गझल

गझल

ध्यास मला (काही शेर...)

नवाच लागे ध्यास मला
हवा सुखाचा घास मला

असो कसेही जीवन हे
जगण्याचा हव्यास मला

जगावया श्वासापुरते,
पुरे तुझा विश्वास मला

गुलाब आणिक गंध जिथे
तुझाच होई भास मला

अधांतरी हा जीव फसे
मनोरथांचा फास मला

अनोळखी आहोत जणू..
नको असा सहवास मला

निघून मी गेल्यावर तू..
खुशाल दुनिये हास मला

पुन्हा पुन्हा स्वप्नात कसा
पुकारतो मधुमास मला..?

नको कुणाचे सांत्वनही..
उगाच होई त्रास मला...

जमीन माझी कसेन मी..
पडो किती सायास मला

सदैव मित्रा तूच दिसे
तयार संपवण्यास मला

जमाव शत्रूंचा जमला
अखेर सावरण्यास मला

- प्रा.डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर

गझल: 

Pages