दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
ना झोपतो, ना जागतो, मी वागतो वेड्यापरी;
तंद्रीत एका वेगळ्या मी राहतो वेड्यापरी.
सत्यात अन् स्वप्नातही झाल्या किती भेटी तुझ्या;
रात्रंदिनी बोटावरी मी मोजतो वेड्यापरी.
वेणीत जी तू खोवली होती गुलाबाची फुले;
एकेक त्यांच्या पाकळ्या सांभाळतो वेड्यापरी.
नाते मला लागे पुसू, "आहेस माझी कोण तू?"
प्रश्नास ह्या साध्यासुध्या मी हासतो वेड्यापरी.
होणार ते होवो उद्या त्याची न मजला काळजी;
प्रेमात माझ्या आजच्या मी झिंगतो वेड्यापरी.
सर्व रसिकांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, माझी खालील 'कुर्निसात' ही गझल पुढील वर्षी अमेरिकेत होणा-या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनातील सादरीकरणासाठी निवडण्यात आलेली आहे.
तसा न चंद्र राहिला, तशी न रात राहिली;
अजूनही तशीच तू तनामनात राहिली.
अजून आठवे मला सुरेख तीळ सावळा;
अमीट खूण ती तुझी सखे उरात राहिली.
शहारते पुन्हा पुन्हा गळ्यात गीत ते तुझे;
मधुर चोरटी मिठी तुझी स्वरात राहिली.
कधी कधी हवेत ह्या तुझाच स्पर्श जाणवे;
फिरून सावली तुझी जशी घरात राहिली.
पुसून लोचने जिथे तुझा निरोप घेतला;
अजून ती मनात ह्या तुझी वरात राहिली.
('गुलाल आणि इतर गझला' संग्रहातून)
दोस्तांतला कुणी कधीच हरला नाही
एकांत बोचरा सरात सरला नाही
पाण्यात पाहुनी नभात उडता कोणी
आधार द्यावया जळी उतरला नाही
खोळंबले कधी सुवर्णकण अस्ताशी
संधिप्रकाश तो पुन्हा पसरला नाही
रात्रीस काजवे खुशाल लपले रानी
अंधार साथ ही कधी विसरला नाही
पंखांत चंद्र तो जरा वितळला रात्री
सूर्यास पाहता परांत ठरला नाही
कुणी गायिली असेल पण मी गझल पाहिली आहे
लाखोंमधुनी मला हेरुनी हाक बाहिली आहे
ओलेतीची कवी-कल्पना असेल त्यांच्यासाठी
धुवांधार पावसात माझ्यासवे नाहिली आहे
बोलत असते माझ्याशी ती फूलपाखरी भाषा
महाल बांधुन दवबिंदूचा त्यात राहिली आहे
हात लावुनी पहा हवे तर, कशास खोटे बोलू
शब्दांशब्दांमधून माझ्या कशी काहिली आहे
जन्मावस्था ही गझलेची कशी कळावी कोणा
मी गझलेची प्रसव-वेदना स्वतः साहिली आहे
चूक भुल क्षमस्व !
डॉ. स॑तोष कुलकर्णी सरा॑च्या सहवासतून निर्माण झालेले गझलचे सुप्त आकर्षण आणि मित्रा॑चा 'काहितरी लिहित जा' असा आग्रह यामुळे गझलचे जुजबी ज्ञान आसतना ( मात्रा,बहर,व्रताचा फारसा विचार न करता)लिहिण्याची हि॑म्मत केली त्याबद्दल क्षमस्व !
माधव भा॑गे, उदगीर.
bmadhav4u@yahoo.com
गेले हळूच जेव्हा मी चोरपावलांनी...
गेले हळूच जेव्हा मी चोरपावलांनी...
केला दगा जरासा माझ्याच पैंजणांनी
सांगावयास येथे उरले न आज काही
केली कशास गर्दी डोळयात आसवांनी?
स्वप्नात भेटण्याचे देते वचन हरीला
राधेस कैद केले या रीतशृंखलांनी
होते दडून काही भलतेच शब्द ओठी
लागे मला सुगावा त्यांच्याच त्या खुणांनी
कोणी हसून गेले, कोणी रडून गेले
खोटीच वाहिलेली श्रद्धांजली फुलांनी