नको तसे घडण्यावरती ह्यासाठी मन जडले होते

गझल - नको तसे घडण्यावरती ह्यासाठी मन जडले होते

नको तसे घडण्यावरती ह्यासाठी मन जडले होते
नको नको ते घडल्यावर जे हवे तसे घडले होते

त्या वाटेवर संध्याकाळी एकच जळता दिवा असे
एका जळत्या हृदयाला हे संकट आवडले होते

तो इथला झाला नाही कारण इथल्या प्रत्येकाला
इथे असावे कशास ह्याचे कारण सापडले होते

जन्माला जे आले नव्हते किंवा जे मेले होते
तितक्यांना मी अपुले केले......तितके परवडले होते

अजूनही हा जुनाट वाडा विकला गेलेला नाही
किंमत ठरता ठरता कोणी भरभरून रडले होते

तिला कसे माहीत असावे तिच्यासारखा आहे मी
भिकारणीला नाणे देताना मन तडफडले होते

जिवंत आहे ह्याची कोणी दखल घेतली नव्हती पण
मरायचे आहे ठरल्यावर जगणारे नडले होते

जुन्या वह्यांच्या रद्दीच्या पैशात किराणा घेताना
हिचा चेहरा म्हटला की बघ शेर किती सडले होते

त्यांच्यावरती डाफरती त्यांची पोरे येता जाता
ज्यांना येता जाता त्यांचे पालक ओरडले होते

ह्या काठावर जन्म घेतल्यापासुन म्हणतो प्रवाह हा
अलीकडे जे तुला भेटले सर्व पलीकडले होते

कसे सोडवू प्रश्न एवढे ...... निजताना समजत नव्हते
जसा सकाळी जागा झालो कोडे उलगडले होते

संगोपन ह्या शब्दाची परिभाषा मी का सांगावी
ज्याच्या षंढ बगीच्यामध्ये कुणी न बागडले होते

त्यांना सांगा जन्म घेतला ज्याचा ते तर व्हा आधी
'बेफिकीर' होण्यासाठी जे सदैव धडपडले होते

-'बेफिकीर'!

गझल: 

प्रतिसाद

कसे सोडवू प्रश्न एवढे ...... निजताना समजत नव्हते
जसा सकाळी जागा झालो कोडे उलगडले होते
वा. मस्त. एकंदर पल्लेदार गझल आवडली.

साष्टांग दंडवत स्वीकाराच बेफीजी
_/\_

संगोपन....
हलवून गेला...

' सोडवू प्रश्न एवढे ...... निजताना समजत नव्हते / जसा सकाळी जागा झालो कोडे उलगडले होते'

गझल आवडली !

जुन्या वह्यांच्या रद्दीच्या पैशात किराणा घेताना
हिचा चेहरा म्हटला की बघ शेर किती सडले होते ............
....... वास्तव छान साकारले. गझल भावली.