एवढे नसते जलद आयुष्य सरण्यासारखे!

एवढे नसते जलद आयुष्य सरण्यासारखे!
हाय, गेले लोक जे नव्हतेच मरण्यासारखे!!

शेवटाचा श्वास घेताना कळाले हे मला.........
खूप काही शक्य आयुष्यात करण्यासारखे!

याचसाठी मी हवाली जाहलो लाटांचिया......
अन् तसेही हे न गलबत फार तरण्यासारखे!

हे गमक माझ्या यशाचे फक्त शिखरे जाणती.........
पाय माझे पांगळे पण, ते न हरण्यासारखे!

वाळवंटातील यात्रेने मला समजावले.........
की, असे मृगजळ पखालीतून भरण्यासारखे!

कोण जाणे, माळरानावर कशी जमली गुरे?
या इथे ना राहिले काहीच चरण्यासारखे!

पावलांचे तू असे उमटव ठसे रस्त्यात की,
हर तुझे पाऊल वाटू देत ठरण्यासारखे!

शेर शब्दांच्या पलीकडचाच लिहिणे हे जणू.........
कवडशाला चक्क या हातात धरण्यासारखे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गझल: 

प्रतिसाद

एवढे नसते जलद आयुष्य सरण्यासारखे!
हाय, गेले लोक जे नव्हतेच मरण्यासारखे!!

शेवटाचा श्वास घेताना कळाले हे मला.........
खूप काही शक्य आयुष्यात करण्यासारखे!

कोण जाणे, माळरानावर कशी जमली गुरे?
या इथे ना राहिले काहीच चरण्यासारखे!
वा. हे शेर आवडले.

लाटांचिया, हर, हे जणू खटकले कानांना.

कोण जाणे, माळरानावर कशी जमली गुरे?
या इथे ना राहिले काहीच चरण्यासारखे!

उत्तम शेर आहे !