मागे जयजयकार चालला आहे

मागे जयजयकार चालला आहे
चौखांद्यावर स्वार चालला आहे

वाटेला पण लाज वाटली थोडी
या वाटे तो फार चालला आहे

आप्तांनाही रान मोकळे झाले
कंठाने मल्हार चालला आहे

जाळ्यामधुनी मुक्त जाहला 'तो' ही
केवळ हा उपचार चालला आहे

भाळी त्याच्या भस्म रेखिले होते
सरणावर संस्कार चालला आहे

होवो अथवा काकस्पर्श ना होवो
या पिंडातुन पार चालला आहे

भिंतीचा आधार चालला आहे
ओट्यावरचा भार चालला आहे.

-- बाळ पाटील

गझल: 

जुनी शाई नवी शाई लगेचच ओळखू येते
तुझी "इतिहास-भरपाई" लगेचच ओळखू येते

कुठे लपवायला जमते तुला प्रत्येक जखमेला
तुझ्या नटण्यातली घाई लगेचच ओळखू येते

इथे रात्री जरी लाख्खो फुलांचा गंध दरवळतो
मनाने वेंधळी जाई लगेचच ओळखू येते

जरी करतेस शब्दांची अशी आरास सोनेरी
तुझ्या डोळ्यातले बाई लगेचच ओळखू येते

उगाचच कान धरणे तू उगाचच मागणे माफी
कुणी केली दिरंगाई ..लगेचच ओळखू येते

मने पहिल्याच हप्त्याला पुन्हा भजतात स्वस्ताई
खिशांपुढली महागाई लगेचच ओळखू येते

आवरण

न यावी आठवण, आहे पुरेसे
न व्हावे जागरण, आहे पुरेसे..

जरी जगलोच नाही आजसुद्धा
तरी टळले मरण, आहे पुरेसे

जगाला भासतो आहे सुखी मी
मला हे आवरण आहे पुरेसे

तुला विसरायचे आहे ठरवले
तुझे इतके स्मरण आहे पुरेसे

जिथे दिसतात मर्यादा स्वत:च्या
असे वातावरण आहे पुरेसे

पुढे मोठा कुणी होईल तो, पण
मुलाचे मूलपण आहे पुरेसे.

- ज्ञानेश.

गझल: 

झोप लागायला पाहिजे

झोप लागायला पाहिजे
जागही यायला पाहिजे

वेळ असला तुला तर बसू...
आज बोलायला पाहिजे

याचसाठी पितो रोज तो
आग विझवायला पाहिजे

खूप झाल्या नव्या ओळखी
मित्र भेटायला पाहिजे

लक्ष नाही तुझे वाटते....
हाक मारायला पाहिजे

खेळ तू हारल्यासारखा
डाव रंगायला पाहिजे

.....जयदीप

गझल: 

काय देईल गारवा रस्ता

काय देईल गारवा रस्ता
जर उन्हाचा तुला हवा रस्ता

एक वस्ती पुकारते दुर्गम
एक इकडून पाठवा रस्ता

आज ती गोठवून गेली की
मंद आचेत वाफवा रस्ता

पोचतो जन्म त्याच मुक्कामी
घेत प्रत्येकदा नवा रस्ता

आज कोणी न आडवे आले
आज येईल आडवा रस्ता

एकमेकांमधे नका मिसळू
फक्त रस्त्यात कालवा रस्ता

सांजवेळी हयात छेडावी
गात राहील मारवा रस्ता

कोण आले असेल रस्त्यावर
फार करतोय वाहवा रस्ता

सोडले जर विचार तिमिराचे
खुद्द होईल काजवा रस्ता

ध्येय ठरवू नका स्वतःचे पण
फक्त रस्त्यास दाखवा रस्ता

गझल: 

मन आता हे कळल्यावरती उदास नाही..

मन आता हे कळल्यावरती उदास नाही..
रस्ता संपत आला आहे, प्रवास नाही!

फूल उमलले आहे..कुठले मनात त्याच्या
रंग जराही नाही...त्याला... सुवास नाही!

स्थान किती छोटेसे त्याला नभात आहे...
कळले सूर्यालाही आता..... मिजास नाही!

त्यांनी घोषित केले की तो पळून गेला!
केला ज्यांनी थोडा सुद्धा तपास नाही

शहर तुझे हे बघता बघता कळून आले
बदल जरासा झाला आहे, विकास नाही

.....जयदीप

गझल: 

हासल्यासारखी भासती माणसे

गझल - हासल्यासारखी भासती माणसे

हासल्यासारखी भासती माणसे
त्रासल्यासारखी हासती माणसे

फक्त ज्यांना मने मोडणे साधते
जोडली मी सदा खास ती माणसे

जो स्वतः खडबडी वाट चोखाळतो
तो म्हणे मत्सरी ग्रासती माणसे

गाढ आलिंगने द्यायची नाटके
दु:ख दु:खावरी घासती माणसे

फक्त एका क्षणाच्या भयाने इथे
शंभरी आपली नासती माणसे

त्याच रंगात ती जन्मली जाण तू
रंग जो जो तुला फासती माणसे

रोज येतो दिवस तेच ते घेउनी
पण तरी रोज आ वासती माणसे

'बेफिकिर' भासती ती तुझ्यावाचुनी
जी तुला पाहुनी त्रासती माणसे

गझल: 

गझल : ज्यामुळे जग ही नशीली रम्यता राखून आहे

ज्यामुळे जग ही नशीली रम्यता राखून आहे
ते तुझे अपसव्य कुठली सव्यता राखून आहे

येथले अस्तित्त्व जपणे हे खरे खोटारडेपण
बन अशी आख्यायिका जी सत्यता राखून आहे

तोडले केव्हाच आपण आपले नाते तरीही
का अशी , ते एक हल्की तन्यता राखून आहे

जीवघेण्या वेदनांवर हासणारी सांत्वने ही
पण तरी कळीज माझे सभ्यता राखून आहे

दाद द्यावी ह्या, मनाच्या एवढ्याश्या ओसरीला
एवढ्या दाटीतही जी , भव्यता राखून आहे

विठ्ठला तू ऐकशिल ना तर तुझ्या झरतील आर्ता**
आजही मन त्या गझलची शक्यता राखून आहे

-वैवकु

गझल: 

Pages