भटसाहेबांच्या सहवासात...
Posted by प्रदीप कुलकर्णी on Saturday, 15 April 2017''हे बघा, कुर्कल्णी...प्रदीप ना तुमचं नाव? आता मी जे सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका. नाव व्हावं म्हणून कधीही लिहू नये. लिहिल्याशिवाय राहवत नाही म्हणून लिहावं. ('कधीही' हा शब्द उच्चारताना उजव्या हाताची तर्जनी त्यांनी मूठ स्थिर ठेवत अशा काही आग्रही पद्धतीनं हलवली, की तो मुद्दा माझ्या मनात त्या मुठीसारखाच स्थिर झाला. पुन्हा "राहवत नाही' हे शब्द ठाशीवपणे उच्चारल्यानंतर 'म्हणून' शब्द उच्चारताना तीच तर्जनी त्यांनी जमिनीच्या दिशेनं अशा वेगानं नेली, की तोही मुद्दा माझ्या मनावर खोलवर परिणाम करून गेला). नाव व्हावं म्हणून लिहिणारेही असतात; पण ते चमकतात, चमकतात आणि विझून जातात. गझल मनापासून आवडली, तरच तिच्या वाटेला जा. गझल मनापासून आवडत नसेल आणि नावासाठी तिच्याकडं वळला असाल, तर ही वाट सोडून आत्ताच वेगळी वाट धरा. आणखी एक सूत्र लक्षात ठेवा. साधना-सिद्धी-प्रसिद्धी. आधी साधना...मग साहजिकच सिद्धी...आणि सिद्धीनंतर आपोआपच प्रसिद्धी. प्रसिद्धीसाठी वेगळं असं काहीच करावं लागत नाही.''