गझल

गझल

सांग कसे ते कण्हतानाही गात असावे...

सांग कसे ते कण्हतानाही गात असावे...
दगडाखाली आयुष्याचे हात असावे!

दगडांवरती रेघोट्यांची नक्षी आहे...
रस्ता बनवत पाणी खाली जात असावे

उडतो आहे पक्षी तुटलेल्या पंखांचा
खूळ नवेसे त्याच्याही डोक्यात असावे..

डोहामध्ये..पडल्यावरती वलये इतकी ..
काय कळेना पानाच्या स्पर्शात असावे!

खोदत आहे आयुष्याला केव्हाचा तो
खाण कशाची आहे.... त्याला ज्ञात असावे

जयदीप

गझल: 

नको तसे घडण्यावरती ह्यासाठी मन जडले होते

गझल - नको तसे घडण्यावरती ह्यासाठी मन जडले होते

नको तसे घडण्यावरती ह्यासाठी मन जडले होते
नको नको ते घडल्यावर जे हवे तसे घडले होते

त्या वाटेवर संध्याकाळी एकच जळता दिवा असे
एका जळत्या हृदयाला हे संकट आवडले होते

तो इथला झाला नाही कारण इथल्या प्रत्येकाला
इथे असावे कशास ह्याचे कारण सापडले होते

जन्माला जे आले नव्हते किंवा जे मेले होते
तितक्यांना मी अपुले केले......तितके परवडले होते

अजूनही हा जुनाट वाडा विकला गेलेला नाही
किंमत ठरता ठरता कोणी भरभरून रडले होते

गझल: 

वरून शांत शांत वाटते किती...

वरून शांत शांत वाटते किती...
मनातल्या मनात वादळे किती !

तुझी अजून वाट पाहणे किती....
क्षणाक्षणामधील ही युगे किती...

कसे कळेल काय पाहिजे तुला?
तुझे तुला खरेच समजले किती?

विरून संपतात 'शब्द' शेवटी
हवेत बोलतात माणसे किती !

बरेच सोडवून प्रश्न टाकले !
अजून या 'भ्रमात' उत्तरे किती ...

कसा प्रवास सांग व्हायचा सुरू...
तुझ्या तुझ्यामधेच अंतरे किती !

..... जयदीप

गझल: 

तुझी आभाळपुण्याई तुकोबा

नको टांगूस माझी लक्तरे ही
जगाला सांगतिल सगळे खरे ही

सयी सांभाळणारे पूर होते
'तशी'.. काठावरी काही घरेही

पुन्हा गोठ्यात हंबरतील गाई
पुन्हा लाडात येतिल वासरेही

जरा हासून बघ ह्या वेदनेला
पुन्हा येणारही नाही बरे ही

जरासे मौन घे आकाशगंगे
(किती वाचाळ आहे बापरे ही !)

निघू शतपावलीला सोबतीने
पहा मिटतील सारी अंतरे ही

दिशांनो द्या जरा ओढाळ हाका
पुढे जातील माझी पाखरे ही

असावी ही खरी किमया जिभेची
तुझी गोडी नसावी साखरे ही

तुझी आभाळपुण्याई तुकोबा
जळावरती तुझी गाथा तरे .. ही....

गझल: 

हा स्वत्वाचा तपास मानू आता

गझल - हा स्वत्वाचा तपास मानू आता

हा स्वत्वाचा तपास मानू आता
चल देहाला लिबास मानू आता

जेथे तेथे 'मी'च आडवा येतो
हे कळणेही विकास मानू आता

लिहायचे ते लिहिता आले नाही
आयुष्याला समास मानू आता

टोल फक्त मरणाचा द्यावा लागे
जन्माला बायपास मानू आता

केव्हाची आनंदी वाटत आहे
मनस्थितीला उदास मानू आता

ह्या वाटेवर एकटाच आहे मी
माझ्याइतके कुणास मानू आता

सर्व फुलांचे देठ सारखे होते
हा कोणाचा सुवास मानू आता

उगीच काहीतरी बघू जमते का
अंधाराला भकास मानू आता

गझल: 

अमल

खूप दिवसांनी भिजू सोन्यात चल
पसरला गावावरी पिवळा अमल

हात एकच मार स्थित्यंतर घडव
फार झाले तेच ते छुटपुट बदल

सर्व पुंजी फुंकुनी आलास पण
वाटली कोठे तुला खर्चिक सहल

आक्रमण कर आणि हो की मोकळा
युद्धनीतीवर किती करतोस खल

जिंकला कोणी कसा शिकणे नको
तो कसा स्पर्धेत ह्याचे कर नवल

निग्रहाने सोड इवला खंड हा
वाट पाहू लागले मोठे प्रतल
-------
विजय दिनकर पाटील

गझल: 

खोल डोहाच्या तळाशी साचलेला गाळ हो

खोल डोहाच्या तळाशी साचलेला गाळ हो
वा कुणी ना पोचते जेथे असे आभाळ हो

जाणत्यांच्या संस्कृतीला राहिलेला गर्भ तू
संपण्याची आणखी आरंभण्याची नाळ हो

तू नको खर्चूस ही माणूसकी जेथे तिथे
बस् कधी पडणार नाही जो असा दुष्काळ हो

येथले अस्तित्व कठपुतळीप्रमाणे मान तू
काळ आला आपला की आपला तू काळ हो

धाडले होतेस तेथे पाहिले राहून मी
ईश्वरा येथे तुझी शिजणार नाही डाळ हो

मी कसा आहे तुला जाणायचे झालेच तर
जे कुणीही ना कधी लाडावले ते बाळ हो

-'बेफिकीर'!

गझल: 

नदीला सागराची ओढ असली तर असू द्या ना

नदीला सागराची ओढ असली तर असू द्या ना
मला तुमच्यामधे थोडा तरी सागर दिसू द्या ना

गझल: 

Pages