अजरामर....

अजरामर....

तुझे आभास घेवोनी, निशेला जागतो आहे...
तुझी स्वप्ने जराशी मी, उशाशी सांडतो आहे...

तुला खात्री नसे याची, म्हणोनी आज रक्ताने;
तुझी-माझी कहाणी ही, नभावर मांडतो आहे...

तुला मी काय सांगू अन्, तुला मी काय समजावू?
तुझ्या आत्म्यात आता मी, स्वतःला शोधतो आहे...

सखे गं फार झुरलो मी, तरी संपून उरलो मी;
तुझ्या एका कटाक्षाची, कृपा मी मागतो आहे...

जगाचे भान का ठेवू? कशाला लाज मी लेवू?
तुझ्या विरहात चंदेरी, उसासे माळतो आहे...

तुला आयुष्य हे अर्पू, मला ना मोक्ष ना मृत्यू;
तुझ्या प्रेमात 'अजरामर', गझल मी रेखतो आहे...

- निरज कुलकर्णी.

वृत्त - वियदगंगा
गण - लगागागा लगागागा लगागागा लगागागा
मात्रा - २८
गझल: 

प्रतिसाद

वेगवान अप्रतिम बाण!
स्वप्ने उशाशी सांडणे, चंदेरी उसासे, अजरामर गझल, हे उत्कृष्ट बाण!
बाण नुसते सोडायचे वत्सा, तंत्र सांगत बसायची नाहीत. बाकीचे आपोआप समजतात ती तंत्र. प्रश्न असा आहे की इथे धनुर्विद्या शिकवायची नसून अमलात आणायची आहे, जी तू आणलीच आहेस. अजून थोडे बाण सोड.

पुन्हा  तेच  सांगतो  निरज...एक  सर्वांगसुंदर  गझल.

तुला खात्री नसे याची, म्हणोनी आज रक्ताने;
तुझी-माझी कहाणी ही, नभावर मांडतो आहे...

हा  शेर  सर्वाधिक आवडला.