गझल

गझल

जीवन


धापा टाकू लागे जीवन..
..श्वासांचे ॠण मागे जीवन


ही भासांशी  शय्यासोबत..
...स्वप्नांपुरते जागे जीवन


माझे चांगुलपणही सोडुन,
माझ्यासंगे वागे जीवन..


वरवरचे हे असते ले़खन
...हृदयी विणते धागे जीवन


मी कोणाच्या मागे नाही...
...माझे माझ्या मागे जीवन...


एक दिलासा पुरतो केवळ..
तितक्यानेही भागे जीवन

                                     - प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर

गझल: 

पौर्णिमा

चिंब हिरवळ, रात्र मखमल, गार गोरी पौर्णिमा
रातव्याचे थेंब न्हालेली टपोरी पौर्णिमा


चांदण्यांचे बाण सुटती मान ही वेळावता
केवढे घायाळ करते ही समोरी पौर्णिमा!


रातराणी श्वास हे वळले तिच्या ओठांकडे
नेमकी तेव्हाच लाज़ुन पाठमोरी पौर्णिमा?


रातरांगोळी तुझी मी वाट बघते राजसा
चंद्र होऊनी पुन्हा भरशील कोरी पौर्णिमा?


बघ मला, कोजागिरीचा चंद्रही पडु दे फिका
(ऐकले हल्ली जरा करते मुजोरी पौर्णिमा)

गझल: 

कोजागिरी


                                     जपले मनातल्या मनात चांदणे 
                                    हृदयात चंद्र काळजात चांदणे


                                     होतो चकोर जीव, बोलताच तू
                                     झरते तुझ्या स्वरास्वरात चांदणे


                                     आहे सभोवताल वाळवंट... पण
                                     झळ लागते न ज्या घरात चांदणे


                                     मी पाहिले तुला, न व्यर्थ भास हा
                                    आले भरात, भर उन्हात चांदणे

गझल: 

पारदर्शी...


जरी वाटती माणसे पारदर्शी...
कुठे कोण पाण्या असे पारदर्शी...?

स्वतःची कशी लाज वाटेल त्याना..
अरे... येथले आरसे पारदर्शी...

कळे काय आहे अवस्था मनाची..
तिचा चेहरा होतसे पारदर्शी...

जसे प्रेम आहे तसे ठेव त्याला..
नको पाहिजे फारसे पारदर्शी...

अखेरी न कळले कुणी वार केले.
सुर्‍यावर मिळाले ठसे पारदर्शी...


गझल: 

सडेतोड.....

सुरू एकट्याचीच तडजोड होती..
तिची चालली फक्त धरसोड होती...

कडू वाटले केवढे ऐकतांना...
तुझी बातमी ती जरी गोड होती...

किती नम्रतेने तुला प्रश्न केले...
तुझी उत्तरे का सडेतोड होती...?

विषाची परीक्षा नको घ्यायला पण..
तुला भेटण्याची मला खोड होती..

निघाली न सुर्यातही आग तितकी..
व्यथेला कुठे माझिया तोड होती....

गझल: 

प्रवास


झोप काढली झकास आहे
तरी मासळी गळास आहे!


माळी बघतो स्वप्न नफ्याचे
कीड गोमट्या फळास आहे


कशी माजली बेपर्वाई
पर्वा याची कुणास आहे?


लाल सरींनी धरा भिजे अन -
क्रूर निळाई नभास आहे


पाट्या टाकत सूर्य चालला
गार शहारा उन्हास आहे


पिकते येथे ज्वार-बाजरी
आणि मागणी गव्हास आहे


काल उगाचच खुशीत होतो
आज अकारण उदास आहे...


कुणी उतरतो, कोणी चढतो
अव्याहत हा प्रवास आहे




गझल: 

एक फोन कर...


नको उभारू असा दुरावा एक फोन कर..!
ठरेल खोटा तुझाच दावा एक फोन कर..!

असे कशाला एकएकटे झुरायचे तू;
अर्धा वाटा मला मिळावा एक फोन कर..!

नकोस बोलू एक शब्दही... फक्त रिंग दे..
तुझा अबोला मला कळावा एक फोन कर..!

म्हणायची हक्काने मजला, 'घरी निघुन ये..'
पुन्हा येवुदे असा बुलावा एक फोन कर..!

'क्षणोक्षणी मी तुझी आठवण काढत असते'
ह्या गोष्टीला काय पुरावा...? एक फोन कर..!



गझल: 

Pages