कधी कधी
माझिया सवेच मी बोलते कधी कधी
बोलण्यातही तुला ऐकते कधी कधी
आरश्यात शोधते मी तुझाच चेहरा
हासते कधी कधी लाजते कधी कधी
टाळुनी तुला जरी दूर दूर चालले
सावली तुझी मला भेटते कधी कधी
मागते न मी तुला तारका नभातल्या
आपुलेच श्वास मी मागते कधी कधी
कोणत्याच अंगणी मी न वेचली फुले
अंतरात मी तुला वेचते कधी कधी
एकटेपणातही स्पर्श जाणवे तुझा
आसपास मी तुला पाहते कधी कधी
जागते अजूनही चांदणे मिठीतले
रात्र आपुली अशी रंगते कधी कधी