...लुप्त
------------------------
झरे आसवांचे कसे लुप्त झाले?
थवे आठवांचे कसे लुप्त झाले?
जशी लुप्त होते समुद्रात नौका,
तुझे नाव आता तसे लुप्त झाले..
अशा लोपल्या आज आणा व भाका,
जसे घेतलेले वसे लुप्त झाले..
नको शोध घेऊ पुराण्या खुणांचा
तुझ्या पावलांचे ठसे लुप्त झाले..
उरातून गेली अशी 'हाय' माझ्या,
तिचे सांजवेळी हसे लुप्त झाले..!
--------------------------
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
मंगळ, 30/09/2008 - 12:54
Permalink
छान गझल!
ज्ञानेश, छान गझल आहे. मला माहीत नाही, पण असे वाटते की जर मतल्यात दोन्ही ठिकाणी 'कसे, कसे' असेल तर सर्वत्र 'कसे'च असायला पाहिजे. तज्ञांनी मत द्यावे अशी विनंती. माझे म्हणणे योग्य असल्यास आपले काफिया 'सवांचे', 'ठवांचे' असे येतील. त्याच्यासाठी दानवांचे, मानवांचे, शवांचे असे इतर काफिया घ्यावे लागतील. परत सांगतो, माहीत नाही की मी म्हणतोय ते योग्य आहे किंवा नाही.
अता या ठिकाणी किती शांत वाटे
चुका काढणारे घसे लुप्त झाले
कधी वाघ होते, कसा काळ आला
बिचारे बनोनी ससे, लुप्त झाले
अजय अनंत जोशी
मंगळ, 30/09/2008 - 13:19
Permalink
तंत्र ...
'कसे' शब्द होताच ओळीत दोन्ही
पुढे तंत्र याचे कसे लुप्त झाले?
मतल्यात सूट घ्या. असे करता येईल का पहा... आग्रह नाही.
झरे आसवांचे जसे लुप्त झाले..
थवे आठवांचे तसे लुप्त झाले
चूभूद्याघ्या.
समीर चव्हाण (not verified)
मंगळ, 30/09/2008 - 13:54
Permalink
विचार करणे आवश्यक आहे!
जशी लुप्त होते समुद्रात नौका,
तुझे नाव आता तसे लुप्त झाले..
मी चांगलल्या शेरात अशी अपेक्षा करतो की त्यातला कोणता ही शब्द अनावश्यक असू नये, तसेच त्या शब्दांना सहज असा विकल्प ही असू नये की ज्याने मूळ शेराची मजा बिलकुल वाढत नाही...
वरील शेरात समुद्रात नौका चे काय म्हत्व, गगनात तारे असे ही चालेल का, याचा विचार करणे आवश्यक आहे. शेर टाकताना आपण यावर विचार केला असेलच, आपले मत जाणून घ्यायला मला आवडेल. इथे मला शिवाजी जवरेंची या विषयाला धरून काही मते quote करायला आवडतीलः
उत्स्फूर्ततेच्या नावाखाली एकदा 'सूचले ते खरडले' असा हा प्रान्त नाही. शिल्पकार जसा वेगवेगळ्या vantage point वरून शिल्पाकडे बघतो, तसा प्रतेय्क शेर आणि प्रतेय्क कडवे अनेकार्थवत्तेने पण थेट आशयाने वाचका-रसिकाला भिडले पाहिजे.
ह्यात रसिकानुनय ही नाही आणि कारागिरी ही नाही. 'ओतलासे ठसा' असा हा मामला आहे.
ज्ञानेश.
मंगळ, 30/09/2008 - 16:51
Permalink
पुरेसा विचार केला आहे.
@भुषण सर, (जर मतल्यात दोन्ही ठिकाणी 'कसे, कसे' असेल तर सर्वत्र 'कसे'च असायला पाहिजे...)असा नियम आहेच. पण माझी प्रज्ञा इतके 'कसे-कसे' शोधू शकली नाही. ़क्षमस्व.
तुमचे दोन्ही शेर उत्तम आहेत.
@जोशी सर, (पुढे तंत्र याचे कसे लुप्त झाले..) त्याचे कारण हेच, की मला मतला प्रश्नार्थक करायचा होता. तुम्ही सुचवलेला मतला (जसे-तसे) तंत्राच्या द्रुष्टीने योग्य असेल, पण त्यात मला अपेक्षीत अर्थ येत नाही. शिवाय लगेच पुढच्याच शेरात 'तसे' आल्याने- "एका गझलेत एक काफिया परत दिसायला नको" हा नियम लगेच कोणीतरी दाखवला असता.
म्हणून तुमची दुरुस्ती स्विकारू इच्छित नाही. क्षमस्व.
@चव्हाण साहेब, ('समुद्रात नौका' चे काय महत्व?) हो, महत्व आहेच.
मी पुरेसा विचार करूनच ती उपमा दिलेली आहे. फक्त व्रुत्त पुर्ण करायला ते लिहीले नाही. ('गगनात तारे' व्रुत्तात बसत नाही.)
'समुद्रात नौका' जेव्हा लुप्त होते (बुडते) ना, तेव्हा ती वरून दिसत नाही. पण तरीही तिचे अस्तित्व समुद्रात (तळाशी) असतेच. तसेच 'तुझे नाव' (प्रेयसीचे) माझ्या मनात लुप्त झाले आहे. म्हणजेच दिसत नसले तरी ते तिथे आहे, असे कवीला (म्हणजे मला) म्हणायचे आहे.
समीर चव्हाण (not verified)
मंगळ, 30/09/2008 - 18:02
Permalink
धन्यवाद.
धन्यवाद.
स्पष्टीकरणासाठी. मला जो विचार अपेक्षित आहे तो आपण केलात आंनद आहे.
'गगनात तारे' व्रुत्तात बसत नाही. मान्य ते केवळ उदाहरण होते.
बाकी मला जो मुद्दा मांडायचा सर्वांच्या हितासाठी तो मी मांडलाच आहे.
केदार पाटणकर
मंगळ, 30/09/2008 - 22:21
Permalink
असे असावे..
समीर,
कवीच्या दृष्टीने असे असावे -
समुद्रात प्रवास करणारी नौका वादळामुळे किंवा इतर अडथळ्यांमुळे अचानक बुडते, रसातळातला जाते. म्हणजेच, प्रवास पाहणा-याच्या दृष्टीने लुप्त होते. प्रेयसीचे नावही असेच अचानक, कल्पना नसताना लुप्त होते. मी दैनंदिन जीवनाच्या रहाटगाडग्यात असा काही अडकलो आहे, की कालपरवापर्यंत माझ्या ओठांवर रात्रंदिन असणारे तिचे नाव पाहता पाहता नष्ट झाले, लुप्त झाले. जे नाव शेवटपर्यंत ओठांवर असायला पाहिजे होते, ते राहिले नाही.
जीवनाच्या वादळात तिच्या नावाची नौका अडकली आणि नुसती अडकली नाही तर लुप्त झाली. गायब झाली. गडप झाली. ज्या नौकेच्या साह्याने हा भवसागर पार करता आला असता तीच नौका बुडाली.
ता-यांचे असे होत नाही. त्यांची येण्याची वेळ आणि लुप्त होण्याची वेळ ठरलेली असते. म्हणजेच त्यांचे भवितव्य ठरलेले असते. नौकेचे भवितव्य ठरलेले नसते. सगळे काही अचानक होते. प्रेयसीचे नाव अचानक, ध्यानीमनी नसताना लुप्त होते. ठरवून होत नाही.
ज्ञानेश, आपला दृष्टिकोन वाचायला आवडेल.
समीर चव्हाण (not verified)
बुध, 01/10/2008 - 02:36
Permalink
धन्यवाद
केदार:
अचानक होणे वर्च्या ओळीत अपेक्षित आहे हा आपला मुद्दा ही योग्य वाटतो...
यामुळे शेराचा अजून एक पैलू पुढे आला असे म्हणायला हर्कत नाही.
By the way, मी कुठेच म्हटले नाही की गगनात तारे योग्य आहे,
समुद्रात नौका' चे महत्त्व समजायला मी चुकलोच. उत्कट प्रतिसाद बर्याचदा असेच असतात.
असो यामुळे शेर समजला, त्याची मजा घेता आली.
धन्यवाद पाटील आणि पाटण्करांचे...
भूषण कटककर
बुध, 01/10/2008 - 11:51
Permalink
छान चर्चा!
ही किती छान चर्चा चाललेली आहे! मुख्य म्हणजे यात सर्वजण सर्व गोष्टी राईट स्पिरीट मधे घेत आहेत. याचा नक्कीच साईटला, गझलेला व सर्व संबंधितांना फायदा होणारच.
बाय द वे, आत्ताच एक ससा बघितला बर का?
अजय अनंत जोशी
गुरु, 02/10/2008 - 17:36
Permalink
ज्ञानेश...
...तुमचे म्हणणे समजले. पण तरी असा पायंडा पडू नये म्हणून काळजी घेतलेली बरी. मी कधीही शेराच्या अर्थ बदलण्याच्या बाजूचा नाही. विचार हा सर्वस्वी गझलकाराचाच असला पाहिजे. मी दिलेला आधीचा प्रतिसाद हा सल्ला नाही. तो तसा मानूही नये. तंत्रामुळे मंत्र बिघडत असेल तर काय करणार? पण, तुम्ही मतल्यात न घेतलेली सूट जर गझलेच्या खाली उद्धृत केली असतीत तर हे तुमच्या लक्षात आले आहे असे सर्वांना कळले असते. मग प्रश्नच नव्हता. अर्थात, या बाबतीतही आग्रह नाही. तरी तुमची स्पष्टता पाहून आनंद वाटला. चूभूद्याघ्या.
क.लो.अ.
तिलकधारीकाका
शनि, 04/10/2008 - 15:29
Permalink
असे करू नये.
असे करू नये.
उरातून गेली अशी हाय माझ्या
तिचे सांजवेळी हसे लुप्त झाले
या शेरात सांजवेळीचा संबंध काय रे? सकाळी का नाही लुप्त झाले हसे? दुपारी जरा जेवण वगैरे आटपून मग तरी हाय जाऊ द्यायचीस उरातून. वामकुक्षीच्या आधी. संध्याकाळीच का?
तिचे शूरसे ते
तिचे ठेवणीचे
असे काहीतरी का नाही म्हणालास?
शेरामधे संबंध नसलेल्या गोष्टी ओवणे म्हणजे मुशरर्फला काश्मीरप्रश्नावरून सोलण्यासाठी भारतात बोलवून इथले स्पेशल बदक खायला घालण्यासारखे आहे की नाही? केले होते असे भा ज प ने.
मी आपला साईटवर्चे वातावरण खेळकर व आनंदी रहावे म्हणून येतो. बर का?
ज्ञानेश.
सोम, 06/10/2008 - 17:45
Permalink
अरे तिलकधारी...
असे का करू नये, तेही सांगत जा ना...
सांजवेळ/ कातरवेळ / संध्याछाया.. इत्यादी शब्द तेव्हापासून कवितेत आहेत, जेव्हा तुझा आणि माझा जन्मही झाला नसेल. कातरवेळी भावना अनावर होतात, भूतकाळ आठवतो, संध्याछाया भिववती ह्रुदया असे काही ऐकले नाहीस का कधी?
आणि पर्याय तरी काय दिव्य सुचवले आहेत.. 'शूर' हसे ! तेही प्रेयसीचे !!
हे म्हणजे "सुंदर मिठाई" आणि "स्वादिष्ट बायको" सारखे वाटते ना.
कवीने आपल्या कवितेत कुठल्या प्रतिमा वापराव्या, हे पण इतरांनी ठरवायचे का??
चित्तरंजन भट
सोम, 06/10/2008 - 18:14
Permalink
जशी लुप्त होते समुद्रात नौका
झरे आसवांचे कसे लुप्त झाले?
थवे आठवांचे कसे लुप्त झाले?
हा मतला घेऊन नवी गझल लिहा.
जशी लुप्त होते समुद्रात नौका,
तुझे नाव आता तसे लुप्त झाले..
वा...
उरातून गेली अशी 'हाय' माझ्या,
तिचे सांजवेळी हसे लुप्त झाले..!
सांजवेळी चे प्रयोजन कळले नाही.
एकंदर गझल छान. द्विपदींतील विधानात्मकता कमी करण्यास वाव असल्यास ती कमी करावी.