गझल

गझल

क्षण तो सोसाट्याचा होता

क्षण तो सोसाट्याचा होता
वळिव तुझ्या स्पर्शाचा होता

माझ्या हाती फुलल्या बागा
गुण तुझिया पायाचा होता

माझ्या इवल्या आनंदावर
डोळा या विश्वाचा होता

सारे काही वाहुन गेले
पूर अहंकाराचा होता

आता बस इतके आठवते
बार तुझ्या नावाचा होता

बस माझ्या डोळ्यांची होती
घाट तुझ्या देहाचा होता

त्या कविता वा गझला नव्हत्या
बहर तुझ्या दुःखाचा होता

गझल: 

आपण

--------------------------------

खिन्न अंधारासवे आपण
क्षुद्र काही काजवे आपण

पंख होते आपल्यालाही
पाहिले नुसते थवे आपण

केवढा झाला जुना फोटो
केवढे झालो नवे आपण

वाढली नाही कधी तृष्णा
पीत गेलो आसवे आपण

एक वाहत राहिले पाणी
दोन झालो कालवे आपण

शोधते हे जग कधीपासुन
सापडायाला हवे आपण

-ज्ञानेश.

--------------------------------

गझल: 

बोलली डोळ्यातुनी ती आणि कविता सुचत गेली...

बोलली डोळ्यातुनी ती आणि कविता सुचत गेली, एक वाणी, एक भाषा, का कुणी नाही बनवली
व्यक्त करण्या प्रेम माझी जीभ ही अडखळत गेली, एक वाणी, एक भाषा, का कुणी नाही बनवली

बोलण्या जन्मास आली आणि हिंसक बनत गेली, एक वाणी, एक भाषा, का कुणी नाही बनवली
विखुरली धर्मात गेली, जात सांगुन विरत गेली, एक वाणी, एक भाषा, का कुणी नाही बनवली

बोलताना तोल जातो, माणसाला कळत नाही, शब्द तोंडातून गेल्यावर पुन्हा तो वळत नाही
सावरावे तू जगाला, तूच का धडपडत गेली, एक वाणी, एक भाषा.. का कुणी नाही बनवली

गझल: 

थांग मनाचा कधी गवसला

थांग मनाचा कधी गवसला ?
हा प्रवास तर मृगजळातला

धूळ जांभया देत पसरली
धूळ बघत रस्ता पेंगुळला

एक जुना अलबम उरलो मी
लोखंडाच्या पेटीमधला

सांग तुझ्या आकाशामधला
तुला कोणता तारा हसला ?

ह्या पोटाची सब्बल झाली
जन्म कसा अवघा उचकटला

समूळ आलो येथे मी पण
कोण मूळचा आहे इथला ?

स्तब्ध अचानक झाली सळसळ
मनातसुद्धा वारा पडला

गझल: 

शेर तुझ्यावर लिहिला आहे

ते होत्याचे नव्हते झाले
दुःख सुखाच्या इतके झाले

बरे बोललो आपण आता
दोघांचे मन हलके झाले

पुढे निघाले काही रस्ते
काही वसले, इथले झाले

बघता बघता जमल्या इच्छा
मन इच्छांचे घरटे झाले

पुन्हा एकदा भुकंप आला
तुकड्यांचेही तुकडे झाले

शेर तुझ्यावर लिहिला आहे
तुझ्यासारखे मिसरे झाले

जयदीप

गझल: 

वाहते चुपचाप आहे खोल पाणी

वाहते चुपचाप आहे खोल पाणी
अनगिनत अंतःप्रवाहांची कहाणी

वेगळे आयुष्यभर संसार केले
एक राजा आणि त्याची एक राणी

सांग, नक्की काय झाले काल रात्री ?
जाग का आली तुला ओशाळवाणी ?

काळ तर आलाय मित्रा प्लॅसटिकचा
वाजवू इतकी नये कलदार नाणी !

संशयालाही जराशी ठेव जागा,
हे कसे असणे तुझे ठायीठिकाणी ?

पोपटा! रे पोपटा! शिकलास कोठे ?
सांग ना, इतकी मिठू अधिकारवाणी?

आपले आयुष्य म्हणजे काय आहे ?
तेच चेह्‌रे, त्याच गप्पा, तीच गाणी

गझल: 

कैफ हा ओसाड का इतका ?

कैफ हा ओसाड का इतका ?
प्यायला आहेस मृगजळ का ?

वाळवंटी या निळाईच्या
एक विहरे मेघ पांढुरका

एक चिमणी आठवण आली
आणि मग झाला किती गलका

गडद मी खोली किती केली
रंग भिंतींचा तरी विटका

वाढली आवक गुलाबांची
वाढला दुर्गंधही सडका

काय बोहारीण ही जिनगी
आणि मी सदरा जुना मळका

राहती अद्याप काही जण
हा दिसे वाडा जरी पडका

तेवढा आहेस का नक्की ?
दाखवत आहेस तू जितका

ही खुज्यांची चालली स्पर्धा
कोण माझ्याहूनही बुटका?

केवढे आहे शहर परिचित ?
केवढा शहरास मी परका ?

गझल: 

विश्व समजू लागलो अपुल्या घराला

विश्व समजू लागलो अपुल्या घराला
पोचलो येऊन मी कुठल्या थराला

प्रार्थना माझी फळाला येत आहे
जाणवाया लागलो मी ईश्वराला

आपल्या साधेपणाची कीव आली
एक मी संधी समजलो वापराला

भेटला असता मला तर खैर नव्हती
नेत्र जो तिसरा मिळाला शंकराला

भासले होते मला मुंगीप्रमाणे
पाहिले निरखून जेव्हा अंबराला

- वैभव देशमुख

गझल: 

Pages