गझल

गझल

स्वप्न आता पापणीला छळत नाही

                           स्वप्न आता पापणीला छळत नाही
                           सत्य कुठले भास कुठला कळत नाही


                           मी किती वेळा तुला सांगू कहाणी?
                           राम वनवासात जाणे टळत नाही


                           तीच तू ,अन चंद्रही तो ,तोच मी ही
                           (रक्त आहे तेच पण सळसळत नाही)


                           मी कुणाचा चाहता वा शिष्य नाही
                           पायवाटेला जुन्या मी वळत नाही

गझल: 

वेग माझ्या पालखीचा मंद होता..

                     वेग माझ्या पालखीचा मंद होता                                     

                     वेग माझ्या पालखीचा मंद होता
                     आसवांचा पूर नि स्वच्छंद होता

                     ओठ राधेचे अता परके तरीही,
                     आजही ओठांवरी 'मकरंद' होता

                     तेच अश्रू ढाळले, जे तू दिलेले,
                    काय मज ह्या आसवांचा छंद होता?

                    'बघ जरा, आलोय मी', तु बोलला पण,
                     जाहला रे श्वास माझा बंद होता

गझल: 

..सरल्या गझलाहातावरच्या सरल्या गझला
रेषांसम ह्या ठरल्या गझला


ह्या हृदयीच्या कुरणावरती
झाल्या गायी ... चरल्या गझला


ती गेल्यावर श्रावण आला
डोळ्यांमधुनी झरल्या गझला


मी सापडलो, गठलो नाही ..
..त्यांनी माझ्या धरल्या गझला


जे बुडवाया आले होते,
तेही बुडले... तरल्या गझला


ही मैफल की भरला अड्डा...!
मी माझ्या आवरल्या गझला


असताना मी पुसले नाही..
..गेल्यावर वापरल्या गझला

गझल: 

काही असे घडावे

काही असे घडावे
नजरेस तू पडावे


स्वप्नात शोधिले ते
सत्यात कां दडावे?

वैरीहि तो असा की
मन त्यावरी जडावे

मी मागता फुले,कां
सारे बहर झडावे?

मी कोण,काय होतो
की मज कुणी रडावे ?

 

जयन्ता५२

 

गझल: 

...काय फायदा ?

...काय फायदा ?

काढू तुझा कशास माग...? काय फायदा ?
सारा वृथाच पाठलाग...काय फायदा ?

तुज आठवून चांदणे मिळेल का कधी...?
मिळणार फक्त आग आग...काय फायदा ?

गेले घडायचे घडून....जे घडायचे...
कोणावरी धरून राग...काय फायदा ?

स्वार्थी  सवाल हाच सारखा मला छळे  -
`केलास तू कशास त्याग...? काय फायदा ?`

लागायचा कलंक, लागलाच शेवटी...
आता धुऊन डाग डाग...काय फायदा ?

जमवून ठेवलेत फक्त शून्य शून्य तू...
गुणलेस वा  दिलास  भाग...काय फायदा ?

गझल: 

...जाऊ दे मला !

...जाऊ दे मला !

सोड माझा हात...जाऊ दे मला !
फार झाली रात...जाऊ दे मला !

मी मलाही ओळखेनासा जिथे...
त्या स्थळी अज्ञात...जाऊ दे मला !

मी नवा झालो; मला रोखू नको...
टाकली मी कात...जाऊ दे मला !

ज्या ठिकाणी गार होतो जीव हा...
त्या ठिकाणी जात जाऊ दे मला !

पायरी सोडून माझे मागणे -
`उंबऱयाच्या आत जाऊ दे मला ! `

मी कशासाठी खरे-खोटे करू...?
- घाल तू रुजवात...जाऊ दे मला !

वाट मौनाची जरी आहे तरी...
गीत माझे गात जाऊ दे मला !

या कथेचा अंतही मी जाणतो...
ऐकली सुरवात...जाऊ दे मला !

गझल: 

सवाल...

गावात वंचनेच्या माझा महाल होता..
काखेत दु:ख ज्याच्या तो द्वारपाल होता..

"बदलू कसे स्वतःचे गर्भात लिंग आई..?" 
निष्पाप अर्भकाचा साधा सवाल होता..!!

 बेभान आसवांनी केली अशी कमाई;
आजन्म ठेवलेला ओला रुमाल होता...!

गर्भात प्रेत माझ्या निष्पाप अर्भकाचे;
आयुष्य भोगणारा मृत्यू दलाल होता..

कोड्यात संयमाच्या संन्यास हेलकावे..
आसक्त उत्तराचा जेथे सवाल होता..!

गझल: 

लगाम


वारूस यौवनाच्या नाही लगाम आता
चाऱ्यास चरस, गांजा, पाण्यास जाम आता

पाडाव पांडवांचा युद्धात का न व्हावा?
कॄष्णात जर तयांच्या, उरला न राम आता

पैसाच देव झाला, पैसाच धर्म झाला
पैश्यास पूजते ही जनता तमाम आता

हे सत्य स्वस्त झाले, लाचार अन अहिंसा
बापू तुम्ही नि तुमची, तत्वे निलाम आता

भगवान आजचा हा, भगवान तो उद्याचा
सूर्यास उगवतीच्या सारे सलाम आता

दु:खातही हसावे, जे सांगती दुज्यांना
सारी सुखे तयांच्या, चरणी गुलाम आता

गझल: 

Pages