शेरो-शायरी : प्रस्तावना

नमस्कार काव्य-प्रेमी मित्रांनो,
आज दि.१५ अप्रिल रोजी कै. सुरेश भट ह्यांच्या जन्म-दिनाचे औचित्य साधून शे(अ)रो-शायरी ही नवीन लेखमाला सुरु करताना मी आनंदलो आहे.

ह्या उपक्रमाविषयी आणि त्याच्या नावाविषयी थोडेसे सांगतो-
गेले काही महिने , नावाजलेल्या उर्दू शायरांच्या काही निवडक गझलांचा अर्थ काव्य-प्रेमींपर्यंत पोहोचविण्यासाठी काहीतरी करावे असे मनात होते. ह्याचे कारण असे की, जालाच्या माध्यमातून माझा अनेक काव्य-प्रेमींशी परिचय झाला आहे. त्यातील बहुतेक जण उत्तम मराठी कविता, गझल लिहितात. पण जेंव्हा मी त्यांना अमुक-अमुक शायराची ही उर्दू गझल वाचली आहे का, असे विचारले, तेव्हा अनेकांनी मला ’आम्हाला उर्दू अजिबात कळत नाही,आणि त्यामुळे त्या गझलांचा आस्वाद आम्हाला घेता येत नाही’ अशी खंत व्यक्त केली. अश्या मित्रांसाठी आपण काहीतरी करायला हवे असे मनापासून वाटले. मग असा विचार केला की आपण जालावर वा इतर ठिकाणी ज्या उर्दू गझलांचा आस्वाद घेतो , त्यातील आपल्याला जे जे उमजले, भावले, त्यातील थोडेसे काव्य-प्रेमी मित्रांशी का बरे ’शेअर’ करु नये?; आणि त्यातूनच शेरो-शायरी ह्या संकल्पनेचा आणि शीर्षकाचा जन्म झाला. शेरो-शायरीतील अर्थ आपल्यासोबत ’शेअर’ करायचा प्रयत्न, म्हणून शेरो-शायरी हे नाव!

आणखी एक सांगावेसे वाटते की उर्दू विषयी मला सुद्धा, उर्दू ही भाषा उजवीकडून डावीकडे लिहितात, ह्यापलिकडे फारसे काही माहिती नाही:). पण जे-जे काही थोडेसे जाणले ते आपल्यासोबत शेअर करण्यासाठी हा लेखन-प्रपंच!
दुसरे म्हणजे असे की, ही लेखमाला मर्यादित भागांचीच ठेवायची असा मानस आहे, फक्त अकरा! (कविता ह्या विषयाशी ही लेखमाला संबंधित असली तरीही कविता नावाच्या निर्मातीच्या ’क’ पासून नाव सुरु होणाऱ्या,आणि अखंड चालणाऱ्या हिंदी मालिकांसारखी ती नसणारेय:)). शिवाय फक्त निवडक शेरच आपण घेणार असल्यामुळे-(फक्त पाच-सहाच), पोस्ट्चा आकारही फारसा मोठा नसेल. २-३ आठवड्यातून एक पोस्ट करायचा प्रयत्न करेन.