हसवणारे, खिदळणारे

हसवणारे, खिदळणारे इथे कोणीच नाही
रिते अंगण, मुकी दारे.. इथे कोणीच नाही

मनाला त्रास देणारे हजारो भेटलेले
मनाला शांत करणारे इथे कोणीच नाही

कुणावरती लिहावे मी ? कुणाचे गीत गावे ?
फुले, पाने, नदी, वारे..इथे कोणीच नाही

कुठे गेला जुना कट्टा ? कुठे गप्पा हरवल्या?
गड्यांनो, या, पुन्हा या रे...इथे कोणीच नाही

दरेकाच्या मुखावरती हसू आहे तरी वाटे..
मनापासून हसणारे इथे कोणीच नाही

गझल: 

प्रतिसाद

गझल आवडली.

रदीफ मस्तच निभावलेली आहे.

रिते अंगण, मुकी दारे.. इथे कोणीच नाही

कुणावरती लिहावे मी कुणाचे गीत गावे
फुले पाने नदी वारे इथे कोणीच नाही

हे विशेष!

('वाटे' ...ह्या , त्या ओळीतल्या शेवटच्या शब्दामुळे लय गडबडते आहे का हे तपासाल का प्लीज )

सर्व खयाल /शेर आवडले एकूण गझलही आवडली
गड्यांनो, या, पुन्हा या रे...इथे कोणीच नाही......... अतीशय सुंदर भिडते ही ओळ . खूप आवडली

धन्यवाद

मोठी रदीफ , सुंदर गझल

फुले पाने नदी वारे ....प्रचंड आवडला हा शेर!!!

कट्टा (नाका) आठवला, सगळे मित्र आठवले नाक्यावरचे!

:)

धन्यवाद

वैभवचा मुद्दा रास्त आहे. 'तरी वाटे' ऐवजी..'तरीही' असे वाचावे.

छान.

धन्यवाद सर्वांना