गझल

गझल

गलबत कुठे निघाले

गलबत कुठे निघाले, नक्की कुणा विचारू?
पाणी सभोवताली, मी एकटा उतारु !

माझे न काम होई घालून हेलपाटे
कोणास लाच देऊ, पैसे कुणास चारू?

या धुंद लोचनांची चढली नशा अशी की,
त्यांच्यापुढे फिके हे - गांजा, अफू नि दारू

सुकले गवत म्हणाले कोमजेल्या कळीला,
'' त्या सावळ्या घनाला ये चल पुन्हा पुकारु"

आहेच मी बिलंदर, आहेस तू हरामी
दोघे मिळून आता दुनियेस या सुधारू

गझल: 

जन्म एक मध्यरात्र वाटतो

जन्म एक मध्यरात्र वाटतो
मग तुला स्मरून मी पहाटतो

ज्यापुढे उडून दाखवायचे
तोच आपला पतंग काटतो

ती मला बघून उर्दुळाळते
अन् तिला बघून मी मर्‍हाटतो

हा नको म्हणूस फक्त ओंडका
एक ओंडकाच जग कलाटतो

मी सडाफटिंग राहतो जगी
मी मनामधे कुटुंब थाटतो

राखली किती कसून गुप्तता
आपला विषय तरी चव्हाटतो

बांध फाटके किती शिवायचे
रोज पापण्यांत पूर दाटतो

विठ्ठला पुन्हा मला झपाट तू
आणि मी पुन्हा तुला झपाटतो

~ वैवकु :)

गझल: 

माणसांना माणसांचे

माणसांना माणसांचे वागणे कोडेच होते
ते असे का वागले, हे नेहमीचे पेच होते

हे असे माझे तुझे करण्यात सारा वेळ गेला
मान्य आहे ना तुलाही - आपले चुकलेच होते?

आज आता सारखा मी का जगाला बोल लावू?
उत्तरे माझीच होती, प्रश्नही माझेच होते

तू उगीचच अर्थ मोठा शोधला होतास तेव्हा
शब्द जे बोलून गेलो ते तसे साधेच होते

पेन्सिलीने काढताना सर्व काही छान असते
कुंचल्याने रंगल्यावर चित्र ते भलतेच होते

गझल: 

पायथा बांधायला आधार नव्हता जोरकस

पायथा बांधायला आधार नव्हता जोरकस
देणग्यांच्या जाहिराती झाकती आता कळस

सोडली देवास कन्या, पूत्र दे देवा म्हणत
त्या मुलीला पूत्र झाला, देव चुकला की नवस

आणले आहेत आपण खुद्द......हे दुर्लक्षुनी
बोलतो प्रत्येकजण की काय हे आले दिवस

पोलक्याची पाठ खेचे सभ्यतेला खालती
चेहर्‍याचा राग बोले बघ मवाल्याची हवस

ह्या समाजाला स्वतःची आसवे पुरतात की
पावसाला सांग मित्रा तू हवे तेव्हा बरस

मन असे का तडफडे हे तू विचारावेस ना
का दुराव्याची कधीही टोचली नाहीस लस

गझल: 

पिणे सोडले मी….

गळया भोवती नेहमी फास आहे
तरी जिंदगीची मजा खास आहे

अशी भाव खाते जशी अप्सरा ती
तिचा एवढा फक्त मज त्रास आहे !!

(अशी भेटते की कधी भेटली ना !
तिच्या भेटण्याची तऱ्हा खास आहे )

जगाला जरी वाटतो मी यशस्वी
तिच्या सर्व विषयात नापास आहे … !!

नसे राम आता तसा राम बापा
अता दशरथालाच वनवास आहे !

पिणे सोडले मी कधीचे तरीही
मला सांगती ते मुखा वास आहे !

-- अरविंद पोहरकर

गझल: 

तुझे आच्छादलेले जग मला सांगून जाते

तुझे आच्छादलेले जग मला सांगून जाते
कुणाची सावली जाते, कुणाचे ऊन जाते

कुणीही दाखवा.....आम्ही तिचा सत्कार ठेवू
नदी......जी सागरापाशी मनापासून जाते

तिच्या संधीप्रमाणे वागण्याचा राग येतो
कधी येथून जाते ती कधी तेथून जाते

तश्या जातात काही पालख्या दुर्लक्षिलेल्या
जसे आयुष्य हे माझे तुझ्यावाचून जाते

तुम्हाला येत नाही का अशी अडचण कधीही
जिथे जाऊ नये हे मन तिथे हटकून जाते

कुणाला दु:ख होते ऐकुनी माझी स्थिती अन्
मला माहीत आहे कोण आनंदून जाते

कधी येईल यंदाचा...... कुठे सांगून गेले
कृतघ्नासारखे का वागले मॉन्सून जाते

गझल: 

भलतीच मर्यादीत ह्यांची झेप आहे

भलतीच मर्यादीत ह्यांची झेप आहे
उड्डाण घेण्याला म्हणे आक्षेप आहे

बाकी कुणाला दोष मी देऊ कशाला
मी मी स्वतः असणेच हस्तक्षेप आहे

जेथे हवे तेथे मला घेऊन जा तू
माझी तुझ्यापर्यंत केवळ ठेप आहे

सृष्टी इथे स्थापून जाणारा मिळेना
कोणास ही पडली नको ती खेप आहे

हा कोण आहे नेमका काही कळेना
नुसता युगांवरती युगांचा लेप आहे

-'बेफिकीर'!

गझल: 

एवढे नसते जलद आयुष्य सरण्यासारखे!

एवढे नसते जलद आयुष्य सरण्यासारखे!
हाय, गेले लोक जे नव्हतेच मरण्यासारखे!!

शेवटाचा श्वास घेताना कळाले हे मला.........
खूप काही शक्य आयुष्यात करण्यासारखे!

याचसाठी मी हवाली जाहलो लाटांचिया......
अन् तसेही हे न गलबत फार तरण्यासारखे!

हे गमक माझ्या यशाचे फक्त शिखरे जाणती.........
पाय माझे पांगळे पण, ते न हरण्यासारखे!

वाळवंटातील यात्रेने मला समजावले.........
की, असे मृगजळ पखालीतून भरण्यासारखे!

कोण जाणे, माळरानावर कशी जमली गुरे?
या इथे ना राहिले काहीच चरण्यासारखे!

गझल: 

Pages