जे कधी न जमले मजला
जे कधी न जमले मजला
जे कधी न जमले मजला, इतरांना जमले होते...
मज साधे घर नसताना, त्यांचे तर इमले होते !
मी वाट तुझी बघताना, नुसतेच न शिणले डोळे;
प्रत्येक वळण वाटेचे, कंटाळुन दमले होते !
त्या घेराव्यातच मजला, जी झाली धक्काबुक्की..
माझ्यावर ते कुसुमांचे, हारांतुन हमले होते !
तांबडे फुटेतो तू-मी, त्या रात्री जागत असता,
विझण्याचे विसरुन तारे, चमकण्यात रमले होते !
एकांती ऐकू आली, मज बालपणीची गाणी,
पाखरू मनाचे माझ्या, वळचणीस घुमले होते !
होकार घेउनी जेव्हा, आलीस अंगणी माझ्या,
नवसाच्या प्राजक्ताचे, झाडच घमघमले होते !
मी गझल गुणगुणत माझी, रस्त्याने चालत होतो..
आकाश मजपुढे तेव्हा, अदबीने नमले होते !
-वा.न.सरदेसाई
२/४, ’रत्नभिमा’ हौ. सोसा.
आचार्य हॉस्पिटल जवळ,
वली पीर रोड,
कल्याण (पश्चिम)- ४२१,३०१
फोन- ०२५१-२३१०७५७
प्रतिसाद
चित्तरंजन भट
सोम, 24/12/2007 - 14:42
Permalink
सुंदर!
मी वाट तुझी बघताना, नुसतेच न शिणले डोळे;
प्रत्येक वळण वाटेचे, कंटाळुन दमले होते !
वाव्वा!
एकांती ऐकू आली, मज बालपणीची गाणी,
पाखरु मनाचे माझ्या, वळचणीस घुमले होते !
वाव्वा!
हे दोन शेर फारफारफार आवडले.
प्रदीप कुलकर्णी
सोम, 24/12/2007 - 17:26
Permalink
अप्रतिम....
अप्रतिम गझल....
सरदेसाईसाहेब, मी तुमचा जुना चाहता आहे...!
खूप वर्षांपूर्वी तुम्हाला पत्र लिहिले होते. तुमचेही उत्तर तातडीने आले होते. त्यावर आज तुमच्या गझलेतून भेट होत आहे. बरे झाले. आनंद वाटला. तुमचा गझलसंग्रह पुण्यात विकत कुठे मिळेल...सांगू शकाल काय...?
तुमच्या आणखीही अनेक गझलांच्या प्रतीक्षेत...
आपला, ़
प्रदीप कुलकर्णी
पुलस्ति
मंगळ, 25/12/2007 - 07:28
Permalink
वा!
गझल खूप आवडली! पाखरू, प्राजक्त आणि वळण हे शेर तर विशेषच!!
अनंत ढवळे
मंगळ, 25/12/2007 - 08:28
Permalink
चांगला शेर
एकांती ऐकू आली, मज बालपणीची गाणी,
पाखरु मनाचे माझ्या, वळचणीस घुमले होते !
अतिशय सुंदर शेर !
मयुरेश साने
बुध, 12/01/2011 - 23:52
Permalink
अप्रतीम गझल....तोड नाही
अप्रतीम गझल....तोड नाही