भटसाहेबांच्या सहवासात...
कविवर्य सुरेश भट ह्यांचा आज (१५ एप्रिल १९३२) ८५ वा जन्मदिन. त्यानिमित्त...
आपण एका अद्भुत काळात जगत आहोत, एका ऐतिहासिक कालखंडाचे साक्षीदार आहोत, ही जाणीव तो काळ जगत असतानाच माणसाला परिपूर्णतेनं होती तर ?...तर त्या वेळच्या अनुभवांद्वारे स्वतःला आणखी समृद्ध करून घेता आलं असतं...त्या वेळी महत्त्वाचे न वाटलेले; पण पुढं ऐतिहासिक महत्त्व मिळवून बसलेले बारकावे टिपून घेण्याची मनाच्या टिपकागदाची क्षमता वाढवता येऊ शकते का, ते पाहता आलं असतं...साक्षीदार असण्यातला आनंद अधिकाधिक वाढवता आला असता...पण त्या वेळी ह्यातलं काहीच धडपणे करता आलं नसलं, तरी त्या काळच्या आठवणीत रमणं, हेही काही कमी आनंदाचं, कमी समृद्धदायी असतं असं नाही. उलट, त्या दिवसांच्या आठवणी विद्यमान काळाच्या ओसाडीत बहारीच्याच वाटतात. हां, पण तेव्हाचं अमूल्य असं काहीतरी हिरवंगार-बहारदार कायमचंच कोळपून गेल्याची एक रखरखीत हुरहूरही या आठवणींना वेढून राहिलेली असते, हेही खरं.
गतकाळातच मुक्कामी राहण्याची आवड असणाऱ्यांना तर ही रुखरुख फारच जाणवत राहते. गतकाळाच्या ओवरीतला मीही एक असाच कायमचा उतारकरू...
* * *
मी हे ज्या काळाविषयी बोलतोय तो काळ आहे साधारणतः आजपासून २९ ते १४ वर्षांपूर्वीचा. नेमकं सांगायचं तर १९८८ च्या आसपासचा आणि त्यानंतर पुढं २००२ पर्यंतचा. कविवर्य सुरेश भटसाहेबांच्या निधनाच्या (१४ मार्च २००३) अलीकडं सहा-आठ महिन्यांपर्यंतचा, म्हणजेच ऑगस्ट २००२ पर्यंतचा.
ह्या सुमारे १४-१५ वर्षांच्या काळात भटसाहेब पुण्यात येऊन-जाऊन असत. वरचे वर. कधी कधी महिनाभर किंवा त्याहूनही अधिक काळ मुक्कामीही.
तसे ते १९८० पासूनच नागपूरहून पुण्याला वारंवार येत असत; पण माझा त्यांच्याशी प्रथम परिचय झाला तो १९८८ च्या जानेवारीत. पत्ररूपानं. पुण्यात गझलेची चळवळ चांगली सहा-सात वर्षं उसळून ती ओसरू लागण्याच्या टप्प्यातल्या सुरुवातीच्या दिवसांचा हा काळ होय.
१९८६ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेनं 'महाराष्ट्र साहित्य पत्रिका' हा दिवाळी अंक 'गझल विशेषांक' म्हणून प्रसिद्ध केला होता. तो माझ्या वाचनात साधारणपणे वर्षभरानं आला. त्या अंकात भटसाहेबांची प्रदीर्घ मुलाखत - डॉ. अक्षयकुमार काळे (होय, तेच हे !) ह्यांनी घेतलेली - प्रसिद्ध झाली होती. त्या मुलाखतीत भटसाहेबांनी म्हटलं होतं : 'एखादा उत्तम संभाव्य गझलकार दिसला, की मला लॉटरी लागल्यासारखा आनंद होतो.' हे वाक्य वाचून इकडं मलाही, भटसाहेबांइतकाच आणि लॉटरी लागल्यासारखाच आनंद झाला होता! (स्वतःला 'उत्तम संभाव्य गझलकार' समजण्याचा माझा काय हा फाजील आत्मविश्वास!). केवळ त्या एकाच वाक्याचा धागा पकडून मी भटसाहेबांना पुण्याहून पत्र लिहिलं. पत्र लिहिल्याची तारीख होती १४ जानेवारी १९८८. मी तिसऱ्याच दिवशी पत्ररूपानं भटसाहेबांपर्यंत पोहोचलो. ठिकाण : नागपूर, धनतोली. त्यानंतर केवळ चारच दिवसांनी म्हणजे (बहुतेक) २१ जानेवारीलाच, मी भल्या सकाळी भटसाहेबांच्या पुढ्यात उभा होतो. ठिकाण : सदाशिव पेठ. पुणे! आता नेमकं आठवत नाही, पण भेटण्याच्या दिवसाची तारीख एखाद्-दुसऱ्या दिवशी पुढं-मागं झालेली असू शकते...पण तरीही असं वाटतंय, की तो दिवस २१ जानेवारीच असणार...काऱण, '२० जानेवारीनंतर कधीही ये,' असं त्यांनी पत्रात म्हटलं होतं आणि 'शुभस्य शीघ्रम्' म्हणत मी दुसऱ्याच दिवशी त्यांना भेटायला गेलो होतो.
भटसाहेबांचं मला आलेलं पहिलं पत्र.
ते त्या वेळी पंतांच्या गोटात मुक्कामी (त्यांचा आवडता शब्द) असत. एवढ्या मोठ्या कवीला भेटण्याचा प्रसंग अवघ्या आठ दिवसांतच जुळून आला होता. घडलं असं होतं, की नेमक्या त्याच आठवड्यात भटसाहेब प्रदीर्घ मुक्कामासाठी पुण्यात दाखल (१९ जानेवारी) होणार होते. मुक्कामाचा पत्ता कळवणारं त्यांचं तसं पत्र मला अवघ्या चारच दिवसांत, म्हणजे १८ जानेवारीला मिळालं. अतिशय जलदीनं पोस्टखात्यानं हे काम केलं होतं (कोण ते, नावं ठेवतंय ह्या कार्यक्षम खात्याला?) ह्या सगळ्या वेगवान घडामोडीला मी तरी विलक्षण योगायोगच मानतो. दुसरा निष्कर्ष काढता येत नाही. (शिवाय, पुढच्या काळात मराठीला एक गझलकारही नव्हता का मिळायचा!).
...तर मी पंतांच्या गोटात भटसाहेबांच्या मुक्कामी पोहोचून त्यांच्यासमोर उभा. झालं. हीच ती भटसाहेबांची आणि माझी पहिली भेट. (ह्या भेटीविषयी आणि इतर आठवणींविषयी मी ह्याच संकेतस्थळाच्या एका दिवाळी अंकात (२००८) प्रदीर्घ लेख लिहिला आहे. त्या लेखात आणि ह्या लेखात काही मुद्द्यांची पुनरावृत्ती अटळ होती. ती झालीच आहे. तेव्हा त्यासंदर्भातले बाकीचे मुद्दे इथं पुन्हा तपशिलात लिहून वाचकांचा वेळ वाया घालवायला नको).
भटसाहेबांच्या पत्रोत्तराचा वरती उल्लेख आला आहे. 'भटसाहेबांचा पत्रव्यवहार' ह्या विषयावर खरोखरच स्वतंत्रपणे भरपूर काही लिहिण्यासारखं आहे. मात्र, ओझरता उल्लेख करतोच. माझ्यासारख्या नव्यानं ओळखीच्या झालेल्या (तेव्हाच्या) पोऱ्यालाच आलेली त्यांची पत्रं पन्नास- पाऊणशेच्या घरात सहज असतील, म्हणजे बघा! उभ्या-आडव्या महाराष्ट्रातल्या त्या वेळच्या जवळपास सगळ्याच गझलकारांपर्यंत ते पत्राद्वारे पोहोचले होते. त्यातल्या अनेकांना त्यांनी प्रदीर्घ पत्रं लिहिलेली आहेत. प्रत्येक गझलकाराला एकसारख्याच पोटतिडकीनं त्यांनी गझलेविषयीची माहिती पत्राद्वारे दिली. अशा अनेकांची पत्रं माझ्या पाहण्यात आलेली आहेत. पत्रव्यवहाराच्या ह्या सगळ्या अवाढव्य सव्यापसव्यात त्यांच्या एकंदर जगण्याचा किती काळ (वाया?) आणि ऊर्जा (हीसुद्धा वायाच?) गेला असणार, ह्याचा हिशेब करा! (मला आलेल्या त्यांच्या असंख्य पत्रांविषयी एक स्वतंत्र लेख मी सवडीनुसार लिहिणार आहेच).
* * *
गझलेची आणि माझी एव्हाना तोंडओळख(च) झालेली होती. अर्थातच 'एल्गार'मधून. ('एल्गार' मी खरेदी केला ती तारीख होती ०५ मे १९८५, बुद्धपौर्णिमा). नव्यानं गझल लिहू लागलेल्यांचं ते तेव्हा 'बायबल'च होतं म्हणा ना ! तसा गझल लिहिण्याआधी वृत्तबद्ध, छंदोबद्ध असं मी बरंच काहीबाही खरडत होतोच; पण तो भाग आणि ती गोष्ट वेगळीच. ते सगळं गीतरचनेच्या आणि तांबीय-बोरकरीय काव्यरचनेच्या अंगानं जाणारं होतं. रेडिओवर लागणारी फिल्मी गाणी (एक से एक दर्दभरे नगमें!) हीदेखील त्या काळी फार मोठी बाह्य प्रेरणा असायची माझ्या 'काव्य'लेखनामागं. खासकरून कवी-गीतकार राजेंद्रकृष्ण ह्यांची गाणी- त्यांमधल्या अर्थसुगमतेमुळं- तेव्हा मला फार आवडायची. आजही आवडतात. का ते माहीत नाही; पण त्यांची अनेक गाणी त्या काळी रेडिओवर वारंवार वाजवली जायची. सतत श्रवणाचाही तो परिणाम असावा.
...तर 'एल्गार'विषयी सांगत होतो. 'एल्गार'मधून आपण हे जे काही 'वाचत सुटलो' आहोत, ते फारच अजब आहे, विस्मयकारक आहे, ह्याची जाणीव संग्रह वाचता वाचताच मला होत गेली होती. म्हणजे असं की 'एल्गार'मधल्या (गझल)रचनांना (पारंपरिक अर्थानं) 'कविता' तरी कसं म्हणायचं, हेच कोडं मला सर्वप्रथम पडलं होतं, हे मला आजही अगदी टक्क आठवतंय. कारण, त्यातल्या एकाच रचनेत 'चंद्र' होता, 'शिंतोडे' होते, 'जंगल' होतं, 'सोन्याचं ताट' होतं, 'बिलोर' होते, 'हरामखोर' होते...असं बरंच काही काही वेगवेगळं केवळ एकाच रचनेत समाविष्ट होतं.
कवितेकडं पारंपरिकपणे पाहणाऱ्या माझ्या मनाला पडलेला प्रश्न... कविता अशी कुठं असते का कधी? (नसतेच! अशी जी असते ती गझल असते -आणि तीही खणखणीत गझल- असते, आणि त्या दोन दोन ओळी म्हणजे शेर, हा साक्षात्कार अर्थातच नंतरचा).
मग हे कशाचाच कशाला मेळ नाही, असं वरकरणी वाटणारं अन् तरीही उच्चारसाधर्म्य असलेल्या काही विशिष्ट शब्दांमध्ये (पक्षी : यमकांमध्ये) सगळं विलक्षण नादमयतेनं, सहजतेनं, सुगमतेनं गुंफलेलं जे काही आहे ते काय आहे? हे आपल्याला एवढं झपाटून का टाकतंय? एवढा विचार करायला का भाग पाडतंय? ('एल्गार'मधल्या 'पुण्याई' ह्या शीर्षकाच्याच गझलेचं हे उदाहरण मी अशासाठी घेतलं, की संग्रहातली ही शेवटची गझलच मी सगळ्यात आधी वाचली होती. माझी उलटी खोपडी!)
एरवीच्या कवितेपेक्षा हे निश्चितच काहीतरी निराळं होतं. अजबगजब होतं. वाटलं, आपल्यालाही असंच काहीतरी लिहिता आलं पाहिजे गड्या. मनातले वेगवेगळ्या विषयांवरचे विस्कळित विचार असे एकाच रचनेत गुंफणं किती सोपं आहे...सोईस्कर आहे! प्रत्येक दोन ओळींत वेगळा विचार, वेगळा विषय. दोन ओळींत मामला खतम! (पण असं करता येणं हेच फार अवघड असतं आणि हा काव्यविशेष 'गझल'नामे ओळखला जातो, त्या दोन ओळींना शेर ('द्विपदी' - हाही भटसाहेबांचाच सुरेख शब्द) असं संबोधतात, हे पुढं यथावकाश कळलं, हे वर लिहिलंच मी).
* * *
तसा माझा ओढा पहिल्यापासून वृत्तबद्ध-छंदोबद्ध कवितेकडंच.(पण मुक्तछंदाचंही अजिबात वावडं नव्हतं. आजही नाही. मात्र, मनाची खरी रमणूक वृत्त-छंदातच). केशवसुत, गोविंदाग्रज, भा. रा. तांबे, लोककवी मनमोहन, बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, आरती प्रभू, इंदिरा, शान्ता शेळके, मंगेश पाडगांवकर, ग्रेस अशा अनेकानेक छंदोबद्ध कवींच्या कुठल्या ना कुठल्या कविता टीनेजरी वयात वाचनात आल्या होत्याच. आणखी, आणखी वाचण्याच्या अधाशीपणापोटी हुडकून काढून वाचतही होतो. वाचत आणि पचवतही. मात्र, ह्या सगळ्यांमध्ये 'आणीन आरतीला हे सूर्य-चंद्र-तारे' असं म्हणणारा कवी काही वेगळाच असावा, हे शालेय वयातच जाणवलं होतं ('गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे | आणीन आरतीला हे सूर्य-चंद्र-तारे' ही सुरेश भट यांची कविता मला शालेय पाठ्यपुस्तकात, म्हणजेच 'कुमारभारती'त, होती). मायभूमीच्या आरतीसाठी सूर्य-चंद्र-तारे आणू पाहणारा हाच कवी पुढं 'एल्गार'मधून आपल्याला भेटणार आहे, हे त्या वेळी कसं माहीत असणार? आणि 'एल्गार'मधून भेटलेला हा कवी पुढं प्रत्यक्षातही भेटेल...सतत १५ वर्षं अधूनमधून भेटत राहील, त्याचा प्रदीर्घ सहवास मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे, त्यानं पंतोजीसारखं हाताला धरून न शिकवताही, त्याच्याकडून गझलेचे धडे मूकपणे गिरवता येतील, 'झंझावात' ह्या त्याच्या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये आपल्या नावाचा उल्लेख तो कृतज्ञतापूर्वक करेल, ह्याची तरी त्या वेळी काय कल्पना? पण अशी कुठलीच कल्पना नसताना हा अवलिया कवी मला भेटला. भेट होणारच होती! मग काय विचारता? टीनएजच्या लगतचा तो सगळा काळ ह्याच कवीनं भारून टाकला. त्या वेळी डोक्यात कवितेशिवाय दुसरा विषय नसायचाच म्हणा. सुदैवानं कवितेच्या भरण-पोषणाला पूरक असं वातावरणही मिळत गेलं आणि मनातली कवितेची जागा अल्पावधीतच गझलेनं रीतसर कधी पटकावली हेही कळलं नाही.
* * *
पहिल्या भेटीनंतर भटसाहेबांशी माझी जवळीक लगेचच साधली जाण्याला दोन गोष्टी कारणीभूत ठरल्या. 'वाच्य' अर्थातच वाचता येऊ शकेल असं माझं सुटसुटीत अक्षर आणि माझं शुद्धलेखन. अक्षर सुटसुटीत असल्याचं पहिल्या पत्रातून त्यांनी पाहिलं होतंच; पण माझं शुद्धलेखन त्या तेवढ्या पहिल्या पत्रापुरतंच मर्यादित नसल्याची नंतर सर्वार्थानं खात्री पटत गेल्यावर मला पुढं त्यांनी शुद्धलेखनाबाबत अनेकदा शाबासकीही दिली. 'अक्षर आणि शुद्धलेखन ह्या दोन्हींबाबत तुम्ही माझ्या फार कामाचा माणूस आहात, ह्या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी अभावानंच पाहायला मिळतात,' हे त्यांनी पहिल्या भेटीत तासाभरातच मला सांगून टाकलं.
हे काम म्हणजे त्यांच्या काव्यसंग्रहाची मुद्रणसंहिता करणं आणि त्यांच्या पत्रांचं डिक्टेशन घेणं. त्यानुसार पुढं 'झंझावात' ह्या त्यांच्या काव्यसंग्रहाची मुद्रणसंहिता (प्रेस कॉपी) अनेक रात्री जागून मी लिहून काढली.
'झंझावात' ह्या काव्यसंग्रहाची मुद्रणसंहिता मी तयार केली म्हणून त्या संग्रहाची भटसाहेबांनी मला दिलेली भेटप्रत..
बऱ्याच महिन्यांचा काळ ह्यात गेला. (वयसुलभ कंटाळ्यामुळं आणि रात्री जागण्याची सवय (त्या वेळी हां!) बिलकूलच नसल्यानं अधूनमधून मी दांड्याही मारायचो. मग अशा वेळी मला त्यांचं पोस्टकार्ड येई. 'हाती घेतलेलं काम माणसानं पूर्ण करावं. मी हाती घेतलेलं कुठलंही काम अर्धवट सोडत नसतो,' हा त्या पत्राचा सारांश असे.
'माझं काही खरं नाही' असंही एक गंभीर वाक्य अधूनमधून ते पत्रांमधून पेरत असत. त्यावर ' काही खरं नाही' म्हणजे त्यांना नेमकं काय झालं असावं, असा विचार मग मनाच बराच काळ राहत असे. मजकुरातले महत्त्वाचे शब्द ठळक-ठसठशीत-ठाशीव आणि एरवीच्या मजकुराच्या शाईपेक्षा वेगळ्या शाईत असत). रोज रात्री साडेआठ-नऊच्या सुमारास मी त्यांच्या घरी जायचो आणि साधारणतः दोन वाजेपर्यंत जेवढ्या होतील तेवढ्या रचना उतरवून काढायचो.
'गझल उतरवताना ती डावीकडच्या बाजूनं अगदी सरळ एका रेषेत आली पाहिजे...शेवटाकडं जाताना ती तिरपी तिरपी होऊ देऊ नका. समासाला धरूनच लिहा. (बांधीव वहीत हा समासही ते मोठ्या नजाकतीनं पाडून दाखवत. पहिल्या काही पानांचा समास मला त्यांनीच पाडून दिला होता). पहिली रचना उतरवून झाली की मला दाखवा,' असं त्यांनी मला पहिल्याप्रथमच बजावलं. मी त्यानुसार दाखवल्यावर 'हां, ठीक आहे. सगळ्या रचना अशाच पद्धतीनं नकलून काढायच्या आहेत' असं त्यांनी सांगितलं आणि मग पुढं मी संपूर्ण काव्यसंग्रह त्या मोठ्या बांधीव वहीत नकलून काढीपर्यंतच्या मधल्या काळात माझ्या 'नकलनवीसी'वर त्यांनी एकदाही देखरेख ठेवली नाही. काम बरं होत असल्याची एकदा खात्री पटली की पटली. मग समोरच्यावर शंभर टक्के विश्वास टाकून ते मोकळे होत. एवढा दिलखुलास, उमदा स्वभाव!
सुरुवातीचा जवळपास महिनाभर तरी ते मला 'अहो-जाहो'च करत असत. (पहिल्या पत्रात मला उद्देशून त्यांनी एकेरी उल्लेख केलेला असला तरी).
रात्री दोनच्या पुढंही मी जागून काव्यरचना उतरवत असेन तर आणि ते त्यांच्या (त्यांची झोप अगदी सावध म्हणजे अगदी सावध असे) लक्षात आलं, तर ते म्हणत : 'अहो कुर्कल्णी...(होय, सुरुवातीच्या काळात कधीकधी ते मला 'अशाही' आडनावानं बोलावत असत. तो उच्चार ऐकून फारच हसायला यायचं. नंतर मात्र रीतसर 'अरे, प्रदीप') झोपा आता. दोन वाजून गेलेत. काही घाई नाही आपल्याला. उद्या बघू.'
खरं तर मीही तसा झोपाळलेलाच असायचो. मग पडत्या फळाची आज्ञा मानून वह्या आवरून मी लगेचच सतरंजीला पाठ टेकत असे. आधीच सावध असलेली त्यांची झोप एव्हाना चाळवलेली असे... मग पहुडल्यापहुडल्याच ते माझी व्यक्तिगत, कौटुंबिक चौकशी करत. काही प्रश्न विचारत. उत्तर दिलं की शांत बसत.
उत्तरानं समाधान झालं नाही तर प्रश्नातून प्रश्न, उपप्रश्नही विचारत. उत्तरं ऐकून घेतल्यावर तंद्रीत जात. उजव्या हाताचा अंगठा वरच्या-खालच्या दातांच्या मध्ये व्हर्टिकली घालून डोळे मिटत-उघडत. (कुठल्याही गोष्टीवर बारकाईनं विचार करताना असं करण्याची त्यांची ढब होती, हे पुढं माझ्या लक्षात येत गेलं. समोरच्या माणसाच्या मनाचा थांग तपासण्याची, त्याच्या खरे-खोटेपणाबाबतचा अंदाज घेण्याची त्यांची ताकद विलक्षण होती.
गझल लिहिण्याच्या प्रक्रियेतसुद्धा सुचू पाहत असलेल्या एखाद्या शेरावर विचार करतानाही हीच त्यांची ढब अनेकदा मला आढळली). इकडं मला डुलक्या येऊ लागलेल्या असतानाच त्यांचा पुढचा प्रश्न येई. मध्ये बराच वेळ गेल्यानं मला वाटे, की आता त्यांनाही झोप लागली असावी; पण तसं नसे. मग हे प्रश्नांचं सत्र अगदी संथपणे पहाटे चार वाजेपर्यंतही चाले. मध्येच काही सुचलं, तर टेबललॅम्प लावून ते लिहायलाही बसत. लिहून झालेली गझल तिथल्या तिथं ऐकवत. एखाद्या नवोदित कवीच्या उत्साहानं! ह्या गझलेत आणखी किती शेर होऊ शकतील, ह्याचाही अंदाज ते त्याच वेळी लावत.
* * *
'झंझावात'ची मुद्रणसंहिता नकलण्याचं काम प्रामुख्यानं रात्रीच चाले. कारण, त्या वेळी माझं कॉलेजशिक्षण सुरू होतं आणि नंतर 'रेअरेस्ट ऑफ रेअर' अशी पुस्तकं हुडकून काढून ती पुनःप्रकाशित करण्याविषयी ख्याती असलेल्या नामवंत प्रकाशनसंस्थेत दुपारी दोन ते संध्याकाळी सहा-सात अशी मी अर्धवेळ नोकरीही करत असे. मात्र, पुढं पुढं मी आठवड्यातून दोन-तीनदा कॉलेजलाही दांड्या मारू लागलो. नोकरीच्या ठिकाणी मात्र असं करता येणं शक्य नसायचं...पण पूर्वार्धातला अर्धा तर अर्धा दिवस का होईना भटसाहेबांचा सहवास मिळे. कारण, पंतांच्या गोटातलं त्यांच्या 'मठी'तलं (हा त्यांचाच समर्पक शब्द) दिवसाचं वातावरण सर्वस्वी वेगळंच असे. त्यामानानं रात्री माणसांची वर्दळ तशी कमीच. दोनेक माणसं. गिनीचुनी. वेचक. रात्री ११ नंतर तर फक्त भटसाहेब आणि मी असे दोघंच. दिवसा त्या मठीत माणसांचा इतका राबता असायचा, की काही विचारू नका. आता उतारवयाकडं झुकलेले; पण तेव्हा प्रौढत्वात असलेले गझलकार. तेव्हा नवतारुण्यात असलेले; पण आता प्रौढत्वाकडं निघालेले माझ्या वयाचे नवोदित गझलकार, न-गझलकार; पण कवी, लेखक-साहित्यिक, राजकीय कार्यकर्ते, भटसाहेबांच्या गझलपठणाचे (हाही त्यांचाच शब्द. किती अन्वर्थक!) कार्यक्रम ठरवायला येणारी तद्दन व्यावसायिक मंडळी, भटसाहेबांच्या आगामी पुस्तकांविषयी चर्चा करायला येणारी प्रकाशन-व्यवसायातली जाणकार मंडळी, भटसाहेबांची मुलाखत घेण्यासाठी आलेले निरनिराळ्या वृत्तपत्रांचे बातमीदार, संगीतक्षेत्रातले नामवंत, काही अनाहूत चाहते...एक झाला की दुसरा...दुसरा झाला की तिसरा...(कधी कधी ह्यातले अनेकजण एकाच वेळीसुद्धा) अशी साखळी सुरूच असायची. पंतांच्या गोटातल्या तळमजल्यावरच्या ब्लॉकच्या समोरच्या इमारतीत रस्त्याच्या पलीकडं एक खेडूत महिला अमृततुल्य हॉटेल चालवत असे. घराच्या मोठ्या खिडकीतून ते 'अमृततुल्य' सहजपणे दिसे. तिथला चहा एकदम फक्कड नि फर्मास असायचा. साहजिकच भटसाहेबांना तो आवडे. मग आलेल्या पाहुण्यांसाठीही तिथंच चहाची ऑर्डर दिली जाई. स्वतः भटसाहेबच खणखणीत आवाजात खिडकीतून ओरडून ती देत. चहा घेऊन येणाऱ्या तिथल्या बारक्याचं नाव त्यांना अनेकदा आठवत नसे. मग त्यांच्या आवडत्या शब्दाचा वापर करून ते त्या बारक्याला उद्देशून हाका मारत : 'अरे, ए पंटर...' (त्यांचा आणखी एक असाच आवडता शब्द होता. कार्टून! विशेषतः कार्यक्रम ठरवायला येणाऱ्या बेरकी-बिलंदर व्यावसायिकांसाठी हा शब्द ते त्या मंडळींच्या माघारी वापरत.
कार्यक्रमाचा आराखडा ठरवायच्या वेळी भटसाहेबांच्या काही अटी असत. त्या मान्य करण्यात समोरच्याकडून थोडं पुढं-मागं व्हायचं. मग ती मंडळी निघून गेल्यावर त्यातल्या प्रमुख चर्चकाला उद्देशून ते म्हणत : 'आता बघ, चर्चेच्या पुढच्या फेरीत ह्या कार्टूनची कशी गंमत करतो...!' अर्थात हे सगळं हलक्याफुलक्या पद्धतीनंच चालत असे. पुढं पुढं ते त्यांच्या खास वर्तुळातल्या तरुण मंडळींना उद्देशूनही कार्टून हा शब्द वापरू लागले. हे सगळं अगदी निर्विष विनोदानं चाले. हेटाळणी, कुचेष्टा, खिल्ली ह्यांचा वासही ह्या गमतीला नसे)
वर उल्लेखिलेली सगळी मंडळी बोलणारी वेगवेगळी असत; पण त्यांच्याशी संवाद साधावा लागे तो भटसाहेबांना एकट्यालाच. त्यामुळं बोलून बोलून ते थकून जात. थकून जात; पण अशा गप्पांमध्ये रमतही. 'गप्पांमुळंच थकवा आणि गप्पांमुळंच रमणूक', अशी ती विचित्र आणि गमतीदार परिस्थिती असे. गप्पांच्या ओघात स्वतःच्या कविता- गझला ऐकवणं, ही तर त्यांची खासियतच होती.
'समोर कुणी साध्यातला साधा माणूस आहे, मग मी त्याला कशी काय माझी कविता/गझल ऐकवू?' असा विचारही भटसाहेबांच्या मनाला शिवत नसे.
'साधीसुधी ही माणसे माझ्या कवित्वाची धनी' ह्या त्यांच्याच ओळीची रोकडी प्रचीती देणारा तो पठणसोहळा आणि श्रवणसोहळा असायचा. अशा कितीतरी घरगुती मैफलींचा साक्षीदार मला होता आलं. आता ते सगळं आठवलं, की एक वेगळाच हुरहुरता आनंद मनात जागा होतो.
'जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही' ही रचना ते अशा काही तन्मयतेनं आणि आर्ततेनं म्हणायचे, की अंग नकळत सरसरून जावं! हीच गोष्ट 'देखावे बघण्याचे वय निघून गेले' ह्याही रचनेविषयीची. 'जय जन्मभू, जय पुण्यभू' ही रचना गाताना त्वेष आणि हळुवारपणा ह्यांचं एक वेगळंच संमिश्रण त्यांच्या आवाजात होई. त्यांचा आवाज असा काही खणखणीत लागे तो 'भीमराया, घे तुझ्या ह्या लेकरांची वंदना!' ही रचना म्हणून दाखवताना.
कोणते आकाश हे ?
तू अम्हां नेले कुठे
तू दिलेले पंख हे...
पिंजरे गेले कुठे ?
या भराऱ्या आमुच्या...ही पाखरांची वंदना!
ह्या ओळींची आवर्तनं ऐकणाऱ्याच्याही मनात वलयांवर वलयं उठवत.
त्यातलं ते खास कडवं तर अंगावर सरसरून काटा आणी...
जाळले गेलो तरी
सोडले नाही तुला
कापले गेलो तरी
तोडले नाही तुला
ही तुला उद्ध्वस्त झालेल्या घरांची वंदना!
आपण आलो होतो कुठल्या कामासाठी आणि आपल्यासोबत कुठलं निधान घेऊन चाललोय, ह्याचा अंदाजच ही मैफल ऐकून निघणाऱ्याला काही काळ येत नसे.
तो तृप्त-समृद्ध होऊन निघून जाई.
अशाच अनौपचारिक मैफलींमधून भटसाहेब त्यांची काही वेचक मुक्तकंही ऐकवत असत. 'आकाशगंगा'चे काही स्पंदही - मूड, त्यांचा असेल तर आणि नशीब, ऐकणाऱ्याचं असेल तर - ऐकायला मिळायचे. एक स्पंद असा आहे :-
'आज ह्या वेड्या मनाचा
जोगिया गाऊन झाला...
दूरच्या हाकेप्रमाणे
ऐकतो आता स्वतःला '
'स्वतःलाच दूरच्या हाकेप्रमाणे ऐकणं' ही अद्भुत कल्पना ऐकून एका जोडप्यातली स्त्री अशी काही स्तब्ध होऊन गेली होती, की तिला पुढं काही बोलणंच सुचेना...बराच वेळ! तिचे डोळे डबडबून गेले होते.
'आकाशगंगा' हे भटसाहेबांचं खंडकाव्य खरंच अतिशय अद्भुत होय. काव्यातून स्वतःशीच केलेला इतका मनस्वी आणि अंतर्मुख संवाद मराठीत दुसरा नसावा.
एका मैफलीत त्यांनी ऐकवलेली एक रुबाई (रुबाईची काही ठराविक वृत्तं असतात. अशी 24 वृत्त आहेत आणि त्याच वृत्तांमध्ये रुबाई लिहिली जाते, अशी माहिती भटसाहेबांनी एकदा मला दिल्याचं आठवतंय. सरसकट कुठलीही चार चार ओळींची रचना 'रुबाई' या संबोधनाला पात्र नसते, असंही त्यांनी सांगितलं होतं.) आणि एक मुक्तक ऐकताक्षणीच माझं पाठही होऊन गेलं होतं.
रुबाई अशी होती :-
केव्हाच तुला 'थांब' म्हणालो नाही
केव्हाच तुला शोधत आलो नाही
ओठांत तुझ्या उत्तर माझे होते
मी मात्र कधी प्रश्नच झालो नाही
आणि त्यांनी ऐकवलेलं मुक्तक होतं :-
पाठ दाखवून अशी दुःख कधी टळते का ?
अन् डोळे मिटल्याने दैव दूर पळते का ?
जीव असा पाखडून हाती येणार काय ?
दाण्याचे रडणे ह्या जात्याला कळते का ?
हे मुक्तक मुळातच आर्त आहे आणि भटसाहेबांच्या आवाजातून त्याची आर्तता अधिकच गहिरी होऊन जाई.
* * *
ِ
'झंझावात'ची प्रत मला अद्याप दिलेलीच नाही, असं भटसाहेबांना वाटलं होतं. मात्र, मी दिली असल्याचं लक्षात आणून देत असतोपर्यंत त्यांनी माझं नाव प्रतीवर लिहिलंही होतं. म्हणून मग ही आणखी एक प्रत त्यांनी मला भेट दिली.
भटसाहेबांकडं जाणं-येणं सुरू झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या दोन-चार दिवसांत त्यांनी मला अचानकच प्रश्न केला : 'आपण गझलच लिहावी, असं तुम्हाला का वाटलं?'
मी एकदमच गडबडून गेलो...मनात म्हटलं, इथं गोलमाल उत्तर दिलं, तर अंगाशी यायचं. खरं काय ते सांगून टाकावं झालं!
मी म्हणालो : 'शाळेत असल्यापासून, म्हणजे आठवी-नववीपासून, मला कविता करायचा नाद लागला. पुढं 'एल्गार' वाचून वाचून, आपणही असं काहीतरी लिहावं असं वाटू लागलं. गझल लिहिली तर आपलंही नाव होईल, असं वाटल्यानं मला गझल लिहावीशी वाटली.' (हो! तसं मी त्यांना पत्रातूनही कळवलं होतं! किती मी धाडसी!!)
मात्र, हे नाव वगैरे होणं हा अगदीच क्षुद्र, वरवरचा हेतू झाला, तसा तो अजिबातच असता नये, हे पुढं मला बिनचूक कळून चुकलं, हा भाग वेगळा.
माझ्या ह्या उत्तरावर भटसाहेबांनी माझ्याकडं नीट(च) पाहिलं...आणि म्हणाले : ''हे बघा, कुर्कल्णी...प्रदीप ना तुमचं नाव? आता मी जे सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका. नाव व्हावं म्हणून कधीही लिहू नये. लिहिल्याशिवाय राहवत नाही म्हणून लिहावं. ('कधीही' हा शब्द उच्चारताना उजव्या हाताची तर्जनी त्यांनी मूठ स्थिर ठेवत अशा काही आग्रही पद्धतीनं हलवली, की तो मुद्दा माझ्या मनात त्या मुठीसारखाच स्थिर झाला. पुन्हा "राहवत नाही' हे शब्द ठाशीवपणे उच्चारल्यानंतर 'म्हणून' शब्द उच्चारताना तीच तर्जनी त्यांनी जमिनीच्या दिशेनं अशा वेगानं नेली, की तोही मुद्दा माझ्या मनावर खोलवर परिणाम करून गेला). नाव व्हावं म्हणून लिहिणारेही असतात; पण ते चमकतात, चमकतात आणि विझून जातात. गझल मनापासून आवडली, तरच तिच्या वाटेला जा. गझल मनापासून आवडत नसेल आणि नावासाठी तिच्याकडं वळला असाल, तर ही वाट सोडून आत्ताच वेगळी वाट धरा. आणखी एक सूत्र लक्षात ठेवा. साधना-सिद्धी-प्रसिद्धी. आधी साधना...मग साहजिकच सिद्धी...आणि सिद्धीनंतर आपोआपच प्रसिद्धी. प्रसिद्धीसाठी वेगळं असं काहीच करावं लागत नाही.''
* * *
मी गझल लिहीत असल्याला आता तीसहून अधिक वर्षं सहजच होऊन गेली आहेत. ह्या एवढ्या प्रदीर्घ काळात गझल ही माझी मानसिक गरज कधी होऊन गेली, हे माझं मलाही समजलं नाही. अलीकडं तर जणू व्यसनंच.
राहवत नाही म्हणूनच मी लिहितो. लिहून काढल्याशिवाय मन मला स्वस्थ बसूच देत नाही. अगदी जागजागून मी गझला लिहीत राहतो. काळी काळी रात्र निळ्या निळ्या पहाटेत रूपांतरित होत असण्याच्या संधिकालापर्यंत... लिहिण्यासारखा दुसरा आनंद नसतो (किंबहुना, तोच एकमेव खराखुरा आनंद असतो) ह्याची माझी माझ्यापुरती प्रचीती मला ह्या प्रदीर्घ काळात पुरेपूर आलेली आहे. लिहिणं अगदी मनातल्या सारखंच उतरलं असेल तर हा आनंद द्विगुणित होतो. मात्र, खरं सांगायचं तर 'केवळ लिहिणं' हीच बाब मला शतगुणित आनंद देणारी आहे.
'राहवत नाही म्हणून लिहावं,' हा भटसाहेबांनी मला माझ्या वाढाळू वयात दिलेला सल्ला मला इतका मनापासून भिडला, की आता प्रौढत्वातही तोच माझा पिंड बनून गेला आहे. राहवत नाही म्हणूनच मी आजवर गझल लिहीत आलो आणि ह्यापुढंही राहवत नाही म्हणूनच मी लिहीत राहीन.
भटसाहेबांनी कधी कुणाला शब्द मागितला नव्हता...पण माझ्यापुरता माझ्या बाजूनं त्यांना हा एवढा शब्द तूर्तास पुरेसा आहे!
'सप्तरंग' ह्या संग्रहाची भटसाहेबांनी मला भेट दिलेली प्रत. 'ही प्रत तशी नुसती 'कोरडी' न देता कवितेच्या काही ओळी लिहूनच मी तुला हा संग्रह भेट देतो, ' असं म्हणून त्यावर एक मुक्तक लिहून ही प्रत त्यांनी मला भेट दिली. ते पुण्याहून नागपूरला निघालेले असताना मी त्यांना निरोप द्यायला रेल्वेस्टेशनवर गेलो होतो. तिथं रेल्वेगाडीत त्यांनी मला ही प्रत दिली. तारीख होती 12 ऑगस्ट 2002. भटसाहेबांची आणि माझी ही शेवटचीच भेट! शेवटी, ते मला ही अशी सुंदर आठवण देऊन गेले.
- प्रदीप कुलकर्णी
प्रतिसाद
ज्ञानेश.
शनि, 06/05/2017 - 22:50
Permalink
व्वा !
व्वा !
लेख आवडला आणि आठवणी छान वाटल्या. भटसाहेबांचा एवढा प्रदीर्घ, अर्थपूर्ण सहवास लाभणेही भाग्याचे.