गझल

गझल

मागचे येतील नंतर

मागचे येतील नंतर...जा पुढे
लाव पहिला तूच नंबर...जा पुढे

लाट तू उठवू नको पाण्यावरी
शांत राहू दे सरोवर..जा पुढे

धाव जोराने, नको मागे बघू
पोच सगळ्यांच्या अगोदर.. जा पुढे

आसरा देऊ कसा, कोठे तुला ?
मी असा बेकार, बेघर...जा पुढे

जी हवी ती माणसे गेली पुढे
गाठण्या त्यांना भराभर जा पुढे

गझल: 

विचित्र

एवढा तो विचित्र आहे का
फक्त माझाच मित्र आहे का

बोलले मन मलीन जन्मांचे
या क्षणी ती पवित्र आहे का

एक फोटो जगास वाटू दे
ते तुझे एक चित्र आहे का

चित्रपट जो बघून आलो मी
तेच त्याचे चरित्र आहे का

फार ताजे अजून काही क्षण
आठवण ती सचित्र आहे का

जयदीप

गझल: 

नवी गझल

जुमानेनाच जर हे तण कशाला
इमानाने करू खुरपण कशाला

तसे राहूच आपण ओळखीचे
परंतू फ़ारशी घसटण कशाला

पुढे लागेल की नंबर तुझाही
तुला आताच ते दडपण कशाला

हवा पाणी मने सारेच दूषित
इथे नाही तुझी लागण कशाला

समेटाची गरज आहे मलाही
पुन्हा उकरू जुने प्रकरण कशाला

- विजय दिनकर पाटील

गझल: 

अनुभव

हृदय स्वतःला आठव आहे का
जर आहे तर दाखव आहे का

नाव बदलले आहे का माझे?
मानव नाही, दानव आहे का?

जो तो गातो रडगाणे येथे
हा दुःखाचा उत्सव आहे का

रंग घेतला आहे धर्माचा
भाषा इतकी गाढव आहे का

कसा भरवसा ठेऊ डोळ्यांवर
जे दिसते ते वास्तव आहे का

जीव घ्यायला आली आहे ती
हीच शांतता नीरव आहे का

कसे दाखवू कुठे लागले ते
मन एखादा अवयव आहे का

दारूमधला कडूपणा गेला
पाणी इतके बेचव आहे का

छान वाटते मला शहर माझे
तुझा वेगळा अनुभव आहे का

अशी शक्यता नाही आहे पण
तसे बघूदे संभव आहे का

गझल: 

अफवा

मी दिशाभूल झालोय, अथवा
देत आहे मला वाट चकवा

काय तो ठाम घ्या आज निर्णय
काय ते आजच्या आज कळवा

दखल घेइल स्वत: आपली ती
सहज दुनियेकडे पाठ फिरवा

सारखे वाटते मरुन जावे..
हा असा काय आलाय थकवा?

निघुन जाईल हा 'आज' सुद्धा..
काय घडले तरी काल, परवा?

'देव' ही त्यातली एक आहे..
अन अशा खूप आहेत अफवा

-उगले इंद्रजित

गझल: 

गझल

मान ठेवा कशास कोणाचा
कोण होईल दास कोणाचा

एकमेकांस वाहुनी पाहू
भार होतो कुणास कोणाचा

केवढा खिन्न वाटतो रस्ता
ठप्प झाला प्रवास कोणाचा

शेकडो हूड छोक-यांमध्ये
एक मुलगा उदास कोणाचा

ईप्सिते क्लिष्ट होत जाणारी
काय तगणार ध्यास कोणाचा

भुलवणे ही तुझी नशा मानू
गुंतलो तो विलास कोणाचा

-विजय दिनकर पाटील

गझल: 

नाव रिकामी

नाव रिकामी लाटांवरती डोलत होती
कथा कुण्या सफरीची त्यांना सांगत होती

वादळ वेशीबाहेरच घोंघावत राहू दे
- मनोदेवता रोज प्रार्थना ऐकत होती

काही पाने हिरवी होती, काही पिवळी
दोन्ही एका झाडावरती नांदत होती

डोळे दिसले आरश्यामधे लाल सकाळी
एक आठवण पूर्ण रात्रभर बोचत होती

बेत स्वतःचे मनुष्यप्राणी ठरवित होता
एक योजना नियतीसुध्दा आखत होती

गझल: 

गझल

यायचा हाती कसा हा गंध पळता
रानवा-याच्या पुढे मागे न करता

खिन्नता दाटून आली उतरताना
पाहिजे होता तुझा आलेख चढता

अवकळा आली कशाने ह्या घराला
कोण आहे येथला कर्ता सवरता

नाटकामध्ये तसे काहीच नव्हते
वाटला रोमांचकारी मंच हलता

पायरी बदलायची नाही कुणाला
पाहिजे सोपान सा-यांना सरकता

-विजय दिनकर पाटील

गझल: 

Pages