माझ्यातला चांगुलपणा वर आण तू
Posted by बेफिकीर on Tuesday, 17 June 2014
माझ्यातला चांगुलपणा वर आण तू
हो चांगला......मी चांगला हे जाण तू
सारे जुने होते तुझ्यासाठी नवे
केलेस काहीही कुठे निर्माण तू
तीही पुढे भासेल चंद्रासारखी
केलीस ह्या विश्वामधे जी घाण तू
नाही तिथे पडतो असा पाऊस मी
ज्यातून येते रोप तो पाषाण तू
सांगायचे होते......मला समजून घे
पण ठेवले नाहीस तितके त्राण तू
निश्चिंत कोणीही कसे नाही इथे
हैराण मी हैराण जग हैराण तू
घेशील जितका तेवढा वाढेल तो
सैलावलेल्या चिरगुटांचा ताण तू
शरणागती घेण्यास ते होते उभे
उडवायची होतीस दाणादाण तू