मनाच्या अडगळीमधले बिलोरी आरसे शोधू

मनाच्या अडगळीमधले बिलोरी आरसे शोधू
तुझ्या हातून घडलेल्या चुकांची कारणे शोधू!

प्रवाहाधीन झालेल्या लुळ्या नावेतले आपण...
"कसे पोहायचे?" यावर नव्याने पुस्तके शोधू!

पिकांच्या राखणीसाठी तुला मी नेमले होते...
तुला जमणार नसले तर नवे बुजगावणे शोधू!

तुझ्या नाजूक प्रश्नांना नकोशी उत्तरे माझी...
तुला समजावण्यासाठी करारी तोडगे शोधू!

किनारा गाठल्यावरती, बढाया मारणे टाळू ..
तुला जिंकायला ज्यांनी दिले ती वादळे शोधू!

.....जयदीप

गझल: 

प्रतिसाद

बुजगावणे आणि वादळे सर्वाधिक आवडले

प्रवाहाधीन झालेल्या लुळ्या नावेतले आपण.......छान ओळ !! वाह !!

वैभव कुलकर्णी ह्यांच्याशी सहमत आहे. छान गझल.

वा..

छान गझल, जयदीप.