जन्मतो गर्दीत आपण......संपतो गर्दीत पण
जन्मतो गर्दीत आपण......संपतो गर्दीत पण
एकटा हा...एकटा तो...एकटा प्रत्येकजण
का प्रपातासारखी ती आज कोसळली तिथे
ज्या क्षणाला जायला ती घ्यायची कित्येक क्षण
हेच अभ्यासायचे राहून गेले आमचे
मी तिला गेलो शरण की ती मला आली शरण
तेवढे सोडून सारे साजरे केलेत मी
श्रावणापासून येथे जे सुरू होतात सण
सोबतीला ठेव मित्रा चारचौघांना तुझ्या
एकटा पाहून हल्ली गाठते आहे मरण
का जिथे पाऊस आहे त्यातिथे वस्ती नसे
का जिथे पाणीच नाही त्यातिथे आहे धरण
तू कसा बघतोस ह्यावर जग कसे आहे ठरे
छान ते होईल नक्की, फक्त त्याला छान म्हण
आसवांचे पूर अन् ताटातुटीची वादळे
सोसतो अद्याप येथे मी तुझे पर्यावरण
पोचलो आहे इथे कोणामुळे नाही स्मरत
मस्त आहे रोग साला नांव ज्याचे विस्मरण
काळज्या झाकून सार्या गाजतो आहे इथे
'बेफिकिर' हे नांव माझे फक्त आहे आवरण
-'बेफिकीर'!
प्रतिसाद
चित्तरंजन भट
सोम, 25/08/2014 - 17:15
Permalink
जन्मतो गर्दीत आपण......संपतो
जन्मतो गर्दीत आपण......संपतो गर्दीत पण
एकटा हा...एकटा तो...एकटा प्रत्येकजण
वा. मस्त ओघवता आहे शेर.
आसवांचे पूर अन् ताटातुटीची वादळे
सोसतो अद्याप येथे मी तुझे पर्यावरण
वा. सोबतीला चार जण ठेवण्याची आयड्याही चांगली आहे :)
अजय अनंत जोशी
सोम, 25/08/2014 - 18:34
Permalink
अरे,
अरे,
तुमची गझल आली की !
माझी कशी इथे प्रकाशित झाली नाही अजून ? मी तर दोन वेळा दिली होती. आश्चर्य आहे…
supriya.jadhav7
बुध, 27/08/2014 - 10:54
Permalink
मतला खास, मक्ता प्रामाणिक !
मतला खास, मक्ता प्रामाणिक !
का जिथे पाऊस आहे त्यातिथे वस्ती नसे
का जिथे पाणीच नाही त्यातिथे आहे धरण
पोचलो आहे इथे कोणामुळे नाही स्मरत
मस्त आहे रोग साला नांव ज्याचे विस्मरण
गझलही आवडलीच.
धन्यवाद !
बाळ पाटील
बुध, 27/08/2014 - 11:20
Permalink
का जिथे पाऊस आहे त्यातिथे
का जिथे पाऊस आहे त्यातिथे वस्ती नसे
का जिथे पाणीच नाही त्यातिथे आहे धरण
....... आवडली.