हा स्वत्वाचा तपास मानू आता

गझल - हा स्वत्वाचा तपास मानू आता

हा स्वत्वाचा तपास मानू आता
चल देहाला लिबास मानू आता

जेथे तेथे 'मी'च आडवा येतो
हे कळणेही विकास मानू आता

लिहायचे ते लिहिता आले नाही
आयुष्याला समास मानू आता

टोल फक्त मरणाचा द्यावा लागे
जन्माला बायपास मानू आता

केव्हाची आनंदी वाटत आहे
मनस्थितीला उदास मानू आता

ह्या वाटेवर एकटाच आहे मी
माझ्याइतके कुणास मानू आता

सर्व फुलांचे देठ सारखे होते
हा कोणाचा सुवास मानू आता

उगीच काहीतरी बघू जमते का
अंधाराला भकास मानू आता

गझल: 

अमल

खूप दिवसांनी भिजू सोन्यात चल
पसरला गावावरी पिवळा अमल

हात एकच मार स्थित्यंतर घडव
फार झाले तेच ते छुटपुट बदल

सर्व पुंजी फुंकुनी आलास पण
वाटली कोठे तुला खर्चिक सहल

आक्रमण कर आणि हो की मोकळा
युद्धनीतीवर किती करतोस खल

जिंकला कोणी कसा शिकणे नको
तो कसा स्पर्धेत ह्याचे कर नवल

निग्रहाने सोड इवला खंड हा
वाट पाहू लागले मोठे प्रतल
-------
विजय दिनकर पाटील

गझल: 

खोल डोहाच्या तळाशी साचलेला गाळ हो

खोल डोहाच्या तळाशी साचलेला गाळ हो
वा कुणी ना पोचते जेथे असे आभाळ हो

जाणत्यांच्या संस्कृतीला राहिलेला गर्भ तू
संपण्याची आणखी आरंभण्याची नाळ हो

तू नको खर्चूस ही माणूसकी जेथे तिथे
बस् कधी पडणार नाही जो असा दुष्काळ हो

येथले अस्तित्व कठपुतळीप्रमाणे मान तू
काळ आला आपला की आपला तू काळ हो

धाडले होतेस तेथे पाहिले राहून मी
ईश्वरा येथे तुझी शिजणार नाही डाळ हो

मी कसा आहे तुला जाणायचे झालेच तर
जे कुणीही ना कधी लाडावले ते बाळ हो

-'बेफिकीर'!

गझल: 

नदीला सागराची ओढ असली तर असू द्या ना

नदीला सागराची ओढ असली तर असू द्या ना
मला तुमच्यामधे थोडा तरी सागर दिसू द्या ना

गझल: 

एकदा शून्यास माझ्या तू वजा कर...

सांग तू... शंका तुला छळते किती ते
मोकळे आकाशही भरते किती ते...

एकदा स्वप्नातुनी सत्यातले बघ....
एकटे हे चांदणे सलते किती ते

सांग तू...समजाव तू आता स्वतः ला...
पाहतो आता तुला कळते किती ते !

एकदा शून्यास माझ्या तू वजा कर...
अन पहा ... बाकी तुझी उरते किती ते

तू तुझ्या सोडून बघ भलत्या अपेक्षा..
आपले नाते पुन्हा खुलते किती ते

.....जयदीप

गझल: 

इरेला पेटला आहे पिसारा

सुखाचा केवढा झाला पसारा
बिलगला वेदनेचाही पहारा

तुझ्या लाटेत सामावून घे ना
कधीचा थांबला आहे किनारा

तुझ्या वाणीत सारे भाव होते
नको सांगूस की केला पुकारा

तुझा रस्ता कधी चुकलो नसे मी
नसे ही बातमी आहे इशारा

किती चेकाळली स्वप्ने उराशी
पहा मिळताच थोडासा उबारा

अजुन तुडवीत आहे पाय काटे
अजुन नक्की नसे माझा निवारा

शरीराची उडाली फार थरथर
मनामध्ये कुठे होता शहारा?

मला सांगून गेला आपलेपण
तुझा तो एक ओळीचा उतारा

दुरुन नुसतेच तू नाचू नको ना
इरेला पेटला आहे पिसारा

गझल: 

खुल्या मनाने

खुल्या मनाने हसून घे
हवे तसे तू जगून घे

झुगार संकेत, बंधनांना
हवे तसे बागडून घे

सभोवतीच्या मनामनांना
दवाप्रमाणे टिपून घे

उद्या कदाचित् नसेन मी
भरून डोळे बघून घे

करीत जा मेहनत गड्या
पगारही वाढवून घे

गझल: 

नेहमी गर्दी तुला जी लागते

वर्षभर दुथडी भरूनी वाहते....
ही नदी कोठून पाणी आणते?

वाळवंटावर मनाच्या वाढते
आठवांचे रोप कोणी लावते...

कुंपणावरतीच आहे बहरते
वेलही लाचार झाली वाटते

वाहणे जीवन....कुठेशी थांबते...
अन् ढगाला कोसळावे लागते!

नेहमी गर्दी तुला जी लागते
केवढी माणूसघाणी वागते!

जयदीप

गझल: 

Pages