गझल

गझल

अतोनात तिटकारा येतो

अतोनात तिटकारा येतो
घुसमटल्यावर वारा येतो !

सादर करते माफीनामा
खाली त्याचा पारा येतो

वादळात हरवू दे नौका
केव्हातरी किनारा येतो

रोज पहाटे स्वप्नांमध्ये
तो साराच्या-सारा येतो

त्याच्यावर मिसरा सुचताना
मोरपीशी शहारा येतो

मन आवरते दिवसाढवळ्या
रात्रीतून पसारा येतो

तो गेलेल्या रस्त्यालाही
अश्रूंचा भपकारा येतो

मिटवत जाते एक समस्या
प्रत्यय तोच दुबारा येतो

आदर्शांवर चाल जरासे
मागोमाग दरारा येतो

-सुप्रिया.

गझल: 

रस्ता देतो

दगडामध्ये थोडे पाणी असते
बाबामध्ये थोडी आई असते

तो लिहितो ते समजत नाही आता
अश्रू हल्ली त्याची शाई असते

रस्ता देतो ....त्याला अडवत नाही
ज्याला माझ्यापेक्षा घाई असते

स्वप्न तुझे मी पाहत असतो तेव्हा
झोप उगाचच माझी जागी असते

जीव अडकल्यावरती सोडत नाही
आठवणींची असली जाळी असते

.....जयदीप

गझल: 

वारे जरासे गातील काही..

वारे जरासे गातील काही
येतील काही, जातील काही

हृदयी तुझ्या मी येणार होतो
इतक्यांत दिसले आतील काही

झाकून डोळे हसलीस ओठी
कळले तुझ्या मौनातील काही

म्हण तू स्वतःला पाषाणहृदयी
ढळलेत बघ डोळ्यातील काही

घायाळ करती हृदयें हजारों
नजरा तुझ्याही कातील काही

संसार सागर जातील तरण्या
बुडतील काही, न्हातील काही

दुःखे जगाची का रंगवू मी?
जगतो सुखाने त्यातील काही

सोडू नये सुख, कुठल्या क्षणाचे
मिळते जरी अंशातील काही
किंवा / आणि
वेसण कशाला घालू सुखाला?
मिळते किती? अंशातील काही

गझल: 

जन्मतो गर्दीत आपण......संपतो गर्दीत पण

जन्मतो गर्दीत आपण......संपतो गर्दीत पण
एकटा हा...एकटा तो...एकटा प्रत्येकजण

का प्रपातासारखी ती आज कोसळली तिथे
ज्या क्षणाला जायला ती घ्यायची कित्येक क्षण

हेच अभ्यासायचे राहून गेले आमचे
मी तिला गेलो शरण की ती मला आली शरण

तेवढे सोडून सारे साजरे केलेत मी
श्रावणापासून येथे जे सुरू होतात सण

सोबतीला ठेव मित्रा चारचौघांना तुझ्या
एकटा पाहून हल्ली गाठते आहे मरण

का जिथे पाऊस आहे त्यातिथे वस्ती नसे
का जिथे पाणीच नाही त्यातिथे आहे धरण

तू कसा बघतोस ह्यावर जग कसे आहे ठरे
छान ते होईल नक्की, फक्त त्याला छान म्हण

गझल: 

ज्या क्षणी मी थांबलो, ती थांबली

ज्या क्षणी मी थांबलो, ती थांबली
सावलीने साथ नाही सोडली

स्वप्न माझे जागलेले रात्रभर
अन् पहाटे झोप येऊ लागली

लोपल्या पाऊलवाटा शेवटी
का तुझी माझ्यात वर्दळ थांबली

लागुदे जर ऊन आहे लागते
सावलीमध्ये हरवते सावली

रोज आकाशात तारा जन्मतो
काजव्याने कात असते टाकली

जयदीप

गझल: 

शेवट लिहलेला असतो सुरुवातीवरती

का विश्वासच उरला नाही छातीवरती
सवलत मागत उठतो जो तो जातीवरती

इंद्रधनूचे रंग तुझ्या जर हातामध्ये
कशी दिसेना हिरवी नक्षी मातीवरती

अलार्म लावुन निवांत झोपी जातो आपण
किती भरोसा असतो अपुला रातीवरती

चला जरा ही सुंदरतेची व्याख्या बदलू
ठरवायाचे कुठवर नुसत्या कातीवरती

इथेच सारे दिले-घेतले वसूल कर तू
मला नको आहेत येथली नाती वरती

आयुष्याची गोष्ट कळाया अवघड नसते
शेवट लिहलेला असतो सुरुवातीवरती
_________________________ शाम

गझल: 

तुझ्यासारखे वाचता येत नाही

तुझ्यासारखे वाचता येत नाही
मला माणसा परखता येत नाही

तुझ्यासारखी सहजता येत नाही
मला नेमके बोलता येत नाही

नको आज आणूस डोळ्यात पाणी
मला आजही पोहता येत नाही

तुझा राहुदे हात हातात माझ्या
मला एकटे चालता येत नाही

जरी लागतो रोज जयदीप माझा
तुझ्यासारखे तेवता येत नाही

----- जयदीप

गझल: 

तुझे घन आजही बरसून माझी आसवे गेले

हवा आनंदली थोडी विखारी गारवे गेले
तुझे घन आजही बरसून माझी आसवे गेले

जसे सांगीतले मी वाट गझलेची निवडल्याचे
तसे वाटेतुनी माझ्या सुखांचे हायवे गेले

तुझा अंधार झाल्याचे मला कळले कसे नाही
किती चमकून अत्ता आठवांचे काजवे गेले

कशाने शुकशुकाटाची अवस्था लाभली आहे
उडुन माझ्या मनातुन काय इच्छांचे थवे गेले

जगाने फार शंकावून माझी तोलली भक्ती
जगाचे पार कामातून सारे ताजवे गेले

मुळीही जात नसते विठ्ठला ती जातही गेली
तुझ्या डोहामधे उतरून माझे जानवे गेले

गझल: 

Pages