तुझे स्वच्छ हासू झळाळी उन्हाची...
Posted by वैभव देशमुख on Tuesday, 5 August 2014तुझे स्वच्छ हासू झळाळी उन्हाची
नजर होत जाते डहाळी उन्हाची
बिलगते तुला ते कुठेही कसेही
तुला चालते ही टवाळी उन्हाची
कशानेच जी खोडता येत नाही
अशी एक रेषा कपाळी उन्हाची
बसुन उंबऱ्याशी सकाळी सकाळी
किती प्यायचो मी शहाळी उन्हाची
कुणी पाहिली का कुणाच्या नशीबी
अशी बारमाही दिवाळी उन्हाची
महापूर आले किती सावल्यांचे
जशीच्या तशीही लव्हाळी उन्हाची
गगन सांडलेले रुपेरी सरोवर
चमकते जशी एक थाळी उन्हाची
तुझी आणि माझी उन्हे एक झाली
रुपे राहिली ना निराळी उन्हाची