गझल

गझल

भ्रम.....


अशीच रोज ती मला लपून पाहते...
पहावया नको कुणी जपून पाहते...

जरी असोत शेकडो उरात यातना
तरी मलाच रोज ती हसून पाहते...

मनातले अनेकदा लिहून फाडले
तरी पुन्हा मनातले लिहून पाहते...

उगाच पाडला पदर कशास तू गडे?
उगाच का अशी मला लवून पाहते...?

कधीतरी करेन मी तिचीच वाहवा
अशा भ्रमात रोज ती सजून पाहते...

कळेन एकदा मला तिच्या मनातले
म्हणून ती अबोलता सहून पाहते...

करावयास सिद्ध ही पवित्रता तिची
स्वत्:च विस्तवात ती जळून पाहते...

गझल: 

पारिजात


पेटली तुझी धरा नि मी अधीर आसमंत...
ये समीप तू अजून मज बघायचा दिगंत....

चुंबिलेस ज्या फुलास; त्यास लाभला सुवास.....
वाहतो जणू नसात साजणे तुझ्या वसंत...

पाहते उभी दुरून; मौन व्यर्थ पांघरून....
आणखी कितीक वेळ पाहशी तुझाच अंत.....

कोरलीस तू अखेर; काळजावरी लकेर...
टाकले करून आज जीवनास भाग्यवंत....

काल मी तुझ्या तनात; ठेवलाय पारिजात...
दूर दूर चांदण्यात हीच बातमी ज्वलंत....


गझल: 

वार कुणावर...

वार कुणावर माझ्याच्याने करवत नाही
घाव मनावरचे मी माझ्या मिरवत नाही...


कुणासारखे बनणे नाही जमले मजला
उगीच कित्ते कुणाचेच मी गिरवत नाही...


व्यवहाराने जीवन जगतो, हिशेब करतो
हट्ट मनाचे आताशा मी पुरवत नाही...


वचन मागणे बरेंचदा मी टाळत असतो
शब्द दिलेला कधीच मी पण फिरवत नाही...


बेत सारखा का बदलत जातो असा तुझा?
तुला भेटण्याचे मी आता ठरवत नाही...


गप्प राहतो म्हणून माझी असली थट्टा?
तुझी खोड तर अजूनही मी जिरवत नाही...

गझल: 

ज्वानी भरात आहे, मदमस्त रात आहे...!


                     ज्वानी भरात आहे,मदमस्त रात आहे.

                      ज्वानी भरात आहे, मदमस्त रात आहे
                     मुखचन्द्र मेनकेचा, माझ्या करात आहे

                     जो ना दिसे कधीही, का पूजिता तयाला?
                     नारायणास शोधा, नक्की नरात आहे

                    फिरवून बोट माझे, ह्या ब्रेलच्या लिपीवर,
                    मी शोधितो स्वत:ला, ह्या अक्षरात आहे

                    मी खोदतो कधीचा, आटून जाय तॄष्णा,
                    केंव्हा मिळेल पाणी, कुठल्या थरात आहे?

गझल: 

गेले हळूच जेव्हा मी चोरपावलांनी...

गेले  हळूच जेव्हा मी चोरपावलांनी...

गेले  हळूच जेव्हा मी चोरपावलांनी...
केला दगा जरासा माझ्याच पैंजणांनी

सांगावयास येथे उरले न आज काही
केली कशास गर्दी डोळयात आसवांनी?


स्वप्नात भेटण्याचे देते वचन हरीला 
राधेस कैद केले  या रीतशृंखलांनी 


होते दडून काही भलतेच शब्द ओठी
लागे मला सुगावा त्यांच्याच त्या खुणांनी


कोणी हसून गेले, कोणी रडून गेले
खोटीच वाहिलेली श्रद्धांजली फुलांनी

गझल: 

जाहिरात - अभिषेक उदावंत

लावली छातीस माती
सुर्य आला सहज हाती ...

देव नाही देत भाकर
सांगतो ठोकून छाती...

हात केला वर जरासा
लागले आकाश हाती...

बंद खिडक्या बंद दारे
स्वागताच्या जाहिराती...

रक्त जेव्हा थंड होते
बंद पडते, सर्व क्रांती...

जा विचारा विट्ठलाला
फालतू आहेत जाती...


कोरडा पाऊस आला
अन् करपली सर्व नाती !
                    - अभिषेक उदावंत 
( संवेदना रायटर्स कम्बाईन, अकोला )

गझल: 

बस जराशा मी पणाने....

तोडली तू सर्व नाती बस जराशा मी पणाने....
राहिले काही न हाती बस जराशा मी पणाने....

वाहवा करुनी तुझी बघ काम त्यांनी काढले अन्
तू फुगवली फक्त छाती बस जराशा मी पणाने....

लोक आता त्रासले, कंटाळले दुर्लक्षिण्याला..
एकदा घडणार क्रांती बस जराशा मी पणाने....

आसमंती पोचली असली तुझी किर्ती जरीही...
शेवटी होणार माती बस जराशा मी पणाने....

मारल्या गेलेत लाखो,मारल्या जातील लाखो..
लोक झाले आत्मघाती बस जराशा मी पणाने....

गझल: 

दरवळ

कुणास कळते ह्रदयाची कळ
अपुले आपण असतो केवळ.

असे कसे हे अपुले नाते...
मला घाव अन् तुला कसे वळ?

कुठून आणू उसने मागुन
पुन्हा पुन्हा मी जगण्याचे बळ.

कितीक द्यावी स्पष्टीकरणे...
कितीक   आपण काढावा पळ ?

तुला भेटुनी खरेच पटले ....
उगीच नव्हती माझी तळमळ .

तुला बिलगुनी आला वारा
इथे अचानक सुटला दरवळ!

अमोल शिरसाट.
संवेदना रायटर्स कम्बाईन, अकोला.

गझल: 

Pages