गझल
गझल
कुठे नेतील या वाटा मनाला....
Posted by अनंत ढवळे on Saturday, 24 November 2007निवारा जन्मभर देऊन गेली
चुकुन रस्त्यात झाडे गवसलेली
कुठे नेतील या वाटा मनाला
तुझ्या डोळ्यात शून्ये उमटलेली
पिवळसर तावदानांवर वयाच्या
थिजुन बसलीत वर्षे ...निसटलेली
'गालिब'च्या गजलेचा भावानुवाद
Posted by अजब on Saturday, 24 November 2007
कोणती इच्छा सफल होत नाही
कुणाचा चेहरा मला दिसत नाही...मृत्यु निश्चित एकदा आहे तरी
रात्रभर का झोप मजला येत नाही?...हसू यायचे परिस्थितीवर पूर्वी
मी अता कशावरही हसत नाही...मी जिथे आहे तिथे आज मजला
बातमी माझी स्वतःची मिळत नाही!...काहि कारण गप्प मी आहे खरा
अन्यथा का बोलणे जमत नाही?...मी मरेस्तो वाट बघतो मृत्युची
मरण येते; पण तरीही येत नाही... (अजब)मूळ गजलः
कोई उमीद बर नही आती
कोई सूरत नजर नही आती...
गुंता
Posted by पुलस्ति on Friday, 23 November 2007कवडसा
Posted by बापू दासरी on Friday, 23 November 2007कंकण हळुहळु टिचले रात्री
दु:ख जगाचे थकले रात्री
नवोदयाचा ध्यास उशाला
स्वप्न पांघरुन निजले रात्री
खूप डिवचुनी मला चिडवुनी
दीप अचानक विझले रात्री
मिणमिणता आतुर कवडसा
बंध गाठिचे सुटले रात्री
कवेत घे ही गझल राजसा
अधर तुझे पुटपुटले रात्री
_____________बापू दासरी, नांदेड
गझल
Posted by मिल्या on Thursday, 22 November 2007बोल प्रेमाचे तुझ्या ओठात होते
कोण जाणे काय पण पोटात होते
माणसाला दंश करता सर्प मेला
जहर इतके मानवी रक्तात होते
रंगता मैफल मनी तव आठवांची
हुंदक्यांची भैरवी मी गात होते
जाळते आयुष्य पळ पळ काळजाला
राख स्वप्नांची उरी दिन-रात होते
साठते पाण्यात शेवाळे जसे, ते
साचलेपण आपल्या नात्यात होते
जीवनाच्या चक्रव्यूहा भेदती जे
अंश का असले अता गर्भात होते?
असोशी....
Posted by अमित वाघ on Tuesday, 20 November 2007भेटण्याची राहिली नाही असोशी...
जोडला संबंध आत्म्याचा तिच्याशी...
हाय संपत्ती कमवली एवढी की
मी सदाही ठेवतो चाकू उशाशी...!
काय अपवादा तुझा खोटा जिव्हाळा..!
जोडला संबंध तू साध्या जगाशी...!!!
मुक्त झाला देवही इतरांप्रमाणे..
ठेवले त्याने मला जेव्हा पुजेशी..!
खोल मी माझ्या मुळा मातीत नेल्या..
मग कुठे संपर्क केला मी नभाशी...
अमित वाघ."गुरूमंदिर" सुधीर कॉलनी, अकोला-४४४००१.
मोबाईल नं. :- ९८५०२३९८८२, ९९७०१६७५७२.
अजून कोणी तरी मनाशी...(जुनी)
Posted by संतोष कुलकर्णी on Wednesday, 14 November 2007
कुणास नाही तरी मला तो दिसतो आहे
अजून कोणी तरी मनाशी वसतो आहे
मला असे भान भावनांचे.., पण हा वेडा,...
...धरून हातात इंद्रियांना हसतो आहे...!
मलाच माझ्या सुसाटतेचे भय का वाटे..?
कुठे पळावे.. किती पळावे...?..पुसतो आहे..
बटा तुझ्या आवरून घे ना, सखये, बाई...
सुगंध हा बावऱ्या मनाला डसतो आहे
कळे मला भास जीवनाचा छळतो आहे..!
..तरी पुन्हा श्वास घेत का मी फसतो आहे..?
पुन्हा कुणाच्या सभेत मी रे कसचा जातो..?
इथे मला मैफलीत जो तो हसतो आहे..!