गझल

गझल

चोर

चोर आपल्या मनातले तू कुठे कधी अन कसे लपवशिल
किती जरी मुखवटे ओढले ते तुजला नक्की ओळखतिल

कट माझ्या म्रुत्यूचा त्यांच्या गोटामध्ये शिजवत होते
मी दिसल्यावरती ओरडले,तू तर शंभर वर्षे जगशिल

त्यांचे हसणे पहावयाचे असले तर मी दु:खी होतो
मी हसताना दिसलो तर मग निश्चित ते सारे हळहळतिल

सावधानता बाळगतो मी जेव्हा तेव्हा दगाच होतो
आलबेल असते सारे जेव्हा मी असतो खुशाल गाफिल

नको उभारु स्मारक,पुतळे,इमले तुझिया आठवणींचे
तू जाशिल "कैलास"निघोनी तुझी अक्षरे इथेच असतिल

-- डॉ.कैलास गायकवाड

गझल: 

काय नभाची आहे इच्छा पाहू...

काय नभाची आहे इच्छा पाहू
कसा बरसतो पाउस यंदा पाहू

डोळ्यांची तर तहान भागत आहे
ओठांची मिटते का तृष्णा पाहू

दूर स्वत:पासून जरासे जाऊ
अन् थोडा अपुलाच तमाशा पाहू

करपवणारे ऊन पाहुनी झाले
गोठवणार्‍या आता गारा पाहू

जगण्याची कातडी बडवतो आहे
बघणारा धरतो का ठेका पाहू

बघू कोणते पाउल अंतिम ठरते
कुठे जाउनी सरतो रस्ता पाहू

सोंगुन झाले पीक अता स्वप्नांचे
मळणीचाही क्षण येतो का पाहू

- वैभव देशमुख

गझल: 

हुंदका उरातच गोठवायचा आहे

हुंदका उरातच गोठवायचा आहे
हा त्रास मला कोळून प्यायचा आहे

चालला कुठे हा कळप झुरत हरणांचा
का , पुढे 'सुखांचा झरा' यायचा आहे

कोरंट तरी आपली फुलुन येते का
अन् तुला नवा फुलबाग घ्यायचा आहे

"नागरीक"चा एवढा अर्थ आहे की
हा देश मलाही वाचवायचा आहे

तो समोर ठेविल वेगवेगळ्या इच्छा
तू तुझा इरादा ओळखायचा आहे

बोलवेन तेव्हा काम टाकुनी ये तू
बस् तुला ....एक झोकाच द्यायचा आहे

लागेल मला ज्या क्षणी झोप जन्माची
विठ्ठला तुला 'पाळणा' गायचा आहे

~वैवकु

गझल: 

नीट वाच...!

कविवर्य सुरेश भट यांचा आज (15 एप्रिल) जन्मदिन.
त्यांना विनम्र आदरांजली.
................................................................

............................................
नीट वाच...!
............................................

ही निष्कर्षाची कशास इतकी घाई ?
वेड्यात मला काढून शहाणा जाई...

हा काळ निर्दयी नागवतो सगळ्यांना...
आयुष्य न देई कशाचीच भरपाई

मज मधून येते जाग उदास सुरांनी...
कोणास्तव गाते रात्र मुकी अंगाई ?

मी जुनेच, सारे जुने आठवत बसतो...
मज जुनेपणाची कशास ही नवलाई ?

गझल: 

विषारी केव्हढे वातावरण आहे

विषारी केव्हढे वातावरण आहे
कसा फुत्कारतो कण आणि कण आहे

तुझे हे शहर तर फिरते मसण आहे
मरणघाईत का प्रत्येक जण आहे

कुणी इथली हवा निर्धोक नासवली
कुणी केले नभाचे अपहरण आहे

जणू वस्तीत लखलखत्या अभावांच्या
सनातन चालला अंधारसण आहे

कधी बळकावणे जमलेच नाही तर
इथे विधिवत सुरू सीताहरण आहे

मशागत तू कशी केलीस जमिनीची
इथे तर माजले नुसतेच तण आहे

भयानक हा सरळ नुसता सरळ रस्ता
कधी येणार धोक्याचे वळण आहे

क्षणी एका उभे आयुष्य उलगडते
जणू आयुष्य म्हणजे एक क्षण आहे

गझल: 

"दारू"

कातरवेळी दु:ख दाटते...''तिकडे'' नकळत जातो
नुसती दारु घसा जाळते....अश्रू मिसळत जातो

तुझ्या नकाराची दाहकता तीव्र एवढी आहे
मेण जळावे तसाच हल्ली मीही वितळत जातो

सुगंध येतो जखमांना हल्लीहल्लीच कळाले
मी गेल्यावर दुनिया म्हणते...कोण दरवळत जातो?

फुटेल हा कातळसुद्धा या वेड्या आशेवरती
ओघळणारा होतो पण मुद्दाम कोसळत जातो

किती जरी तू लांबवशिल '' कैलास '' वेळ जाण्याची
काळ गळ्याभोवतील दो-या खचित आवळत जातो

--डॉ.कैलास गायकवाड

गझल: 

किती?

मी करावा निवाडा जगाचा किती ?
कौल घ्यावा स्वतःच्या मनाचा किती ?

केशरी सांजवेळी, सकाळी निळे
माग काढू अशा अंबराचा किती ?

प्रेम सर्वांवरी खूप केले तरी
शेवटी राहिलो मी कुणाचा किती ?

ऐकली मी तुझ्या अंतरीची व्यथा
फायदा त्यात माझ्या मनाचा किती ?

हे तपासायचा लागला छंद की,
दोष माझा किती? प्राक्तनाचा किती?

गझल: 

बोचरे वारे

बेबंद फुलताना नवी कलमे इथे
धरतील कुठवर तग जुनी झाडे इथे

कुठल्याच साच्यातून मी घडलो कुठे
काहीच नाही व्हायचे माझे इथे

कपड्यांकडे पाहून हळहळतोस का
व्यक्तीत्व बघ उसवून गेलेले इथे

तू ये तुझी इच्छा कधी झालीच तर
आहे सुरू हा याग नेमाने इथे

आल्हाद नाही देत ही झुळझुळ हवा
धाडा जरासे बोचरे वारे इथे

गझल: 

Pages