गझल

गझल

एकदा शून्यास माझ्या तू वजा कर...

सांग तू... शंका तुला छळते किती ते
मोकळे आकाशही भरते किती ते...

एकदा स्वप्नातुनी सत्यातले बघ....
एकटे हे चांदणे सलते किती ते

सांग तू...समजाव तू आता स्वतः ला...
पाहतो आता तुला कळते किती ते !

एकदा शून्यास माझ्या तू वजा कर...
अन पहा ... बाकी तुझी उरते किती ते

तू तुझ्या सोडून बघ भलत्या अपेक्षा..
आपले नाते पुन्हा खुलते किती ते

.....जयदीप

गझल: 

इरेला पेटला आहे पिसारा

सुखाचा केवढा झाला पसारा
बिलगला वेदनेचाही पहारा

तुझ्या लाटेत सामावून घे ना
कधीचा थांबला आहे किनारा

तुझ्या वाणीत सारे भाव होते
नको सांगूस की केला पुकारा

तुझा रस्ता कधी चुकलो नसे मी
नसे ही बातमी आहे इशारा

किती चेकाळली स्वप्ने उराशी
पहा मिळताच थोडासा उबारा

अजुन तुडवीत आहे पाय काटे
अजुन नक्की नसे माझा निवारा

शरीराची उडाली फार थरथर
मनामध्ये कुठे होता शहारा?

मला सांगून गेला आपलेपण
तुझा तो एक ओळीचा उतारा

दुरुन नुसतेच तू नाचू नको ना
इरेला पेटला आहे पिसारा

गझल: 

खुल्या मनाने

खुल्या मनाने हसून घे
हवे तसे तू जगून घे

झुगार संकेत, बंधनांना
हवे तसे बागडून घे

सभोवतीच्या मनामनांना
दवाप्रमाणे टिपून घे

उद्या कदाचित् नसेन मी
भरून डोळे बघून घे

करीत जा मेहनत गड्या
पगारही वाढवून घे

गझल: 

नेहमी गर्दी तुला जी लागते

वर्षभर दुथडी भरूनी वाहते....
ही नदी कोठून पाणी आणते?

वाळवंटावर मनाच्या वाढते
आठवांचे रोप कोणी लावते...

कुंपणावरतीच आहे बहरते
वेलही लाचार झाली वाटते

वाहणे जीवन....कुठेशी थांबते...
अन् ढगाला कोसळावे लागते!

नेहमी गर्दी तुला जी लागते
केवढी माणूसघाणी वागते!

जयदीप

गझल: 

अबोल

प्रार्थनेस काय ढोल पाहिजे
पोचला नभात बोल पाहिजे

चेह-यावरील दु:ख मोजण्या
घाव काळजात खोल पाहिजे

धाय मोकलीत आसवे नको
फक्त पापणीत ओल पाहिजे

दोर काचतोय जीवना तुझा
सावरावयास तोल पाहिजे

बोल कागदावरी हवा तसा
एरवी कवी अबोल पाहिजे

--डॉ.कैलास गायकवाड

गझल: 

हसवणारे, खिदळणारे

हसवणारे, खिदळणारे इथे कोणीच नाही
रिते अंगण, मुकी दारे.. इथे कोणीच नाही

मनाला त्रास देणारे हजारो भेटलेले
मनाला शांत करणारे इथे कोणीच नाही

कुणावरती लिहावे मी ? कुणाचे गीत गावे ?
फुले, पाने, नदी, वारे..इथे कोणीच नाही

कुठे गेला जुना कट्टा ? कुठे गप्पा हरवल्या?
गड्यांनो, या, पुन्हा या रे...इथे कोणीच नाही

दरेकाच्या मुखावरती हसू आहे तरी वाटे..
मनापासून हसणारे इथे कोणीच नाही

गझल: 

ऎकले आहे तुला ती साथ देते

वाटते मोठी जगाला भूक माझी
चव बदलली हीच झाली चूक माझी

शेर दूरच एकही मिसरा न सुचतो
वेदना भलतीच झाली मूक माझी

एक पश्चाताप बघतो अंत आहे -
का तुला होती दिली बंदूक माझी!

ऎकले आहे तुला ती साथ देते...
आठवण येते जरी अंधूक माझी

शेवटी निर्ढावलेले प्रश्न रडले
उत्तरे नव्हती जरी भावूक माझी

जयदीप

गझल: 

जागरण डोळ्यांमधे आता लमाण्यासारखे नाही

जागरण डोळ्यांमधे आता लमाण्यासारखे नाही
स्वप्न आता एकही उरले पहाण्यासारखे नाही

हे म्हणत आम्ही किती अगतिक सुखाने राहतो येथे,
"राहिले आहे शहर आता रहाण्यासारखे नाही"

पाहता दिसते कुठे प्रतिबिंबही कोठे पिता येते
राहिले पाण्यामधे काहीच पाण्यासारखे नाही

मेंढरू प्रत्येक दुसऱ्या मेंढराला सांगते आहे,
"मी अलग, माझे अलाण्या वा फलाण्यासारखे नाही"

एक साधा शब्द बघतो बोलण्याची वाट केव्हाची
शब्दभर अंतर, तरी चालून जाण्यासारखे नाही

शेवटी आम्हीसुद्धा झालो बरे प्रस्थापितांपैंकी
बोलतो हल्ली किती आपण शहाण्यासारखे, नाही?

गझल: 

Pages