गझल

गझल

...देव आहे अंतरी

गझल...

तू मला टाळून कळले, लपविले जे अंतरी..
आणखी आणू नको तू आव कुठले अंतरी..!

दूर तू असतेस आता, काळजी कुठली नसे...
भेट की भेटू नको विश्वास आहे अंतरी..!

मन तुझे कळले मला शब्दांविना स्पर्शातुनी..
फारही सांगू नको तू ठेव थोडे अंतरी..!

मी तुला भेटायला इतके मुखवटे चढविले..
आणि ओळखलेस तेंव्हा भाव फुलले अंतरी..!

ती गुलाबाची कळी पाहून मी स्मरले तुला..
फुलत गेले आठवांचे रोम हर्षे अंतरी..!

आज तू पुसलेस अश्रू, पायही दमले तुझे..
केवढे छळलेस पूर्वी, काय पिकते अंतरी..?

गझल: 

जगण्याचे मातेरे होते...

जगण्याचे मातेरे होते
मग कवितेचे सोने होते

दोन दिवस मी रडलो नाही
उदास सारे झाले होते

दारोदारी झाडे होती
झाडोझाडी झोके होते

पेन रात्रभर हाती होता
पान रात्रभर कोरे होते

मी मातीत मिसळलो तिथल्या
गंध फुलांना माझे होते

- वैभव देशमुख

गझल: 

शब्द बेहोश कर..

शब्द बेहोश कर, मौन मदहोश कर
खूपसे बोललो वायफळ आजवर

थेट मरणार नाही उन्हाने कुणी
पाज अलगद कवडशांमधोनी जहर

एक शाश्वत अशी पानगळ दे मला
जीवना रे नको एक नश्वर बहर

झाक डोळे ढगानेच चंद्रा तुझे
चांदणीचा ढळू लागल्यावर पदर

खूप श्रुंगार केला ऋतुंनी तरी
सांगते काय ही वाळलेली नजर

थांबण्याएवढे भाग्य नाही तुझे
चालण्याएवढा मार्ग नाही सुकर

--सुशांत..

गझल: 

जन्म वाभरा

लक्षात येत आहे माझ्या जरा जरा
गंभीर जेवढा मी हा जन्म वाभरा

निष्णात पारध्याने आभाळ व्यापले
आता कुठे भरार्‍या घेशील पाखरा

का झाकला कुणी हा का झाकला असा
माझ्याच चेहर्‍याने माझाच चेहरा

मी वाटतोय हल्ली काळा तुझ्यामुळे
वाटायचे मला तू आहेस पांढरा

निष्पाप वाटणेही साधायला जमो
निष्पाप वागण्याची पेलायला धुरा

मी व्यक्त होत जाणे टाळायला हवे
कहीतरी करा हो काहीतरी करा

~वैवकु

गझल: 

मनाच्या अडगळीमधले बिलोरी आरसे शोधू

मनाच्या अडगळीमधले बिलोरी आरसे शोधू
तुझ्या हातून घडलेल्या चुकांची कारणे शोधू!

प्रवाहाधीन झालेल्या लुळ्या नावेतले आपण...
"कसे पोहायचे?" यावर नव्याने पुस्तके शोधू!

पिकांच्या राखणीसाठी तुला मी नेमले होते...
तुला जमणार नसले तर नवे बुजगावणे शोधू!

तुझ्या नाजूक प्रश्नांना नकोशी उत्तरे माझी...
तुला समजावण्यासाठी करारी तोडगे शोधू!

किनारा गाठल्यावरती, बढाया मारणे टाळू ..
तुला जिंकायला ज्यांनी दिले ती वादळे शोधू!

.....जयदीप

गझल: 

मागे जयजयकार चालला आहे

मागे जयजयकार चालला आहे
चौखांद्यावर स्वार चालला आहे

वाटेला पण लाज वाटली थोडी
या वाटे तो फार चालला आहे

आप्तांनाही रान मोकळे झाले
कंठाने मल्हार चालला आहे

जाळ्यामधुनी मुक्त जाहला 'तो' ही
केवळ हा उपचार चालला आहे

भाळी त्याच्या भस्म रेखिले होते
सरणावर संस्कार चालला आहे

होवो अथवा काकस्पर्श ना होवो
या पिंडातुन पार चालला आहे

भिंतीचा आधार चालला आहे
ओट्यावरचा भार चालला आहे.

-- बाळ पाटील

गझल: 

आवरण

न यावी आठवण, आहे पुरेसे
न व्हावे जागरण, आहे पुरेसे..

जरी जगलोच नाही आजसुद्धा
तरी टळले मरण, आहे पुरेसे

जगाला भासतो आहे सुखी मी
मला हे आवरण आहे पुरेसे

तुला विसरायचे आहे ठरवले
तुझे इतके स्मरण आहे पुरेसे

जिथे दिसतात मर्यादा स्वत:च्या
असे वातावरण आहे पुरेसे

पुढे मोठा कुणी होईल तो, पण
मुलाचे मूलपण आहे पुरेसे.

- ज्ञानेश.

गझल: 

झोप लागायला पाहिजे

झोप लागायला पाहिजे
जागही यायला पाहिजे

वेळ असला तुला तर बसू...
आज बोलायला पाहिजे

याचसाठी पितो रोज तो
आग विझवायला पाहिजे

खूप झाल्या नव्या ओळखी
मित्र भेटायला पाहिजे

लक्ष नाही तुझे वाटते....
हाक मारायला पाहिजे

खेळ तू हारल्यासारखा
डाव रंगायला पाहिजे

.....जयदीप

गझल: 

Pages