गझल : माझ्या लक्षातच नाही

हा माल सुखाचा माझा का विकला जातच नाही
काय आज ह्या बाजारी कोणी दुःखातच नाही

नशिबाला पालटण्याचे केवढे यत्न केले पण
होणार कसे सांगा जर त्याच्या नशिबातच नाही

मी इथे जन्म घेण्याला झालीत कितीतर वर्षे
हे दुःख साजरे करणे माझ्या लक्षातच नाही

का नको त्यातिथे टाके घालत आहे हा शिंपी
आंधळाच आहे हा की काही पाहातच नाही

गावातिल सगळ्या शाळा आहेत मुलींच्या शाळा
हे पाहुन माझा मुलगा शाळेला जातच नाही

नेणिवबिंदूंतुन काही त्रिज्या खेचूया म्हटले
पण ह्या अमोघ परिघाला बहुधा संपातच नाही

-वैवकु

गझल: 

संगमावरी दोन्ही प्रवाह तुंबळ लढणे

गझल - संगमावरी दोन्ही प्रवाह तुंबळ लढणे

संगमावरी दोन्ही प्रवाह तुंबळ लढणे
पुढे लागणे बांधायाला अनेक धरणे

मागे पडलेल्यांनी ज्यास निवडले नेता
त्यास जमेना आता मागे वळून बघणे

आठवणींचा मळ हृदयावर साचत आहे
मेल्याशिवाय शक्यच नाही कुठे मिरवणे

स्वतःतुनी जर वजा न केले कधी स्वतःला
तर मग कुठले जमायला हे शून्य समजणे

नवी पिढी एवढी आंधळी कशी निपजली
अंधांना चष्मे विकणारा डोळस ठरणे

साथ सोडणार्‍यांना टुकटुक करत म्हणालो
आम्हाला तर अजून जमते वाट पाहणे

म्हणून मागे बघत नसावेत लोक काही
जमत नसावे पुढे जायला पाय उचलणे

गझल: 

मधेच वाहते मधेच थांबते

मधेच वाहते मधेच थांबते
हवा कुठे मनानुसार वागते?

चढून चार पावलात पोचलो
शिखर तुझे दुरून उंच वाटते

असेच रोज येत जात राहुया
नको म्हणूस पायवाट लोपते

उशीर व्हायचा असेल जर तुला
फलाट सोडताच ट्रेन थांबते

हवे असेल तेवढेच घ्यायचे
असे करून पान स्वच्छ राहते!

जयदीप

गझल: 

स्त्री समीप येते ...

स्त्री समीप येते प्रेम वाटल्यावरती
पण तुमची होते सत्य बोलल्यावरती

जे कळले नव्हते का जपायची होती
ते कळले आता लाज सोडल्यावरती

जे अपुले नाही त्यात तू नको गुंतू
मन होते बघ परकेच गुंतल्यावरती

ज्यांना जे मिळते आणखी मिळो त्यांना
आपल्यास मिळणे फक्त आपल्यावरती

जे दिसत नसे त्यालाच फक्त पूजावे
जे दिसते, येतो हक्क पूजल्यावरती

डोळ्यांनाही इतकी तहान लागावी
की पितात अश्रूंनाच साठल्यावरती

नाती अनेक आहेत सांगण्याइतकी
एकटा तरीही भाव दाटल्यावरती

भळभळा मनाची जखम वाहते आहे
थांबवू कशी मी प्रेम टोचल्यावरती

गझल: 

सांग कसे ते कण्हतानाही गात असावे...

सांग कसे ते कण्हतानाही गात असावे...
दगडाखाली आयुष्याचे हात असावे!

दगडांवरती रेघोट्यांची नक्षी आहे...
रस्ता बनवत पाणी खाली जात असावे

उडतो आहे पक्षी तुटलेल्या पंखांचा
खूळ नवेसे त्याच्याही डोक्यात असावे..

डोहामध्ये..पडल्यावरती वलये इतकी ..
काय कळेना पानाच्या स्पर्शात असावे!

खोदत आहे आयुष्याला केव्हाचा तो
खाण कशाची आहे.... त्याला ज्ञात असावे

जयदीप

गझल: 

नको तसे घडण्यावरती ह्यासाठी मन जडले होते

गझल - नको तसे घडण्यावरती ह्यासाठी मन जडले होते

नको तसे घडण्यावरती ह्यासाठी मन जडले होते
नको नको ते घडल्यावर जे हवे तसे घडले होते

त्या वाटेवर संध्याकाळी एकच जळता दिवा असे
एका जळत्या हृदयाला हे संकट आवडले होते

तो इथला झाला नाही कारण इथल्या प्रत्येकाला
इथे असावे कशास ह्याचे कारण सापडले होते

जन्माला जे आले नव्हते किंवा जे मेले होते
तितक्यांना मी अपुले केले......तितके परवडले होते

अजूनही हा जुनाट वाडा विकला गेलेला नाही
किंमत ठरता ठरता कोणी भरभरून रडले होते

गझल: 

वरून शांत शांत वाटते किती...

वरून शांत शांत वाटते किती...
मनातल्या मनात वादळे किती !

तुझी अजून वाट पाहणे किती....
क्षणाक्षणामधील ही युगे किती...

कसे कळेल काय पाहिजे तुला?
तुझे तुला खरेच समजले किती?

विरून संपतात 'शब्द' शेवटी
हवेत बोलतात माणसे किती !

बरेच सोडवून प्रश्न टाकले !
अजून या 'भ्रमात' उत्तरे किती ...

कसा प्रवास सांग व्हायचा सुरू...
तुझ्या तुझ्यामधेच अंतरे किती !

..... जयदीप

गझल: 

तुझी आभाळपुण्याई तुकोबा

नको टांगूस माझी लक्तरे ही
जगाला सांगतिल सगळे खरे ही

सयी सांभाळणारे पूर होते
'तशी'.. काठावरी काही घरेही

पुन्हा गोठ्यात हंबरतील गाई
पुन्हा लाडात येतिल वासरेही

जरा हासून बघ ह्या वेदनेला
पुन्हा येणारही नाही बरे ही

जरासे मौन घे आकाशगंगे
(किती वाचाळ आहे बापरे ही !)

निघू शतपावलीला सोबतीने
पहा मिटतील सारी अंतरे ही

दिशांनो द्या जरा ओढाळ हाका
पुढे जातील माझी पाखरे ही

असावी ही खरी किमया जिभेची
तुझी गोडी नसावी साखरे ही

तुझी आभाळपुण्याई तुकोबा
जळावरती तुझी गाथा तरे .. ही....

गझल: 

Pages