शे(अ)रो शायरी, भाग-५ : दोस्ती से दुश्मनी शरमाई रहती है
नमस्कार काव्य-प्रेमी मित्रांनो,
"हमारी दोस्ती से दुश्मनी शरमाई रहती है’ असा मतल्यातला पहिलाच मिसरा असलेली गझल, आणि ती आपल्याशी ह्या लेखमालेच्या ५व्या भागात’शेअर’ करताना, आजचा ’मैत्री दिवस’ हा ’मुहूर्त’, हा खरे तर परमेश्वरानेच जुळवून आणलेला एक छान योगायोग म्हणावा लागेल. आधी त्याचेच आभार मानतो. असो.
मित्रांनो,
अस्सल भारतीय मातीचा गंध असलेली एका शायराची शायरी अलिकडेच माझ्या वाचण्यात आली. त्या शायराचे नाव आहे, मुनव्वर राणा! त्यांची शायरी समजायला अतिशय सोपी, आणि भारतीय लोकजीवनातील प्रतिमा, दाखले, कल्पना, ह्यांनी अतिशय चित्तवेधक अश्या ढंगाने नटलेली आहे. त्यांच्याच एका, मला आवडलेल्या, एका गझलेची निवड मी ह्या भागासाठी केली आहे. गझलेचा मतला असा आहे की-
हमारी दोस्ती से दुश्मनी शरमाई रहती है
हम अकबर हैं हमारे दिल में जोधाबाई रहती है
अकबर-जोधाबाईच्या कथेतील ऐतिहासिक सत्य थोडा वेळ जरा बाजूला ठेवले, तर ह्या शेरातील भाव-सौंदर्य चटकन दिसेल. ह्या शेराकडे जरा ’इश्किया’ ढंगाने बघावे. शायराला अकबराचे उदात्तीकरण तर करायचे नाही असेही एखाद्या वेळेस वाटू शकते, पण तसे मुळीच नसावे, किंबहुना नाहीच. शायर हे म्हणतो आहे की खऱ्या प्रेमावर, दोस्तीवर मी इतर कुठल्याही प्रकारचे शत्रुत्व, मग त्याचे मूळ धर्म-भेद, राजकारण, किंवा इतर काहीही का असेना, किंवा ते कितीही कट्टर का असेना, ओवाळून टाकायला, संपवून टाकायला तयार आहे. आणि ही दोस्तीची भावना इतकी उदात्त आहे की तिच्यासमोर कुठलेही वैर खचितच ओशाळून जाईल. अकबर-जोधाबाईची कथा सर्वांना माहिती आहेच, त्याविषयी जास्त काय लिहावे? पण एक सांगू? मला ह्या शेरात, एका अंगाने, भारतीय संस्कृतीवर, ह्या भूमीवर सच्चे प्रेम करणाऱ्या अश्या एका मुसलमानाचे हृदयच दिसले,ज्याच्यावर इथल्या मूल्यांशी निष्ठावान नसल्याचा बरेचदा आरोप होतो.असो.
ह्या पुढचा शेर देखील अगदी शैलीदार आहे. शायर म्हणतो की-
किसी का पूछना कब तक हमारी राह देखोगे
हमारा फ़ैसला जब तक कि ये बीनाई रहती है
[ बीनाई= दृष्टी ]
वाह! क्या बात है! शायराला जेंव्हा प्रेयसी विचारते की मी तर आता तुझ्यापासून दूर जातेय, कधी भेट होईल कुणास ठाऊक? माझी वाट तू कधीपर्यंत बघशील? तर शायर म्हणतो की जोपर्यंत ईश्वराने दिलेली ही दृष्टी शाबूत आहे तोपर्यंत मी तुझी वाट बघेन, प्रिये! खऱ्या अर्थाने तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसेन!...आणि शायर ’फैसला’ असे म्हणतोय, म्हणजे मी माझ्या ह्या इराद्यापासून कदापीही ढळणार नाही. ह्या शेरातील अंदाज-ए-बयाँ मला खूपच भावला.
ह्या पुढचा शेर, रुपक अलंकाराचे एक सुंदर उदाहरण आहे. मुनव्वर म्हणतात की-
मेरी सोहबत में भेजो ताकि इसका डर निकल जाए
बहुत सहमी हुए दरबार में सच्चाई रहती है
[ १) सोहबत = सोबत, २) सहमी हुए= घाबरलेली ]
राजसत्तेसमोर आपली अस्मिता विसरून सतत मान तुकविणाऱ्या, सत्ताधीशांची निव्वळ हांजी हांजी करणाऱ्या टिपिकल भारतीय प्रवृत्तीला कविने एकदम खडे बोल सुनावले आहेत. कवि सत्याला इथे एक लहान बालिका मानून तिला आपल्यासोबत राज-दरबारात पाठविण्याचे इतरांना सांगतो आहे. तो म्हणतोय की मी दरबारात अगदी राजालाही न घाबरता कसा निर्भयतेने बोलतो ते तिने बघावे, म्हणजे तिचे भयच निघून जाईल. सत्य-प्रिय असून सुद्धा सत्तेसमोर ते निर्भयपणे मांडण्याची भल्या-भल्यांची हिंमत होत नाही. अश्या सर्वांचे धैर्यच शायर ह्या शेरातून वाढवतो आहे. कविची, कितीही अप्रिय सत्य, अगदी निडरपणे मांडण्याची वृतीच ह्यात दिसून येते. सही लिहिला आहे शेर!
कुठल्याही परिपूर्ण गोष्टीला अपूर्णतेची एक झालर असतेच, हे जीवनातील नेहमी प्रत्ययास येणारे एक सत्य पुढील शेरात खूप छान व्यक्त झालेय
गिले-शिकवे ज़रूरी हैं अगर सच्ची महब्बत है
जहाँ पानी बहुत गहरा हो थोड़ी काई रहती है
[ काई= शेवाळ ]
शायराने इथे अतिशय गाढ प्रेमाला अत्यंत गहिऱ्या पाण्याची, डोहाची उपमा दिलीय, आणि अश्या प्रीतीत एकमेकांविषयी अधून-मधून होणाऱ्या लहान-सहान तक्रारींना पाण्यावरील शेवाळाची उपमा दिलीय! वाह! काय कल्पना-विलास आहे! आपणही बरेचदा हा अनुभव घेतला असेल, की एखादा वेळेस अगदी स्थिर, शांत पाणी पाहिले की त्यावर थोडेसे शेवाळ कुठे ना कुठे दिसतेच आणि आपण बहुदा असेच म्हणतो की इथे पाणी खोल असावे, किंवा इथे नक्कीच डोह असला पाहिजे, येथील खोलीचा अंदाज येत नाही. खरे प्रेम असेल तर, किंबहुना तरच, असे लहान-सहान खटके उडणार, हेच कवि सांगतोय. आणि त्याशिवाय खऱ्या प्रेमाला रंग सुद्धा येत नाही, हेही तितकेच खरे!
ह्यापुढील शेर तर अतिशय दर्दभरा आहे. कवि म्हणतोय की-
बस इक दिन फूट कर रोया था मैं तेरी महब्बत में
मगर आवाज़ मेरी आजतक भर्राई रहती है
हे प्रिये , तुझ्या विरहाच्या दु:खात मी कधी-काळी एकदाच खूप रडलो होतो, पण तो घाव, त्या वेदना, ती व्यथा, इतका काळ लोटला तरी इतकी गडद आहे की, आजही माझा आवाज गदगदलेलाच भासतो, माझा स्वर अजूनही कातर वाटतो. कई साल गुजर गये, लेकिन यह जख्म अभीभी हरा है! खरेच, एकदम आर-पार जाणारा शेर आहे! असो.
भारतीय संस्कृतीतील भावजई आणि दीर ह्या पवित्र नात्याचा अतिशय कलात्मक ढंगाने ह्या गझलेच्या शेवटच्या शेरात मुनव्वर राणा ह्यांनी दाखला दिलाय. ते म्हणतात की-
ख़ुदा महफ़ूज़ रक्खे मुल्क को गन्दी सियासत से
शराबी देवरों के बीच में भौजाई रहती है
[१) महफ़ूज = सुरक्षित, २) सियासत= राजकारण ]
ह्या शेरात भावजाई हे सत-प्रवृत्तीचे प्रतीक असून, ’शराबी देवर’ हा अप-प्रवृत्तीचे प्रतीक आहे. आणि ह्या कुठल्याही समाजात एकत्र असणारच, आणि आज तर सत-प्रवृत्तींना अप-प्रवृत्तींचा विळखाच पडला आहे. पण ह्या देशाची संस्कृती इतकी महान आहे की सत-प्रवृत्ती ही अप-प्रवृत्तीलाला नेहमीच मोठ्या मनाने माफ करत आलेली आहे, आणि म्हणूनच सज्जन व दुर्जन आपल्या इथे गुण्या-गोविंदाने नांदत आहेत. सामाजिक सलोखा अजूनही टिकून आहे आपल्या इथे, हे एक आश्चर्य असले तरी! पण ह्या देशातील राजकारणी लोक इतके घाणेरडे आहेत, की ते दुर्जनांना सज्जनांविरुद्ध भडकवून इथल्या लोकांची निकोप मने, त्यांच्यातील सलोखा ,आपल्या स्वार्थासाठी कायमचे कलुषित करायला कमी करणार नाहीत. म्हणून शायर देवाला प्रार्थना करतोय की हे ईश्वरा, माझ्या देशाला तू अश्या अत्यंत हीन, घाणेरड्या राजकारणापासून सुरक्षीत ठेव!
चला तर, आता आपला निरोप घेतो. बाय बाय! आपल्या सर्वांना मैत्री-दिनाच्या अनेक शुभ-कामना!
-मानस६