मागे जयजयकार चालला आहे

मागे जयजयकार चालला आहे
चौखांद्यावर स्वार चालला आहे

वाटेला पण लाज वाटली थोडी
या वाटे तो फार चालला आहे

आप्तांनाही रान मोकळे झाले
कंठाने मल्हार चालला आहे

जाळ्यामधुनी मुक्त जाहला 'तो' ही
केवळ हा उपचार चालला आहे

भाळी त्याच्या भस्म रेखिले होते
सरणावर संस्कार चालला आहे

होवो अथवा काकस्पर्श ना होवो
या पिंडातुन पार चालला आहे

भिंतीचा आधार चालला आहे
ओट्यावरचा भार चालला आहे.

-- बाळ पाटील

गझल: