शे(अ)रो-शायरी , भाग १०: वह शख़्स कि मैं जिससे मुहब्बत नही करता

मित्रांनो,
’प्रत्येक शेरात एक चांगला विचार, अतिशय साध्या, पण चटकन अपील होणाऱ्या शैलीत मांडल्या गेलेली, कतील शिफाई ह्यांची एक साधी-सोपी गझल अगदी अलिकडेच माझ्या वाचण्यात आली, आणि तीच मी शे(अ)रो-शायरी ह्या लेखमालेच्या १० व्या भागात आपल्याशी ’शेअर’ करतोय.
मतला असा आहे की-

वह शख़्स कि मैं जिससे मुहब्बत नही करता
हँसता है मुझे देखके नफ़रत नहीं करता

[ १) शख़्स=व्यक्ती ]

ह्या शेरातील खुबी म्हणजे, मुहब्बत नही करता, म्हणजे तिरस्कार करतो, आणि नफ़रत नही करता, म्हणजे प्रेम करते अश्या अर्थाने केलेले शब्द-प्रयोग! शब्दार्थ तसा अगदी सोपा आहे की, अमुक एक व्यक्ती, की जिच्यावर मी प्रेम करत नाही, म्हणजे तिचा तिरस्कार करतो, ती मात्र माझ्याकडे बघून हसते, ती माझा तिरस्कार नाही करत, उलट माझ्यावर प्रेमच करते. सर्वांप्रती स्नेहाची भावना असावी, अशी खरे तर मानवतेची शिकवण आहे, पण तरी देखील मी अमुक एका व्यक्तीचा तिरस्कार करतो. पण ती व्यक्ती?... ती मात्र माझ्या अगदी विरुद्ध स्वभावाची आहे, दर्या-दिल आहे. माझ्या मनात तिच्या विषयी प्रेमाची भावना नाहीय, हे जाणून सुद्धा ती माझा तिरस्कार करत नाही, उलट ती माझ्यावर स्नेहच करते. कविने त्याला आलेल्या ह्या जीवनानुभवाकडे तटस्थपणे बघितल्याचे जाणवते...मी एखाद्या व्यक्तीचा तिरस्कार का आणि कशासाठी करतो, असा प्रश्नच कवि स्वत:ला विचारतोय. आपल्या मनाच्या कोतेपणाची त्याला जाणीव होतेय. इतरांकडे बघण्याचा किंवा त्यांच्याशी वागण्याचा आपला attitude आपण बदलायला हवा, आणि कुणीही कुणाचा तिरस्कार करू नये, असेच कविला सुचवायचे आहे.

पकड़ा ही गया हूँ तो मुझे दार पे खींचो
सच्चा हूँ मगर अपनी वकालत नही करता

[ १) दार=सूळ ]

कवि म्हणतोय की माझ्या हातून एखादा गुन्हा घडताना जर मी पकडल्या गेलो असेल तर बेलाशक मला सूळावर द्या. मी एक सच्चा, न्याय-प्रिय मनुष्य आहे, आणि (म्हणूनच) मला कुठल्याही वकिलाची गरज नाहीय. ’खरे तर मला हे करायचेच नव्हते,... त्याचे काय झाले’ अश्या सबबी मी कधीच सांगणार नाही. माझ्या चूकांवर पांघरूण घालण्याचे माझी वृत्ती नाहीय; कायद्यातील पळवाटा मी कधीच शोधणार नाही. मी चूक केलीय त्याची पूर्ण शिक्षा मला मिळायलाच हवी. I do not have any internal defences inside me to cover up for my wrong deeds.

घरवालों कों ग़फलत पे सभी कोस रहे हैं
चोरों को मगर कोई मलामत नही करता

[ १) ग़फलत=ढिसाळपणा २) मलामत=निर्भत्सना, निंदा ]

’घरात चोरी होणे’ ह्या घटनेकडे कवि किती वेगळ्या दॄष्टीने पाहतोय ते बघण्यासारखे आहे. तो म्हणतो की घरात चोरी झाली तर सगळेजण घरात जो राहतो त्यालाच दोष देतात. ’तुम्ही जाताना खिडकी का उघडी ठेवलीत, कुलूप जुनेच का लावले, घरातला लाईट चालू का ठेवला नाही, तुम्ही आतापर्यंत सेफ्टी डोअर का बसविले नाही?.. एक ना दोन, असे अनेक प्रश्न घरमालकाला विचारून त्यालाच दोषी ठरविल्या जाते. पण ज्याने चोरी केली, त्या चोरांना कुणीच दोष देताना, किंवा त्यांची निंदा करताना दिसत नाही. खरे तर चोरी करणे हा गुन्हा आहे, घराची खिडकी उघडी ठेवून बाहेर जाणे हा गुन्हा नाहीय. मग ज्याचा तत्वत: दोषच नाहीय, त्याला का म्हणून दूषणे द्यायची, असा एक तर्क-शुद्ध आणि बेसिक थॉट कविने मांडलाय, जो खोडून काढता येत नाही.

किस क़ौम के दिल में नहीं जज़्बात-ए-इब्राहीम
किस मुल्क पर नमरूद हुकूमत नही करता

[ १) क़ौम=वंश, राष्ट्र २) जज़्बात=विचार, भावना ३) इब्राहीम= एक मुस्लीम संत, ज्यांनी आयुष्यभर सच्च्या मुस्लीम धर्माचे तंतोतंत पालन केले. ४) नमरूद= एक अत्याचारी राजा, जो स्वत:लाच ईश्वर समजायचा]

आपल्या अवती-भवती जे राजकीय नेतृत्व दिसते त्याला अगदी लागू पडणारा शेर आहे हा! कविने शेराच्या दोन्ही मिसऱ्यात जे प्रश्न विचारले आहेत, त्यातच त्यांचे उत्तर देखील आहे! शायर म्हणतोय की असा कुठला देश आहे की, जेथील लोकांच्या हृदयात आपण नेहमी धर्माने दाखविलेल्या मार्गानेच चालावे अशी भावना, असा नेक विचार नाहीय? ( इथे संत इब्राहीम ह्यांचे उदाहरण प्रतीकात्मक आहे). जगभरात सर्वदूर सामान्य जनता ही सरळ-मार्गी, सत्य-प्रिय, नेक-दिल अशीच आहे, पण असे असून सुद्धा तिला जे राज्यकर्ते लाभले आहेत, ते मात्र नमरूद राजासारखेच स्वत:लाच ईश्वर समजणारे, अहंकारी, आणि अत्याचारी आहेत. आपलाच देश कशाला, इतर कुठल्याही देशाचे उदाहरण घेतले, तरिही कमी किंवा जास्त प्रमाणात हीच परिस्थिती दिसून येईल. हा नियतीचा एक विचित्र संकेत म्हणावा हवे तर, पण सरळ-मार्गी जनतेला त्यांचे शासक मात्र जुलूमीच असलेले लाभतात, असेच बहुदा दिसून येते. ! देशातील लोक जरी सत्प्रवृत्तीचे असतील तरी राजकारणात मात्र अपप्रवृत्तींचाच वावर जास्त दिसतो, असेही कविला सुचवायचे असावे.

भूला नहीं मैं आज भी आदाब-ए-जवानी
मै आज भी औरों को नसीहत नहीं करता

[ १) आदाब= शिष्टाचार, नियम २) नसीहत=उपदेश ]

दुसऱ्यांना उपदेश करण्याचा अधिकार वयोवृद्ध व्यक्तींना असतो; कारण त्या जीवनानुभवाने परिपक्व झालेल्या असतात. तरूण व्यक्तींनी कुणालाही वडिलकीचा उपदेश वगैरे करू नये, हा समाज-मान्य प्रघात, शिष्टाचार आहे; तसे केल्यास त्याला अति-शहाणा समजल्या जाते. ह्या शेरात कवि म्हणतोय की आता जरी माझे वय झालेय, तरिही मी दुसऱ्यांना उपदेश किंवा सल्ला वगैरे कधीच देत नाही. माझ्या तरुणपणीचा हा संकेत मी अजूनही पाळतो. कारण जरी माझे वय वाढले असेल, तरीही दुसऱ्यांना उपदेश करण्याइतका मी अजूनही परिपूर्ण आणि परिपक्व झालेलो नाहीय, असे मी समजतो! केवळ वयोवृद्ध झाल्यामुळे एखादी व्यक्ती दुसऱ्यांना उपदेश करण्यासाठी परिपूर्ण होते, असे मी मानत नाही. कविची विनम्रताच ( humility) ह्या शेरात दिसून येते.

इंसान ये समझें कि यहाँ दफ़्न ख़ुदा है
मैं ऐसे मज़ारों की ज़ियारत नही करता

[ १) मज़ार= फकीराची समाधी, २) ज़ियारत=यात्रा ]

’इथे ईश्वराला दफ़न केलेय’ असे ज्या समाधीबाबत लोक म्हणतात त्या समाधीवर मी तीर्थ-यात्रेसाठी कधीच जात नाही, असे कवि म्हणतोय. कारण ईश्वर, जो चैतन्य-स्वरूप आहे, सर्व-साक्षी आहे, सर्व चराचरास व्यापून उरला आहे, त्याला कसे काय दफ़न करता येईल? ईश्वराला दफ़न केलेय, हा विचारच अज्ञानमूलक आहे, जो तात्विक-दृष्ट्या मला पटत नाही. आणि जिथे अश्या विचारांचे, अज्ञानी,मूढ लोक आहेत तिथे मी कधीही जाणार नाही, जाऊ शकत नाही. कविच्या जीवन-विषयक चिंतनातील प्रगल्भता इथे दिसून येते.

दुनिया में ’क़तील’ इससे मुनाफ़िक नहीं कोई
जो जुल्म तो सहता है बग़ावत नही करता

[ १) मुनाफ़िक= प्रतिकूल, विरुद्ध; २) बग़ावत=बंड ]

अन्याय सहन करणे हे महत्पाप आहे ह्या गीतेतील विचारालाच कविने इथे पुष्टी दिलीय. मुकाट्याने अन्याय सहन करत रहायचे पण त्याविरुद्ध आवाज म्हणून उठवायचा नाही अश्या ज्या व्यक्ती आहेत त्याच मानव समाजाच्या खऱ्या शत्रू आहेत. जुलूम करणाऱ्या लोकांचे, समाजातील अश्या ’बंड न करण्याच्या’ प्रवृत्तीमुळेच फावते. अश्या लोकांमुळेच मानव जातीचे, जगाचे खरे नुकसान झालेय असे शायर म्हणतोय. आपल्या समाजात तर सर्वदूर हेच चित्र बघायला मिळते, नाही का?
-मानस६ (जयंत खानझोडे)