जगण्याचे मातेरे होते...

जगण्याचे मातेरे होते
मग कवितेचे सोने होते

दोन दिवस मी रडलो नाही
उदास सारे झाले होते

दारोदारी झाडे होती
झाडोझाडी झोके होते

पेन रात्रभर हाती होता
पान रात्रभर कोरे होते

मी मातीत मिसळलो तिथल्या
गंध फुलांना माझे होते

- वैभव देशमुख

गझल: 

प्रतिसाद

वा. सुरेख गझल वैभव.

छान गझल वैभव! मत्ल्यात अंत्ययमक "होते" वर्तमान कालात आणि नंतरच्या शेरांमधे भूतकालात वापरलाय... अंत्ययमकाचा अनेकार्थी वापर गझलेतलं सौंदर्यस्थान मानलं जातं! सुंदर!

वैभव ची ही एक अतिशय अप्रतीम आणि प्रसिद्ध गझल आहे
मला ही खूप आवडते
अवांतर : आजच पाहिले ही वेबसाइटवर आणखीही काही गझल प्रकाशित झाल्या आहेत ज्यात एका नवख्या गझलकाराची रचनाही आहे मान्यवरांनी तिकडेही काही प्रतिक्रिया देवून हुरूप वाढवावा अशी विनंती
मी आधीच एक प्रतिक्रिया तिकडे देवून आलो आहे ..अर्थात मी मान्यवर नसलो तरी.... हाहाहा !!

पान रात्रभर कोरे होते व्वा गझल पण एक नंबर

जगण्याचे मातेरे होते
मग कवितेचे सोने होते

सगळेच शेर सुंदर आहेत, गझल आवडली !

mast gazal sir :)