कोजागिरी
जपले मनातल्या मनात चांदणे
हृदयात चंद्र काळजात चांदणे
होतो चकोर जीव, बोलताच तू
झरते तुझ्या स्वरास्वरात चांदणे
आहे सभोवताल वाळवंट... पण
झळ लागते न ज्या घरात चांदणे
मी पाहिले तुला, न व्यर्थ भास हा
आले भरात, भर उन्हात चांदणे
कोजागिरी जणू मधाळ पत्र हे
मजकूर चंद्र,अक्षरात चांदणे
नाहीत अक्षता,नकोत मंत्र ही
सजल्यात तारका,वरात चांदणे
बघताच तू हसून, रात्र झगमगे
उजळे तुझ्याच चांदण्यात चांदणे
प्रमोद बेजकर
प्रतिसाद
पुलस्ति
सोम, 22/10/2007 - 19:10
Permalink
क्या बात है!!
अगदी 'चढत' जाणारी गझल!
कोजागिरी - अहाहा! सुरेख, सुरेख शेर आहे प्रमोदजी!
वरात - मस्तच...
"तुझ्याच चांदण्यात" - फारच छान!!
-- पुलस्ति.
चित्तरंजन भट
मंगळ, 23/10/2007 - 16:26
Permalink
चांदण्यात चांदणे
स्वरास्वरात, अक्षरात, चांदण्यात चांदणे मस्त आहे. समयोचित गझल आवडली.
प्रदीप कुलकर्णी
मंगळ, 23/10/2007 - 23:20
Permalink
वा...ला... छान गझल
वा. वा. प्रमोदराव, छान गझल.
होतो चकोर जीव, बोलताच तू
झरते तुझ्या स्वरास्वरात चांदणे
मी पाहिले तुला, न व्यर्थ भास हा
आले भरात, भर उन्हात चांदणे
नाहीत अक्षता, नकोत मंत्र ही
सजल्यात तारका,वरात चांदणे
हे शेर फारच आवडले. शुभेच्छा.
जयन्ता५२
बुध, 24/10/2007 - 11:21
Permalink
चांदणी चौक!
डॉक्टर,
ये चीज बडी है मस्त! चकोर, अक्षता वगैरे शेर झकास!
तुम्हाला गाठायचे असेल तर 'चांदणी चौका'त खात्रीने सापडाल!
प्रेमळ सल्ला
आता ह्या गझल नंतर या पुढे 'मला गझल लिहणे कठीण वाटते' वगैरे म्हणणे सोडून द्या!..
जयन्ता५२
कुमार जावडेकर
गुरु, 25/10/2007 - 22:36
Permalink
वा!
वा! सुंदर गझल...
कोजागिरी जणू मधाळ पत्र हे
मजकूर चंद्र,अक्षरात चांदणे - वा! वा!
- कुमार