फुलासारखी...

-----------------------
रहावी  सदा  तू  फुलासारखी,
घरंदाज, मोठ्या कुलासारखी..

मला  जोडशी  तूच  माझ्यासवे,
मला  भासते  तू पुलासारखी..

वटारून  डोळे  पहावेस  तू,
अशी  चूक  व्हावी, मुलासारखी !

जशी  बोच  आहे मला  अंतरी,
तशी  राहते  का तुला, सारखी?

अकस्मात  ये  तू  मला  भेटण्या-
सुखासारखी  वा  शुलासारखी...

------------------------

गझल: 

प्रतिसाद

चौथा  शेर  असा  वाचावा-
जशी  बोच  आहे मला  अंतरी,
तशी  राहते  का तुला, सारखी?

ज्ञानेशजी,
आपला मतला, दुसरा व तिसरा शेर हे उत्तम आहेत. मुलासारखी व पुलासारखी हे फारच आवडले. बुलबुल हा काफिया वापरून आणखी एक शेर गुंफावात अशी विनंती!
 

ज्ञानेशजी,
१. शेराची दुसरी ओळ ही पहिल्या ओळीचा प्रभावी समारोप करणारी असावी असे जर गृहीत धरले तरः
मतल्यात फुलासारखी व कुलासारखी यांचा संबंध लक्षात येत नाही
२. मला भासते तू मधे भासतेस असे वृत्तात बसत नसल्याने भासशी चालेल का?
या फक्त काही सुचलेल्या गोष्टी आहेत. कसलाच आग्रह नाही. जे वाटले ते लिहिल्याबद्दल माफ करा. आपली गझल, त्यातील विचार व भाषेचा प्रवाहीपणा छान आहे.

असे करू नये.
वटारून डोळे पहावेस तू अशी चूक व्हावी मुलासारखी
यात चूक होण्याची इच्छा ही तिने डोळे वटारून पाहण्याच्या इच्छेपेक्षा जास्त प्रबळ वाटतीय की नाही?
वटारून डोळे पहावेस तू जणू चूक माझी मुलासारखी
हे कसे वाटतेय?
म्हणजे आइसक्रीम खायला जायचे अन आइसक्रीमचा चमचाच चावायचा असे वाटणार नाही, हो की नाही?
मी आपला साईटवर वातावरण खेळकर व रहावे म्हणुन येतो. बर का? 

मला  जोडशी  तूच  माझ्यासवे,
मला  भासते  तू पुलासारखी..

वटारून  डोळे  पहावेस  तू,
अशी  चूक  व्हावी, मुलासारखी !

जशी  बोच  आहे मला  अंतरी,
तशी  सांग  आहे  तुला, सारखी?.   हे शेर आवडलेत.. लिहित रहाणे
-मानस६

जशी  बोच  आहे मला  अंतरी,
तशी  सांग  आहे  तुला, सारखी?.

@भुषण सर- "मतल्यात फुलासारखी व कुलासारखी यांचा संबंध लक्षात येत नाही" हे खरे आहे.  एकूण शेराचा  रोख  पाहून सुधारणा  सुचवावी."
 मला भासते तू मधे भासतेस असे वृत्तात बसत नसल्याने भासशी चालेल का?" चालेल, पण त्याने फार पडेल का?
@तिलकधारी- "यात चूक होण्याची इच्छा ही तिने डोळे वटारून पाहण्याच्या इच्छेपेक्षा जास्त प्रबळ वाटतीय की नाही?" मला तसे वाटत नव्हते, पण आता तुम्ही  सांगितल्यावर वाटते  आहे खरे! तुमची  दुरूस्ती  चांगली  आहे, पण मूळ  शेर (मला  तरी) जास्त प्रभावी  वाटतो.
@मानस- आभारी  आहे.

उद्यानभूषी कुलासारखी ( बागेतले सर्वात श्रेष्ठ कुल ).
बराय का बदल?

भुषण सर, "उद्यानभूषी कुलासारखी " हा  खरोखर  चांगला बदल आहे. पण भुजंगप्रयात गडबडतो का, हे  पहायला हवे.

जशी  बोच  आहे मला  अंतरी,
तशी  राहते  का तुला, सारखी?
सुरेख!!!

ज्ञानेश एकंदर गझल आवडली. छान, सफाईदार लिहिता तुम्ही. शुभेच्छा.

चित्तरंजनशी सहमत.
जशी  बोच  आहे मला  अंतरी,
तशी  राहते  का तुला, सारखी?

कलोअ चूभूद्याघ्या

रहावी  सदा  तू  फुलासारखी,
घरंदाज, मोठ्या कुलासारखी..
येथे कवी एक मनस्थितीमधून फार भरकन दुसर्‍याच मनस्थितीमधे जाताना दिसतो. त्याला प्रेयसी फुलासारखी रहावी असे वाटत असतानाच ती घरंदाज कुलासारखी असावी किंवा रहावी असे वाटते. यात यमक जुळवून एक अद्वितीय मजा तर निर्माण केलीच आहे पण एकाच शेरात विविध इच्छा प्रदर्शित करून शेर रंगतदार केला आहे. पहिली ओळ ऐकल्यानंतर प्रेयसी फुलासारखी व्हायला निघणार तेवढ्यात तिने कुलासारखे असावे अशी एक मागणी येऊन तिच्या पुढ्यात आपटल्यामुळे ती संपूर्ण संदिग्ध मनस्थितीमधे तटस्थ उभी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा शेर रचतानाची मनस्थिती अभ्यासणे अत्यंत महत्वाचे आहे. येथे कवीला अशा दोन ध्रुवीय फरक असलेल्या इच्छा का झाल्या असाव्यात हे समजून घेतले पाहिजे. फूल व घरंदाज मोठे कूल हे काही बाबतीत सारखे आहेत. जसे अशा कुलाचा सुगंध आजुबाजुच्यांना कायम मिळत राहतो, संस्कृतीची उन्नती होत राहते. रोपावर असलेल्या पाना, खोडा, मुळाच्या तुलनेत फुलाचे महत्व सर्वात जास्त असते. म्हणजेच फुलाचे कूळ हे सर्वात मोठे व घरंदाज असते ( रोप या समाजामधील ). हे विचार अत्यंत नावीन्यपूर्ण असून नवीन कवींनी आत्मसात करण्यासरखे आहेत. असावी, रहावी यामधे शेवटी 'स' हवा आहे अशा अत्यंत कुचेष्टायुक्त अपेक्षा व्यक्त केल्या जाऊ नयेत.
मला  जोडशी  तूच  माझ्यासवे,
मला  भासते  तू पुलासारखी..
उत्तम शेर! इथे कवी स्वतःला हरवून बसलेला आहे. अशी मनस्थिती पराकोटीच्या प्रेमात होऊ शकते. आपण कोण आहोत, काय करत आहोत हे कळत नाही. अशा वेळेस ती हलकेच येते अन तिच्या अस्तित्वाने कवीला त्याचे मूळ व्यक्तिमत्व पुन्हा देऊन जाते. मनाने कवी स्वतःपासून प्रचंड अंतरावर असतो. इथल्या त्याच्यात व तिकडे अंतरावर असलेल्या त्याच्यामधे भीषण असे सामाजिक विरोधावे प्रवाह वाहत असतात. किंवा तिच्या आठवणींचे प्रवाह वाहत असतात ज्यामुळे एकच असलेले दोघे एकमेकांना भेटू शकत नसतात. हा फर मोठा विचार आहे. म्हणजे प्रेयसीने येऊन त्यांची भेट घडवून दिली हे त्याला खुद्द प्रेयसी भेटण्यापेक्षा महत्वाचे वाटत आहे. हे वरकरणी स्वार्थी प्रेम वाटले तरी ते एका खोल प्रेमाचे प्रतीक आहे. या भावनांनी अशी पातळी गाठली आहे की आता ती प्रेयसी कवीला एका पुलासारखी वाटत आहे. प्रेयसीला पुलाची उपमा या क्षेत्रात यापुर्वी कुणी दिल्याचे आमच्या ऐकीवात नाही. प्रचंड नावीन्य. प्रेयसीवर असे प्रेम ज्यात कवीला प्रेयसी पुलासारखी समोर असुनही तिच्यावर वेळ घालवावासा न वाटुन आधी स्वतःला स्वतःशी जोडण्याची ओढ आत्यंतिक आहे. केवळ फूल, कूल यात पूल पण बसते म्हणुन पूल घेतलंय असे खुजे विचार करू नयेत. अर्थात आमचा असा सल्ला आहे की उगाचच कुणी आपल्या प्रेयसीला पूल म्हणुन संबोधु नये, तसे करण्याआधी सर्व पार्श्वभूमी समजावून सांगावी.
वटारून  डोळे  पहावेस  तू,
अशी  चूक  व्हावी, मुलासारखी !
यात अनेक इच्छा आहेत. आधी एक तर तिने पहावे. ( ती पहातच नाही असे असेल तर आधी तिने पहावे ). पाहिलेच तर डोळे वटारून पहावे. ( आमच्या अनुभवाप्रमाणे ही गोष्ट स्त्रिया आपोआप करतात, सांगण्याची वेळ येत नाही, पण कवी तेही सांगतो आहे. ) प्रेमाची ही ती पातळी आहे जिथे तिचे डोळे वटारून पाहणे हा कविला तिचा एक असा विभ्रम वाटतो की ज्यावर जॉ निछावर करावी. यातच कवी व सामान्य माणूस यांच्यात एक सीमारेषा पडते. ज्याची सामान्य माणसांना आकांताची भीती वाटत असते ( की प्रेयसीला आपले काहीतरी कळेल अन ती डोळे वटारून पाहिल की काय? ) त्या वटारून पाहण्याची कवीला आंतरिक इच्छा आहे. बर उगाचच तिने वटारून पहावे असेही नाही. ह्याची काहीतरी चूकही व्हायलाच पाहिजे. म्हणजे ही तिसरी इच्छा झाली! आता अशा कोणच्या चुका असतात ज्याने प्रेयसी डोळे वटारून बघेल? सर्वसाधारणपणे आमच्या ऐकीवात खालील चुका आहेत.
१. योग्य वेळेला ( ठरलेल्या वेळेला ) भेटायला न जाणे. ( असे सहसा होत नाही )
२.स्वतच्या काही काळज्या तिच्यासमोर धुरात उडवणे ( हा धूर काढणार्‍या वस्तू पानाच्या दुकानात मिळतात ).
३. काही अशी पेय प्राशन केल्याचे तिला कळणे की ज्याने 'ह्याच्यावर प्रेम करणे हा योग्य निर्णय आहे की नाही' अशा स्वरुपाचे मूलभूत प्रश्न निर्माण होऊ शकतात.
४. कवी प्रेयसीला अशा व्यक्तिबरोबर दिसणे जी प्रेम या क्षेत्रात तिची महत्वाची स्पर्धक ठरू शकेल किंवा ती ठरावी असे कवीचे किंवा तिचे हावभाव असतील.
५. प्रेयसीच्या कुटुंबातील काही व्यक्तिंबद्द्ल बोलताना कवीने त्याची मूळ भाषा ( जी हॉस्टेल, कट्टे वगैरे अशा ठिकाणी वापरली जाते ) ती वापरून त्यांचा अचानक उद्धार केला असावा.
खरी मजा यानंतरच आहे. वरीलपैकी एकही कारण नाहीये. कवीची चौथी इच्छा अशी की त्याची ती चूक एखाद्या लहान मुलासारखी व्हावी. म्हणजे घरी आलेल्या पाहुण्यांना दप्तरातल्या पट्टीने पिटणे, किंवा कुणाच्या घरी गेल्यावर त्यांच्याकडच्या सर्व वस्तुंची मूळ जागा बदलताना त्यांचे स्वरूपही बदलणे वगैरे. ही जी प्रेमाची पातळी आहे ती खरोखरच आत्तापर्यंत एकाही कवितेत आम्ही पाहिलेली नाही. हे अत्यंत क्लिष्ट असे मनोव्यापार असून ते फार कमी जणांना आत्मसात झालेले आहेत.
जशी  बोच  आहे मला  अंतरी,
तशी  राहते  का तुला, सारखी?
इथे माहिती विचारणे, मला बोच आहे असे सांगणे, तुला कशी काय नाही असे म्हणणे असे अनेक विचार कमी शब्दात बसवले आहेत. ही बोच कसली ते स्पष्ट झालेच पाहिजे असा आग्रह नसावा.
अकस्मात  ये  तू  मला  भेटण्या-
सुखासारखी  वा  शुलासारखी...
हा एक वेगळाच विचार आहे. कशीही ये पण ये. अन ते सुद्धा अपेक्षा असताना नको. अजिबात अपेक्षा नसताना ये. यात एक गर्भीतार्थ पण आहे. एक काय ? अनेक आहेत. मुळात हा विचार प्रेयसील उद्देशून आहे की विद्येला की कुणाला हे ज्याचे त्याने ठरवावे. समजा प्रेयसीला उद्देशून आहे असे मानले तर कशीही का होईना पण बाईग तू ये ही कळकळ आहे. इथे शूल हा शब्द गझलेत बसल्यामुळे यमक जुळल्याचा एक ब्रह्मानंद प्राप्त होतो कवीला. ती बाब वेगळी!
एकंदर गझल उत्तमः
१०० पैकी २४