला आहे. तो तसा नसेल तर कृपया सांगावे.
आपला,
(अडाणी) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धन्यवाद....
मा. पुलस्ति,भट साहेब्, ढ्वळे साहेब्...
आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद...
..
..
..
..
आपल्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत आम्ही होतोच...
धन्यवाद..
मा. धोंडोपंत....
आपली स्पष्ट आणि सच्ची मतं आम्हाला बेहद्द आवडतात..
"जळतण" म्हणजे जाळण्यासाठीची लाकडे. [सरपण, इंधन,इं..]
 "तू इंधनासाठी फिरून स्वतःच जळतण होतेय पोरी एवढ्या प्रखर उन्हात नको फिरू.. हा आम्हाला अपेक्षित अर्थ...
आपला,
(चाहता)अमितराव...