बात हम नहीं करते

कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला
तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही


मी दिशाभूल झालोय, अथवा
देत आहे मला वाट चकवा
काय तो ठाम घ्या आज निर्णय
काय ते आजच्या आज कळवा
दखल घेइल स्वत: आपली ती
सहज दुनियेकडे पाठ फिरवा
सारखे वाटते मरुन जावे..
हा असा काय आलाय थकवा?
निघुन जाईल हा 'आज' सुद्धा..
काय घडले तरी काल, परवा?
'देव' ही त्यातली एक आहे..
अन अशा खूप आहेत अफवा
-उगले इंद्रजित
नाव रिकामी लाटांवरती डोलत होती
कथा कुण्या सफरीची त्यांना सांगत होती
वादळ वेशीबाहेरच घोंघावत राहू दे
- मनोदेवता रोज प्रार्थना ऐकत होती
काही पाने हिरवी होती, काही पिवळी
दोन्ही एका झाडावरती नांदत होती
डोळे दिसले आरश्यामधे लाल सकाळी
एक आठवण पूर्ण रात्रभर बोचत होती
बेत स्वतःचे मनुष्यप्राणी ठरवित होता
एक योजना नियतीसुध्दा आखत होती
--------------------------------
खिन्न अंधारासवे आपण
क्षुद्र काही काजवे आपण
पंख होते आपल्यालाही
पाहिले नुसते थवे आपण
केवढा झाला जुना फोटो
केवढे झालो नवे आपण
वाढली नाही कधी तृष्णा
पीत गेलो आसवे आपण
एक वाहत राहिले पाणी
दोन झालो कालवे आपण
शोधते हे जग कधीपासुन
सापडायाला हवे आपण
-ज्ञानेश.
--------------------------------
बोलली डोळ्यातुनी ती आणि कविता सुचत गेली, एक वाणी, एक भाषा, का कुणी नाही बनवली
व्यक्त करण्या प्रेम माझी जीभ ही अडखळत गेली, एक वाणी, एक भाषा, का कुणी नाही बनवली
बोलण्या जन्मास आली आणि हिंसक बनत गेली, एक वाणी, एक भाषा, का कुणी नाही बनवली
विखुरली धर्मात गेली, जात सांगुन विरत गेली, एक वाणी, एक भाषा, का कुणी नाही बनवली
बोलताना तोल जातो, माणसाला कळत नाही, शब्द तोंडातून गेल्यावर पुन्हा तो वळत नाही
सावरावे तू जगाला, तूच का धडपडत गेली, एक वाणी, एक भाषा.. का कुणी नाही बनवली
थांग मनाचा कधी गवसला ?
हा प्रवास तर मृगजळातला
धूळ जांभया देत पसरली
धूळ बघत रस्ता पेंगुळला
एक जुना अलबम उरलो मी
लोखंडाच्या पेटीमधला
सांग तुझ्या आकाशामधला
तुला कोणता तारा हसला ?
ह्या पोटाची सब्बल झाली
जन्म कसा अवघा उचकटला
समूळ आलो येथे मी पण
कोण मूळचा आहे इथला ?
स्तब्ध अचानक झाली सळसळ
मनातसुद्धा वारा पडला
ते होत्याचे नव्हते झाले
दुःख सुखाच्या इतके झाले
बरे बोललो आपण आता
दोघांचे मन हलके झाले
पुढे निघाले काही रस्ते
काही वसले, इथले झाले
बघता बघता जमल्या इच्छा
मन इच्छांचे घरटे झाले
पुन्हा एकदा भुकंप आला
तुकड्यांचेही तुकडे झाले
शेर तुझ्यावर लिहिला आहे
तुझ्यासारखे मिसरे झाले
जयदीप