माणसांना माणसांचे

माणसांना माणसांचे वागणे कोडेच होते
ते असे का वागले, हे नेहमीचे पेच होते

हे असे माझे तुझे करण्यात सारा वेळ गेला
मान्य आहे ना तुलाही - आपले चुकलेच होते?

आज आता सारखा मी का जगाला बोल लावू?
उत्तरे माझीच होती, प्रश्नही माझेच होते

तू उगीचच अर्थ मोठा शोधला होतास तेव्हा
शब्द जे बोलून गेलो ते तसे साधेच होते

पेन्सिलीने काढताना सर्व काही छान असते
कुंचल्याने रंगल्यावर चित्र ते भलतेच होते

गझल: 

प्रतिसाद

ओघवती आणि छान आहे गझल.

तू उगीचच अर्थ मोठा शोधला होतास तेव्हा
शब्द जे बोलून गेलो ते तसे साधेच होते

पेन्सिलीने काढताना सर्व काही छान असते
कुंचल्याने रंगल्यावर चित्र ते भलतेच होते

waa waa! pencil chyaa sheraat ek vegalaach artha saapadalaa. masta!

शेवटचे २ खूप आवडले
आज आता सारखा .... नक्की काय आज , आता की सारखा? ... एकाच ओळीत हे वेगवेगळे कालवाचक शब्द फारसे पटले नाहीत

असो
धन्यवाद

धन्यवाद सर्वांना.

आज आता सारखा..च्याबाबतीत काही पर्यायी व्यवस्था करता येईल का, याचा विचार करतोय.