लगाम
Posted by मिल्या on Monday, 8 October 2007
वारूस यौवनाच्या नाही लगाम आता
चाऱ्यास चरस, गांजा, पाण्यास जाम आता
पाडाव पांडवांचा युद्धात का न व्हावा?
कॄष्णात जर तयांच्या, उरला न राम आता
पैसाच देव झाला, पैसाच धर्म झाला
पैश्यास पूजते ही जनता तमाम आता
हे सत्य स्वस्त झाले, लाचार अन अहिंसा
बापू तुम्ही नि तुमची, तत्वे निलाम आता
भगवान आजचा हा, भगवान तो उद्याचा
सूर्यास उगवतीच्या सारे सलाम आता
दु:खातही हसावे, जे सांगती दुज्यांना
सारी सुखे तयांच्या, चरणी गुलाम आता
लखलाभ हो तुम्हाला, दुनिया खुशाल तुमची
म्हणतो 'मिलिंद' माझा, घ्या रामराम आता
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
सोम, 08/10/2007 - 17:59
Permalink
छान !!!
मिल्या, छान खणखणीत गझल आहे. स्वागत आहे. कल्पना नेहमीच्या असल्या तरी चांगल्या मांडल्या आहेत. मतल्यातली वरची ओळ मस्त झाली आहे. खालच्या ओळीतला जाम थोडा खटकला. पैशाचा शेर सफाईदार,मस्त झाला आहे. 'तयांच्या' शक्य झाल्यास टाळावे, असे माझे मत.
दु:खातही हसावे, जे सांगती दुज्यांना
सारी सुखे तयांच्या, चरणी गुलाम आता
वाव्वा.. हा शेर सर्वात आवडला. ते सांगती जगाला दुःखातही हसावे .. असा शब्दक्रम ठेवल्यास काय सांगतात ह्याचा सस्पेन्स राहतो , असे मला वाटते.
प्रदीप कुलकर्णी
सोम, 08/10/2007 - 18:37
Permalink
मस्त
स्वागत...
पाडाव पांडवांचा युद्धात का न व्हावा?
कॄष्णात जर तयांच्या, उरला न राम आता....मस्त
भगवान आजचा हा, भगवान तो उद्याचा
सूर्यास उगवतीच्या सारे सलाम आता....छान
शुभेच्छा...!
प्रज्ञा
सोम, 08/10/2007 - 19:06
Permalink
उरला न राम आता
पाडाव पांडवांचा युद्धात का न व्हावा?
कॄष्णात जर तयांच्या, उरला न राम आता
फारच छान आहे हा शेर. गझ्ल आवडली.
नितीन
मंगळ, 09/10/2007 - 17:20
Permalink
भगवान आजचा हा, भगवान तो उद्याचा
भगवान आजचा हा, भगवान तो उद्याचा
सूर्यास उगवतीच्या सारे सलाम आता
दु:खातही हसावे, जे सांगती दुज्यांना
सारी सुखे तयांच्या, चरणी गुलाम आता
सुंदर! येऊ द्या अजून...
मिल्या
बुध, 10/10/2007 - 12:00
Permalink
धन्यवाद
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद...