गझल

गझल

आजच्या आज

स्नेह निर्व्याज पाहिजे होता
आजच्या आज पाहिजे होता

ही अदाही बरीच आहे पण
वेगळा बाज पाहिजे होता

तान आहे तशी तयारीची
स्वच्छ आवाज पाहिजे होता

कसनुसे का हसून गेला तो
स्पष्ट नाराज पाहिजे होता

बडवतो काळ दोन बाजूंनी
जन्म पखवाज पाहिजे होता
---------------
विजय दिनकर पाटील

गझल: 

जे जगतो ते लिहिणारा

परदु:खाचे स्तोम केवढे बरकतदायक आहे
जे जगतो ते लिहिणारा हा कोण कफल्लक आहे

दोघेही विश्वासाच्या दरडी कोसळत्या ठेवू
संबंधांचा घाट बंद होणे आवश्यक आहे

दृश्य जवळचे डोळ्यांच्या कक्षेत मावते कोठे
जरा दूर जा त्रयस्थ हो मग म्हण आकर्षक आहे

नसेल त्याच्याकडून झाले निराकरण दु:खाचे
धीर दिलेला सावरताना निश्चित पूरक आहे

तुझ्या मालकीच्या वस्तूंच्या गच्च कपाटामध्ये
दिलास कप्पा तूर्त एक हेही आश्वासक आहे
-----------------------
विजय दिनकर पाटील

गझल: 

गझल

थांबते जराशी ट्रेन पुन्हा धडधडते
हे उदास खेडे वाट कुणाची बघते

तापला सभोती रानमाळ वैशाखी
वार्‍यावर उगाच फूल तुझे लवलवते

कौलारू रंग मनावर चढतो इतका
कोसळते बरेच, किंचित मागे उरते

हे प्रेम म्हणू की निव्वळ खेळ मनाचा
ही नदी खळाळुन येते मग ओसरते

मी नवेपणाचे सोंग घेउनी निघतो
पोचतो जिथे वहिवाट जुनी सापडते

अनंत ढवळे

गझल: 

पाहिजे तेव्हा कुणीही...

पाहिजे तेव्हा कुणीही भेटले नाही
वागणे हे जीवनाचे चांगले नाही

शेवटी हा एक साक्षात्कार झाला की,
पाहिजे तेव्हा कुणीही भेटले नाही

फायदा काही न पांगापांग झाल्यावर
लोक असताना कुणीही बोलले नाही

फक्त हसणे हे तुझे आता पुरे झाले
यामधे माझे, तुझे काही भले नाही

जाणतो मौनातले मी खेळ सगळ्यांचे
जाणतो मी, हे कुणीही जाणले नाही

गझल: 

तुझे स्वच्छ हासू झळाळी उन्हाची...

तुझे स्वच्छ हासू झळाळी उन्हाची
नजर होत जाते डहाळी उन्हाची

बिलगते तुला ते कुठेही कसेही
तुला चालते ही टवाळी उन्हाची

कशानेच जी खोडता येत नाही
अशी एक रेषा कपाळी उन्हाची

बसुन उंबऱ्याशी सकाळी सकाळी
किती प्यायचो मी शहाळी उन्हाची

कुणी पाहिली का कुणाच्या नशीबी
अशी बारमाही दिवाळी उन्हाची

महापूर आले किती सावल्यांचे
जशीच्या तशीही लव्हाळी उन्हाची

गगन सांडलेले रुपेरी सरोवर
चमकते जशी एक थाळी उन्हाची

तुझी आणि माझी उन्हे एक झाली
रुपे राहिली ना निराळी उन्हाची

गझल: 

तीच भेटावी..

खालील रचना या साईटवर प्रकाशित केलेली होती. काही दिवसांनी ती वाचताना काही बदल केले व नवी गझल तयार केली. काही शेर जसेच्या तसे आहेत. येथील नव्या व जुन्या सदस्यांसाठी दोन्ही रचना देत आहे.

जुनी प्रकाशित रचना
शेकडो होती तुला मी धाडली पत्रे
सांग, त्यापैकी किती तुज भेटली पत्रे

कागदावर आसवे उबदार पडली अन्
अक्षरे भडकून गेली, पेटली पत्रे

एकदाही एकटेपण वाटले नाही..
नेहमी होती उशाला ठेवली पत्रे

वाकडा माझा नसावा शब्द यासाठी
बारकाईने स्वतःची वाचली पत्रे

अर्थ जाणवला नवासा भूतकाळाचा
खूप दिवसांनी नव्याने चाळली पत्रे

गझल: 

लेक माझी चालली…

एवढी माणूसकी नाही बरी रे
बोलण्या अन वागण्या ठेवा दरी रे …

का अशी अर्ध्यात ती सोडून गेली
काय माझी चूक ते सांगा तरी रे …

भेटण्या आयुष्यभर केली कमाई
लाकडे सरणास , जगण्या भाकरी रे… !

कागदा किंमत अता,नाही जुबानिस
गोष्ट ही मित्रा तुझी आहे खरी रे ..

सावली पण आज माझी दूर गेली
लेक माझी चालली बघ सासरी रे…
-- अरविंद पोहरकर

गझल: 

मढे मोजण्याला

मढे मोजण्याला

लपेटून फासामधी कायद्याला
ससे वाकुल्या दावती पारध्याला

नको पाडसा आज कळपास सोडू
चुल्ह़ा तप्त टपला तुला रांधण्याला

जवानीत होता उतावीळ श्रावण
अता फ़ागही ना विचारीत त्याला

तुझी आत्मग्लानी वृथा-व्यर्थ आहे
कुणी येत नाही मढे मोजण्याला

करा की नका काम कोणी पुसेना
बिले चोख ठेवा; लुटा आंधळ्याला

इथे देवळाच्या चिखल भोवताली
स्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला

- गंगाधर मुटे "अभय"
=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=

गझल: 

Pages